अडचणीच्या काळात पैसे मिळावेत यासाठी हल्ली वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहे. मात्र तरीही लोकांचा पारंपरिक गुंतवणूक पर्यायांवर जास्त कल आहे. त्यापैकी एक म्हणजे सोने. सोने (Gold) हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो. म्हणून वर्षानुवर्ष लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देत आहेत. जेणेकरून अडचणीच्या काळात हेच सोने तारण ठेवून किंवा विकून आर्थिक अडचण सोडवता येते.
महत्त्वाचे म्हणजे तुम्ही बँकांमध्ये सोने तारण ठेवून कर्ज (Loan) घेऊ शकता. याचा फायदा असा की, तुमचे सोने सुरक्षितही राहते आणि तुमची आर्थिक अडचणही सोडवली जाते. कमीत कमी कागदपत्रे सादर केल्यानंतर ग्राहकांना कमी वेळेत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. विशेष म्हणजे कमी व्याजदर आणि दीर्घ कालावधीसाठी ही सुविधा ग्राहकांना देण्यात येते. ग्राहकांच्या सोन्याचे प्रमाण आणि शुद्धता तपासून बँक कर्ज देते. तुम्हीही गोल्ड लोन घेण्याचा विचार करत असाल, तर विविध 10 बँकांचे गोल्ड लोनवरील व्याजदर, प्रक्रिया शुल्क आपण जाणून घेणार आहोत.
गोल्ड लोनवरील बँकांचे व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क जाणून घ्या

- एसबीआय बँक (SBI) गोल्ड लोनवर 8.75% ते 16% पर्यंत व्याजदर आकारते आणि त्यासोबतच 1% प्रक्रिया शुल्क घेते
- कोटक महिंद्रा बँक गोल्ड लोनसाठी 8% ते 17% पर्यंत व्याजदर आकारते, तर 2% प्रक्रिया शुल्क आणि GST घेते
- युनियन बँक गोल्ड लोनवर 8.40% ते 9.65% व्याजदर आकारते, तर प्रक्रिया शुल्क कर्जाच्या 0.50% घेते
- एचडीएफसी बँक (HDFC) गोल्ड लोनवर 7.20% ते 11.35% व्याजदर आकारते आणि 1 टक्के प्रक्रिया शुल्क घेते
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया याकरिता 8.45% ते 8.55% व्याजदर आकारते आणि कर्जाच्या रकमेच्या 0.5 टक्क्यांपर्यंत प्रक्रिया शुल्क घेते
- युको बँक गोल्ड लोनसाठी 8.50% व्याजदर आकारते आणि प्रक्रिया शुल्क 250 ते 5000 रुपयांपर्यंत घेते
- इंडसइंड बँक गोल्ड लोनवर 8.75% ते 16% पर्यंत व्याजदर आकारते आणि प्रक्रिया शुल्क 1% घेते
- पंजाब अँड सिंध बँक गोल्ड लोनवर 8.85% व्याजदर आकारते आणि प्रक्रिया शुल्क 500 ते 10,000 रुपयांपर्यंत घेते
- फेडरल बँकेचा गोल्ड लोनवरील व्याजदर 8.89 % आहे, तर प्रक्रिया शुल्क 0.5% किंवा 1000 रुपये यापैकी जे जास्त असेल त्या रकमेनुसार चार्ज करते
- याशिवाय पंजाब नॅशनल बँक 9 % व्याजदरासोबत 0.75 % प्रक्रिया शुल्क आकारते
गोल्ड लोन अंतर्गत किती कर्ज घेता येते?
विविध स्त्रोतांमधून मिळालेल्या माहितीनुसार, सोने गहाण ठेवून त्यावर किमान 20,000 पासून ते कमाल 1 कोटी 50 लाखापर्यंत कर्ज घेता येते. अशा स्वरूपातील कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी हा बँकेवर आणि कर्ज घेणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतो. याशिवाय 25 लाखापेक्षा जास्त रकमेच्या कर्जासाठी ग्राहकाला बँकेकडे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) सादर करावे लागते आणि 5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल, तर Pan Card दाखवणे आवश्यक आहे. Pan Card शिवाय ग्राहकांना गोल्ड लोन मिळणे अवघड आहे.
Source: https://bit.ly/3JKPicF