सध्या आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी गुगल पे (Google Pay) चा वापर करत आहोत. अगदी काही मिनिटात या अॅपवरून आपली खरेदी-विक्रीचे बरीच कामे चुटकीसरशी पूर्ण होत आहेत. कोणाला मोबाईलचा रिचार्ज (Mobile Recharge) करायचा असेल, तर कोणाला लाईट किंवा गॅसचे बिल (Pay Gas or Light Bill) भरायचे असेल, तर कोणाला दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवायचे (Money Transfer) असतील, अशी सर्व कामे काही सेकंदात Google Pay च्या माध्यमातून पूर्ण करता येतात. पण तुम्हाला माहीत आहे का, याच अॅपचा वापर करून तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर (Cibil Score) सुद्धा तपासू शकता.
सिबिल स्कोअर पाहून बँका कर्ज (Loan) देतात. सिबिल स्कोअर चांगला असेल, तर कमी वेळेत आणि सहजपणे कर्ज उपलब्ध होते. पण आपला सिबिल स्कोअर चांगला की वाईट, हे कसं समजणार? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी सोप्पं आहे. Google pay च्या माध्यमातून अगदी काही सेकंदात तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर तपासू शकता.
सिबिल स्कोअर कसा तपासायचा?
- सर्वप्रथम तुम्हाला तुमचे Google Pay अॅप ओपन करावे लागेल. स्क्रीन स्क्रोल करत खाली गेल्यानंतर 'Check your cibil score for free' असा पर्याय पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यापुढे नवीन पेज ओपन होईल, ज्यावर 'Lets check your cibil score' असे लिहिलेले पाहायला मिळेल. या पर्यायावर क्लिक करा.
- आता नवीन पेज ओपन होईल. ज्यामध्ये तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर पाहायला मिळेल. तुमचे पॅनकार्डनुसार नाव आणि आडनाव याठिकाणी तुम्हाला भरावे लागेल आणि 'Continue' पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- ही माहिती भरल्यानंतर पुढे तुमच्या पॅन कार्डचे शेवटचे 5 अंक वेगवेगळ्या पर्यायांमध्ये पाहायला मिळतील. अचूक पर्यायाची निवड करून तुम्हाला 'Next' या बटनावर क्लिक करावे लागेल.
- पुढील पेजवर तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे; त्या बँकेच्या नावापुढील पर्यायावर क्लिक करावे लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर Continue या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा सिबिल स्कोअर जाणून घ्या.
चांगला सिबिल स्कोअर कसा ओळखायचा?
CIBIL Score तयार करताना खातेदाराच्या मागील 36 महिन्यांची क्रेडिट हिस्ट्री तपासली जाते. यामध्ये सर्व प्रकारची कर्जे, क्रेडिट कार्डचा खर्च, ओव्हरड्राफ्ट सुविधेचा वापर इत्यादींचा समावेश केलेला असतो. यात खातेधारकाने खर्च कसा केला आणि तो कसा तो पुन्हा जमा कसा आणि किती दिवसात केला, हे पाहिले जाते.
750 ते 900 या दरम्यानचा CIBIL स्कोअर उत्कृष्ट मानला जातो. त्यानंतर 650 ते 750 च्या श्रेणीतील CIBIL स्कोअर चांगल्या श्रेणीत मोडतो. 550 ते 650 चा CIBIL स्कोअर सरासरी श्रेणीत येतो आणि सर्वांत शेवटी 300 ते 500 यादरम्यानचा CIBIL स्कोर खराब मानला जातो. CIBIL स्कोअर जितका चांगला असेल, तितक्या पटकन कर्ज मिळण्यासाठी मदत होते.