कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आली असून भारतीय अर्थव्यवस्थेत सातत्याने वाढ होत असल्याची माहिती खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या चांगल्या घडामोडी सुरु असून नवनवीन उद्योगधंदे देशात सुरु होत आहेत असं देखील त्यांनी म्हटले आहे. सोबतच आंतराष्ट्रीय स्तरावर जागतिक मंदीचे सावट असताना भारतातील अर्थव्यवस्था मात्र सकारात्मक पद्धतीने वाढते आहे असे त्यांनी म्हटले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रोजगार मेळाव्यात देशभरातील जवळपास 70,000 हून अधिक तरुणांना नियुक्तीपत्र दिले आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात माहिती देताना प्रधानमंत्री मोदी यांनी ही माहिती दिली आहे.
‘स्टार्टअप इंडिया’चा मोठा प्रभाव
गेल्या काही वर्षांपासून देशात उद्योगधंद्याच्या बाबतीत सरकारी स्तरावर वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे असे प्रधानमंत्री म्हणाले. युवा उद्योजकांना आर्थिक मदत आणि मार्गदर्शन पुरविण्यासाठी केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया, स्टँड अप इंडिया आणि मुद्रा योजना यासारख्या विविध सरकारी योजना सुरु केल्या आहेत. यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत असे ते म्हणाले. खासगी क्षेत्रातील कंपन्या सध्या चांगली कामगिरी करत असून, जगभरातील कंपन्या आर्थिक अस्थिरतेचा सामना करत असताना भारतीय कंपन्या मात्र रोजगार निर्मिती करत असल्याचे ते म्हणाले.
Good social infrastructure hastens progress and an example of that is the Jal Jeevan Mission. pic.twitter.com/WcIjLPSYlo
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2023
देशभरात वेगवगेळ्या 43 ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. गेल्या दहा वर्षात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून भारतीय तरुण स्टार्टअप्सच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे अशी माहिती देखील प्रधानमंत्र्यांनी दिली. 70,000 हून अधिक युवक-युवतींना भारतीय पोस्ट, संरक्षण विभाग, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, महसूल आणि आरोग्य आणि इतर विभागांमध्ये केंद्र सरकारने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यासंबंधीचे नियुक्तीपत्र आज प्रदान करण्यात आले.
किरकोळ महागाईत घट, बेरोजगारीत वाढ
मे महिन्यात देशातील किरकोळ महागाईत घट झाल्याचे आढळून आले आहे. मे महिन्यातील किरकोळ महागाईचा दर 4.25% इतका होता. सामन्यांना याबाबत दिलासा मिळत असला तरी दुसरीकडे, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या म्हणण्यानुसार, यावर्षीच्या सुरुवातीपासून बेरोजगारीचा दर वाढतोच आहे. भारतातील बेरोजगारीचा दर मार्च 2023 मध्ये 7.8 टक्केतर एप्रिल-2023 मध्ये 8.11 टक्के इतका नोंदवला गेला होता.