Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cibil Score Range for Home loan: बँकेकडून गृहकर्ज घ्यायचंय, मग सिबिल स्कोअर किती असावा जाणून घ्या

Home Loan Cibil Score

Cibil Score Range for Home loan: कोणत्याही कटकटीशिवाय बँकेकडून कमी वेळेत गृहकर्ज मिळवायचे असेल, तर त्यासाठी सिबिल स्कोअर किती असावा याबद्दल माहिती जाणून घ्या.

तुम्ही घर घेण्याचा विचार करत आहात का? साहजिकच त्यासाठी गृहकर्ज (Home loan) घ्यावे लागेल. पण त्यापूर्वी तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर (Cibil Score) तपासला आहे का? कोणत्याही व्यक्तीला कर्ज (Loan) देताना बँका सर्वप्रथम त्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर तपासते आणि मगच कर्ज देते. सिबिल स्कोअरला क्रेडिट स्कोअर (Credit Score) असे सुद्धा म्हटले जाते. हा स्कोअर तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीच्या आधारे तयार केला जातो. सर्वसाधारणपणे बँका कोणत्याही व्यक्तीला कर्ज देताना मागील 36 महिन्यांची क्रेडिट हिस्ट्री तपासतात. गृहकर्ज मिळवण्यासाठी कोणता सिबिल स्कोर सर्वात चांगला याबद्दल आपण जाणून घेऊ.

बँकांसाठी सिबिल स्कोअर महत्त्वाचा

तुमचा सिबिल स्कोअर हा तुम्ही या पूर्वी घेतलेले कर्ज कसे घेतले आणि कसे फेडले याबद्दल बँकेला सविस्तर माहिती देतो. तुम्ही पेमेंट वेळेवर भरले की नाही यावरून तुम्हाला सिबिल स्कोअर रेटिंग किंवा क्रेडिट स्कोअर रेटिंग देण्यात येते. या रेटिंगनुसार तुम्हाला चांगले किंवा वाईट अशा स्वरूपातील रेटिंग मिळते. वाईट रेटिंगचा अर्थ असा की तुम्ही गृहकर्ज भरलेले नाही किंवा वेळेत भरले नाही. यामुळे बँका कर्ज देताना टाळाटाळ करण्याची शक्यता असते आणि चांगला सीबिल स्कोअर असेल, तर बँका सहज कर्ज उपलब्ध करून देतात.

हा सिबिल स्कोअर 3 अंकी न्युमरिक संख्या असते. याची सुरुवात 300 पासून होते; जी 900 पर्यंत असते. गृहकर्जाची रक्कम मोठी असून त्याचा कालावधी देखील दीर्घ असल्याने बँका अर्जदाराचा सिबिल स्कोअर तपासूनच त्याला गृहकर्ज (Home Loan) देतात. चांगला आणि वाईट सिबिल स्कोअर नक्की किती असतो, ते समजून घेऊयात.

सिबिल स्कोअरच्या श्रेणी समजून घ्या

सिबिल स्कोअरची श्रेणी ही 300 अंकापासून 900 अंकापर्यंत असते. 750 ते 900 दरम्यानचे रेटिंग उत्कृष्ट मानले जाते. त्यानंतर 650 ते 750 या श्रेणीतील रेटिंग देखील चांगले मानले जाते. सरासरी श्रेणीमध्ये 550 ते 650 हे रेटिंग येते. तर 350 ते 500 मधील रेटिंग खराब किंवा वाईट श्रेणीत मोडते. या रेटिंगमुळे अर्जदाराला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

गृहकर्जासाठी बँकांना लागतो 'इतका' सिबिल स्कोअर

तुम्ही गृहकर्जासाठी अप्लाय करत असाल, तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणे गरजेचे आहे. तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल, तर बँका तुम्हाला सहज कर्ज उपलब्ध करून देतील. Paisabazaar.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार 700 ते 900 दरम्यान अर्जदाराचा सिबिल स्कोअर असेल, तर बँका सहज आणि कमी वेळेत गृहकर्ज उपलब्ध करून देतात. त्यासाठी बँका कमीत कमी कागदपत्रे आणि कमी कालावधी घेऊन लवकर कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात.

700 च्या खाली रेटिंग असणाऱ्यांना बँकेकडून गृहकर्ज मिळवण्यासाठी बँकेच्या फेऱ्या माराव्या लावू शकतात. एवढेच नाही, तर अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. बऱ्याच वेळा कमी सिबिल स्कोअर असणाऱ्यांना बँका सर्वाधिक व्याजदर आकारतात.

सिबिल स्कोअर कुठे तपासायचा?

सिबिल स्कोअर स्मार्ट फोनमधील Google Pay या अ‍ॅपवर देखील तपासता येतो. याशिवाय CIBIL च्या अधिकृत वेबसाईटवरही सिबील स्कोअर तपासू शकतो.