जनावरांच्या खाद्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या व्हिटॅमिनची केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने चौकशी सुरू केली आहे. अँटी डंपिंग नियमावलीनुसार ही चौकशी सुरू केली आहे. स्थानिक उद्योगांनी केलेल्या तक्रारीची वाणिज्य मंत्रालयाने दखल घेतली असून त्याद्वारे चौकशी करण्यात येणार आहे.
वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या डायरेक्टोरेट ऑफ ट्रेड रेमिडिज (DGTR) विभागामार्फत ही चौकशी करण्यात येत आहे. चीन, युरोपीयन संघ आणि स्वित्झर्लंड देशामधून हे व्हिटॅमिन भारताने आयात केले होते. मात्र, हे प्रोडक्ट भारतामध्ये डंप करण्यात आले म्हणजेच बळजबरीने चुकीच्या पद्धतीने विक्री करण्यात आल्याचा आरोप स्थानिक उद्योगांनी केला आहे. या उत्पादनाच्या आयातीमुळे स्थानिक उद्योगांना फटका बसल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे. पिरामल फार्मा कंपनीने याबाबत तक्रार केली आहे.
अँटी डंपिग शुल्क लागू करण्याची मागणी-
आयात करण्यात येणाऱ्या या व्हिटॅमिनवर अतिरिक्त शुल्क लागू करण्याची मागणी पिरामल फार्मा कंपनीने केली आहे. DGTR विभागाने यास दुजोरा दिला आहे. पिरामल फार्माकडून आम्हाला याबाबत अर्ज प्राप्त झाला आहे. या प्रकरणाकडे वरवर पाहता तथ्य दिसून येत असून अर्ज स्वीकारण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे डीजीटीआर विभागाने म्हटले आहे.
स्थानिक उद्योगांना जर या पदार्थाच्या आयातीमुळे नुकसान झाले असेल तर त्यावर अँटी डंपिंग नियमावलीनुसार अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल, असे डीजीटीआरने म्हटले आहे. एखाद्या देशातून जर स्वतामध्ये वस्तू निर्यात केल्या जात असतील तर अशा व्यापारावर कायदेशीर बंदी आहे. याचा समावेश व्यापाराच्या गैरपद्धतीमध्ये केला जातो. जागतिक व्यापार संघटनेने देखील याबाबत नियमावली केली आहे. चीनसह इतर अनेक देशांकडून भारतात आयात होणाऱ्या मालावर अतिरिक्त शुल्क अँटी डंपिंग नियमावलीनुसार लागू करण्यात आले आहे.