Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gold Mortgage Loan: सोनं तारण ठेवून कर्ज घेणाऱ्यांची संख्या का वाढतेय?

GOLD LOAN GOLD RATE Demand for Gold Loan

Demand for Gold Loan : सोनं तारण ठेवून कर्ज मिळवणे हे आता काही नवीन राहिलेलं नाही. विशेषत: कोरोनाच्या काळात ते अधिक जाणवलं. मात्र ग्राहकांचा पुन्हा एकदा त्याकडे कल दिसून येत आहे. गुंतवणूकदारांच्या या बदलत्या कलामागे अनेक बाबी कारणीभूत आहेत.

कोरोना (covid19) वैश्विक महासाथ आजाराच्या कालावधीत थोड्या काळासाठी रोख रकमेची गरज भागविण्यासाठी गोल्ड लोनचा (Gold Loan) वापर अनेकांनी केल्याचे या क्षेत्रातून सांगितलं जातं. 2022-23 या आर्थिक वर्षातही अगदी जुलैच्या मध्यापर्यंत अनेक बॅंका गोल्ड लोनचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत असल्याचं दिसून येत आहे. ग्राहक, खरेदीदारांनी स्वतःच्या जीवनशैलीची गरज भागविण्यासाठी कर्ज घेण्याची पद्धत जितकी ऐतिहासिक असेल तितकीच त्या कर्जासाठी तारण म्हणून सोनं ठेवण्याची पद्धतही ऐतिहासिक म्हणावी लागेल. या पद्धतीला आता पुन्हा एकदा कर्ज बाजारात मागणी (Demand for Gold Demand) असल्याचे दिसून येतं.

सोनं, हीच ग्राहकाची कर्ज फेडण्याची क्षमता!

सोनं तारण ठेवून कर्ज देण्याची पद्धत कर्ज देणाऱ्या संस्थेनुसार बदलत असली तरी ढोबळमानाने त्यात एक कल (pattern) दिसतो. तो असा की, कर्ज परत फेडण्याची ग्राहकाची क्षमता आहे का? हे बॅंका आणि वित्तीय संस्थांना तपासणे आवश्यक वाटतं. काही वेळा संबंधितांची कर्ज फेडण्याची पुरेशी ऐपत वाटत नसेल तर कर्जप्रकरण मंजूर करण्यात अडचण येऊ शकते. अशावेळी कुठली तरी अन्य मौल्यवान मालमत्ता (asset) संबंधित वित्त संस्थेच्या ताब्यात (Mortgage Loan) देऊन त्यावर कर्ज मिळणे सुलभ होते. सोनं हा धातू अशाप्रकारे महत्त्वाची मालमत्ता गणली जाते आणि हे जगात सगळीकडे मान्य झालं आहे. त्यामुळे ग्राहकाने तारण ठेवलेल्या सोन्याच्या किमतीच्या ठराविक प्रमाणात कर्ज देणे सुलभ होते. (Gold Loan Market in India 2022)

सोन्याचे दागिने किंवा इतर स्वरुपातले सोने असेल तर कर्ज देणाऱ्या संस्थांच्या प्रमाणित यंत्रणेकडून त्याची किंमत ठरवून घेतली जाते. त्या किमतीच्या आधारे कर्ज देण्याचा निर्णय केला जातो. कर्ज हे व्याज आणि मुद्दलासह परत केल्यानंतर ग्राहकानं तारण ठेवलेलं सोनं परत त्याच्या ताब्यात दिलं जातं. कर्ज फेडण्यात अपयश आलं तर मात्र ग्राहकाला या सोन्याला कायमस्वरुपी मुकावं लागू शकतं, अशी ही ढोबळ पद्धत दिसून येते.

अलीकडच्या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांनी गोल्ड लोन (Gold Loan) देण्याच्या व्यवसायात खूप मोठी वाढ केल्याचं दिसतं. वैयक्तिक ग्राहक स्वतःच्या कर्जविषयक गरजांसाठी या बॅंकांकडे जातो. स्वतःकडील अतिरिक्त सोने तारण ठेवून त्याबदल्यात तो कर्ज मिळवतो. कर्ज मिळवण्याची ही प्रक्रिया कमी गुंतागुंतीची वाटत असल्याने त्याकडे ग्राहकांचा ओढा वाढत आहे.

गोल्ड लोन घेणं सुलभ!

गोल्ड लोन अर्थात सोने तारण ठेवून कर्ज घेणं सुलभ आहे. ग्राहकाला स्वतःकडील अतिरिक्त सोनं तारण ठेवायचं असतं. कर्ज योजनेची कागदोपत्री प्रक्रिया त्वरित होते. त्यासाठी सोने तारण ठेवणाऱ्या ग्राहकाचं केवायसी आवश्यक असतं. पेपरवर्क आणि केवायसी आदीची खात्री झाली की कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. त्यासाठी लागणारी डॉक्युमेंटं आणि फी रचनेत कर्जदारानुसार बदल होतो. त्यामुळे जिथून कर्ज घ्यायचंय अशा संस्थेकडूनच संबंधित माहिती घ्यावी. कारण ती अनेकवेळा संस्थानुरूपही बदलते.

सोन्याच्या बदल्यात कर्ज किती मुदतीसाठी मिळतं याबाबत मात्र एकवाक्यता नाही. कर्ज देणाऱ्या संस्थेनुसार ही मुदत बदलू शकते. तरीही साधारण 24 ते 36 महिने मुदतीसाठी कर्ज देण्याच्या योजनांची मागणी अधिक असते. आणि त्यांना ग्राहकाकडूनही प्राधान्य मिळत आहे. गोल्ड लोनसाठी कोणती कागदपत्रं लागतात, कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी किती फी लागते या सगळ्या बाबी कर्ज देणाऱ्या संस्थेवर त्याचप्रमाणे या कर्ज योजनांबाबतच्या नियमांच्या अधीन राहून असतात. अनेक बॅंकांनी त्याबाबतची माहिती त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. तसंच बॅंक शाखांमध्ये कर्ज विभागाशी प्रत्यक्ष संपर्क साधूनही या बाबत माहिती मिळू शकते.

लहान स्वरुपातील रक्कम विशिष्ट मुदतीपुरत्या कर्जाऊ घेण्यासाठी गोल्ड लोनचा मार्ग अनुसरला जातो. कारण यात आपल्याकडील अतिरिक्त सोन्यापैकी किती ताब्यात द्यावं हे ठरवता येतं. त्याचप्रमाणे ठराविक मुदतीत व्याज भरून तसेच कर्जाची परतफेड करून सोने परत मिळवता येणंही शक्य असल्यानं ग्राहक अशा प्रकारच्या कर्जाचा अधिक प्रमाणात विचार करतात. मात्र अडीअडचणीच्या काळात या मार्गाने कर्ज घ्यावंच लागणार असेल तर सर्व नियम अटी आणि शर्ती नीट समजावून घेऊनच हा मार्ग अनुसरावा, असं तज्ज्ञ, नियोजनकारांकडून सांगितलं जातं.