चांगले आणि उच्च शिक्षण ही काळाची गरज झाली आहे. मात्र, सद्यस्थितीत शिक्षणासाठी येणारा खर्चही मोठा आहे. त्यामुळे बहुतांश पालक आपल्या पाल्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी शैक्षणिक कर्ज (Education Loan ) काढण्याचा विचार करतात. त्यातच आता मार्केटमध्ये शैक्षणिक कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांचे पेव फुटले आहे. त्यामुळे शैक्षणिक कर्जाची निवड कशी करावी हा प्रश्न सर्वांपुढेच उभा राहतो. त्यामुळे आज आपण योग्य शैक्षणिक कर्जाची निवड कशी करावी याबाबतची माहिती जाणून घेऊयात..
Table of contents [Show]
ऑनलाईन पडताळणी
इंटरनेटमुळे सर्व प्रकारचे व्यवहार ऑनलाईन होत आहेत. त्याप्रमाणेच बँकिंगच्या सुविधा देखील ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत. तसेच इंटरनेटच्या सहाय्याने कोणत्याही माहितीचा शोध घेणे अथवा तुलनात्मक पडताळणी करणे अगदी सोपे झाले आहे. त्यामुळे शैक्षणिक कर्ज (Education Loan) घेण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्ही कोणकोणत्या वित्तीय संस्था शैक्षणिक कर्ज देत आहेत. त्यामध्ये व्याजदर, कर्जाच्या अटी आणि करामधून सवलत, परतफेडीच्या नियम अटी यासह ऑफर्स याबाबतची पडताळणी आधीच करून घ्या ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार कर्ज मिळवण्यास मदत होईल.
कर्जाची रक्कम निश्चित करणे-
शिक्षणसाठी कर्ज कढण्यापूर्वी तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेल्या कर्जाची रक्कम ठरवणे गरजेचे आहे. तुम्हाला एका शैक्षणिक वर्षासाठी नक्की किती खर्च येणार आहे. तुम्ही किती खर्च टाळू शकता, कुठे पैसा आवश्यक आहे, अशा काही महत्त्वाच्या गोष्टीची एक यादी तयार करा. त्यानुसार तुमच्या कर्जाचा आकडा निश्चित करा. त्यामुळे तुम्हाला सर्वोत्कृष्ट बँक किंवा वित्तीय संस्थेकडे कर्जासाठी अर्ज करण्यास मदत होऊ शकेल.
व्याजदर?
योग्य शैक्षणिक कर्जाची निवड करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जासाठी आकारला जाणारा व्याजाचा दर किती आहे. याशिवाय व्याजदर एकतर फिक्स किंवा किंवा फ्लोटिंग पद्धतीने आकारला जाऊ शकतो. जर फ्लोटिंग व्याज आकारले जात असेल तर बाजारातील परिस्थितीनुसार त्याचे दर बदलत राहतात. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी व्याजदर समजून घ्या.
कर्जाची उपलब्धता
ज्यावेळी तुम्ही शैक्षणिक कर्ज काढण्याचा विचार करता. त्यावेळी वित्तीय संस्था कोण कोणत्या प्रकारचे कर्ज देत आहे, याची माहिती जाणून घ्या. जसे की समजा तुम्हाला परदेशात शिक्षणासाठी जायचे असेल, तर कोणती बँक परदेशातील शिक्षणासाठी कर्ज देते. तसेच तुम्ही जे शिक्षण घेणार आहात. त्यासाठी बँकेचे कर्ज उपलब्ध आहे का? त्याबाबतचे नियम अटी काय आहेत हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. बहुतांश बँका देशांतर्गत आणि परदेशातील विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी कर्जे मंजुर करतात.
कर्जाचे वितरण
शिक्षण कर्जासाठी एखाद्या वित्तीय संस्थेकडे अर्ज करण्यापूर्वी त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या कर्जाच्या वितरणाची पद्धत कशी आहे हे जाणून घ्या. काही बँका थेट शैक्षणिक कर्जाची रक्कम, संबंधित शैक्षणिक संस्था, महाविद्यालय किंवा विद्यापीठाला वितरित करतात. तर काही बँका तुमच्या खात्यामध्ये जमा करतात.
कर्जासाठी आवश्यक मार्जिन
शिक्षण कर्ज निवडताना संबंधित वित्तीय संस्थेकडून कर्जासाठी मार्जिन म्हणून रक्कम भरण्यासाठी विचारणा करतात. कर्जाची रक्कम आणि बँकेच्या नियम अटीनुसार यामध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे तुमचे कर्ज मंजूर होण्यापूर्वी याबाबतचा तपशील जाणून घ्या.
परतफेडीचे पर्याय आणि अतिरिक्त शुल्क
शिक्षण कर्जासाठी वित्तीय संस्थांकडून कर्जाच्या परत फेडीचा कालावधी किती दिला जात आहे याची खात्री करा. परत फेडीचा कालावधी जास्त असल्यास तुम्ही कमी रकमेसह EMI भरू शकता. मात्र, तुमच्याकडे पैशाची सोय होत असेल तर तुम्ही परतफेडीचा कमी कालवधीची निवड करू शकता. यामुळे तुमचे कर्ज लवकर फिटेल. या कालावधी सोबत कर्ज मंजुरीसाठी प्रक्रिया शुल्क, प्रीपेमेंट शुल्क आणि हप्ते चुकल्यास दंड किती आकारला जातो याचीही माहिती घेणे गरजेचे आहे.
अशा प्रकारे वरील सर्व बाबींचा विचार करून तुम्ही शिक्षण कर्जाची निवड केल्यास तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये कर्जाची निवड करताय येऊ शकले.