इंडियन पोस्टद्वारे सामान्य नागरिकांना वेगवेगळे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून दिले जातात. छोट्या गुंतवणूकदारांसाठी पोस्टाने याआधी देखील अनेक योजना आणल्या आहेत. कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना फायद्याच्या ठरतील अशा योजनांना मोठी पसंती मिळत आहे.अशीच एक योजना म्हणजे मासिक उत्पन्न योजना (Monthly Income Scheme) होय. ही गुंतवणूक योजना ग्रामीण भागात कमालीची लोकप्रिय ठरली आहे. या योजनेचे फायदे या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
खाते उघडण्यासाठी काय करावे?
मासिक उत्पन्न योजनेत (Monthly Income Scheme) गुंतवणूकदार केवळ 1,000 रुपयांमध्ये खाते सुरु करू शकतात. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आधार कार्ड, PAN कार्ड या मोजक्या कागदपत्रांसह तुम्ही MIS खाते सुरु करू शकतात.
खाते सुरु करण्यासाठी तुम्हांला दोन विकल्प दिले जातील, एकल खाते (Single Account) आणि संयुक्त खाते (Joint Account). तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कुठलाही खाते प्रकार निवडू शकता. मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे. 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.
एकल खाते उघडल्यानंतर, मासिक उत्पन्न योजनेत तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता, तर संयुक्त खात्यात तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करू शकता.
तुम्ही गुंतवलेल्या पैशावर तुम्हांला योजनेनुसार हमखास व्याज मिळू शकते. यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेच्या व्याजदरांत वाढ करण्यात आली आहे, जाणून घेऊयात MIS मध्ये व्याजदरात झालेली वाढ.
7.4% दराने व्याज
एक सुरक्षित आणि भरवश्याची गुंतवणूक योजना म्हणून ही योजना ओळखली जाते. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर उपलब्ध माहिती पाहिल्यास या योजनेवर 7.4 टक्के दराने व्याज दिले जात आहे. मागच्या वर्षी या योजनेत 6.6 टक्के व्याजदर दिले जात होते.
मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणुकीवर दिल्या जाणाऱ्या व्याजदरात झालेली ही वाढ सामान्य नागरिकांसाठी फायद्याची ठरणार आहे. या गुंतवणुकीत दर महिन्याला व्याज दिले जाते हे विशेष! यामुळेच या योजनेला मासिक उत्पन्न योजना असे नाव दिले गेले आहे.
लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा
मासिक उत्पन्न योजनेचा लॉक-इन कालावधी हा पाच वर्षांचा आहे. पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदार पुढील पाच वर्षांसाठी गुंतवणुकीची मुदत वाढवू शकतात. या गुंतवणूक योजनेत लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असला तरी एक वर्ष पूर्ण केल्यानंतर गुंतवणूकदार खाते बंद करू शकता. नियमानुसार ठराविक रक्कम वजा करून तुम्हांला तुमची रक्कम पुन्हा मिळू शकते. 1 ते 3 वर्षात जर खाते बंद केले तर जमा केलेल्या रकमेच्या 2% टक्के रक्कम वजा केली जाईल आणि उरलेली रक्कम गुंतवणूकदाराला परत केली जाईल. तसेच 3 ते 5 वर्षांत ही योजना बंद केल्यास जमा केलेल्या रकमेच्या 1% टक्के रक्कम वजा केली जाईल असा नियम आहे.