डेब्ट म्युच्युअल फंडांतली गुंतवणूक या एप्रिल महिन्यात विक्रमी झाली, असंच म्हणता येईल. मिळालेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होतंय. एकीकडे इक्विटी फंडातली (Equity fund) गुंतवणूक घसरली तर डेब्ट म्युच्युअल फंडातली गुंतवणूक वाढलीय. दोन्हीच्या तुलनात्मक आकडेवारीनुसार, इक्विटी फंडातली गुंतवणूक जवळपास 57 टक्क्यांनी घसरून 6,480 कोटी रुपये झाली. तर डेब्ट म्युच्युअल फंडातली गुंतवणूक तब्बल 95 टक्क्यांनी वाढून 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलीय. मार्चमध्ये इक्विटी प्रकारात 20,534 कोटी रुपयांचा ओघ आला होता. त्याच महिन्यात गुंतवणूकदारांनी डेब्ट फंडातून 56,884 कोटी रुपये काढण्यात आले होते. डेब्ट फंडातल्या मजबूत ओघामुळे उद्योगाच्या व्यवस्थापनाखालच्या मालमत्तेनं (AUM) पहिल्यांदाच 41 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. व्याजदर आणि चलनवाढ यासारख्या प्रमुख निर्देशकांमधल्या बदलांमुळे डेब्ट फंडांत एवढी गुंतवणूक आल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
Table of contents [Show]
तज्ज्ञांचं मत काय?
याविषयी सॅमको म्युच्युअल फंडाचे (SAMCO MF) सीईओ विराज गांधी म्हणतात, की एप्रिल महिन्यात कर्ज योजनांमधली गुंतवणूक वार्षिक आधारावर 95 टक्क्यांनी वाढून 1,06,677 कोटी रुपये होईल. यामुळे पहिल्यांदाच उद्योगाच्या एयूएमनं 41 लाख कोटींचा टप्पा ओलांडलाय. गेल्या महिन्यात एलटीसीजी (LTCG) माफ करूनही या विभागातला अशाप्रकारचा प्रवाह गुंतवणूकदारांचा मूड कसा पुढे जाणार आहे, याचा एक मजबूत संकेत आहे. सध्याच्या व्याजदराच्या चक्रात पिक-आऊटची चिन्हे आणि चलनवाढीच्या आकडेवारीत थोडासा दिलासा हे कर्जाभिमुख योजनांमध्ये अशा मोठ्या गुंतवणुकीचं मुख्य कारण असावं, असं त्यांनी सांगितलं.
कर्ज बाजारात वातावरण चांगलं
डेब्ट फंडातल्या गुंतवणुकीवर मोतीलाल ओसवाल एएमसीचे मुख्य बिझनेस ऑफीसर अखिल चतुर्वेदी म्हणतात, की कर्ज बाजारात चांगलं वातावरण होतं. याचाच फायदा गुंतवणूकदारांनी घेतला. डेब्ट फंडांच्या कर आकारणीच्या नियमांमध्ये बदल झाल्यानं गुंतवणूकदारांनी हायब्रीड फंडांमध्ये एलोकेशन वाढवलं. त्यामुळे डेब्ट फंडातल्या गुंतवणुकीलाही चालना मिळाली.
कोणत्या प्रकारात किती गुंतवणूक?
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (AMFI) आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर डेब्ट फंडात गुंतवणूक करण्यात आलीय. या प्रकारात एकूण 1,06,677 कोटी रुपयांचा ओघ नोंदवण्यात आला. मार्चमध्ये गुंतवणूकदारांनी डेब्ट फंडातून 56,884 कोटी रुपये काढले होते. एप्रिलमध्ये हायब्रीड योजनांमध्ये एकूण 3,316 कोटी रुपयांचा ओघ होता. मार्चमध्ये या श्रेणीतून 12,372 कोटी रुपये काढण्यात आले.
लिक्विड फंडांमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक
डेब्ट फंडांच्या प्रकाराच्या आधारे गुंतवणुकीबद्दल बोलायचं झाल्यास लिक्विड फंडांमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक 63,219 कोटी रुपये, मनी मार्केट फंडांमध्ये 13,961 कोटी रुपये, अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड्स 10,662 कोटी रुपये आणि ओव्हरनाइट फंडांमध्ये 6,107 कोटी रुपयांची नोंद करण्यात आलीय.