Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Electricity Bill For Farmers : या उन्हाळ्यात शेतीसाठीचं वीज बिल कसं कमी कराल?

Farm Electricity

Image Source : http://www.mpp.nls.ac.in/

Electricity Bill For Farmers : अनेकांची अशी समजूत आहे की, शेतकऱ्यांना वीज बिल माफ आहे. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, शेतीसाठी लागणारी अवजारं, पाणी उपसणारे पंप यामुळे शेतीसाठी जास्त वीज लागते. आणि शेतकऱ्याचं वीज बील प्रचंड येतं. शेतीसाठीच्या वीज बिलाची समस्या आणि हा प्रश्न कसा सोडवता येईल ते पाहूया

Electricity Bill For Farmers : राज्यात आता आधुनिक पद्धतीने शेती होते. पाणी उपशासाठी पंप तसंच लागवड, कापणी यासाठीही विविध कृषि अवजारं वापरली जातात. पण, या गोष्टीचा एक अर्थ शेतकऱ्याचं वीज बिल वाढतं. गावात अनेक ठिकाणी विजेचाही तुटवडा असतो. आठवड्यातून तीन-चार दिवसच वीज उपलब्ध असते.

अशावेळी शेतीच्या कामाचं व्यवस्थापनही कठीण होऊन बसतं. आणि विजेचं बिलही परवडेनासं होतं ते वेगळंच. शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या नेमक्या काय आहेत? त्यावर उपाय कोणते? यासाठी महामनीने विदर्भातल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. वीज पुरवठ्यातली अनियमितता शेतकऱ्यांना सतावतेय.

शेतकऱ्यांना विजेची काय समस्या आहे? 

विजेची वेळ अनियमित… 

गावात वीज पुरवठ्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. कधी वीज सकाळी येते तर कधी संध्याकाळी. आणि त्याप्रमाणे शेतीच्या कामाच्या वेळा जुळवून घ्याव्या लागतात. अमरावतीतल्या महिला शेतकरी मीनल चरपे यांची विजेच्या वेळा सांभाळताना तारांबळ उडते.

‘आमच्या भागात आठवड्यातून चार दिवस संध्याकाळी आणि तीन दिवस दुपारी वीज येते. कधी कधी अचानक यांचं वेळापत्रक बदलतं. माझ्यासारख्या महिलेला रात्री उशिरा शेतात थांबणंही शक्य होत नाही,’ मीनल महामनीशी बोलताना म्हणाल्या.

त्यांची एक शेजारी शेतकरी महिला रेखा साबळे यांनाही हीच समस्या भेडसावते. ‘सकाळ आणि दुपारच्या वेळी वीज सुरळीत आणि जास्त वेळ हवी,’ असं रेखा यांचं म्हणणं होतं. शेतकऱ्यांनी अनेकदा ही मागणी संघटितपणे आणि अगदी अधिवेशनाच्या काळातही केली आहे.

farm-electricity-single-img.jpg
http://www.newindianexpress.com/

विजेचा शॉक बसण्याचे प्रकार वाढले… 

अनियमितता हा मुद्दा खरंतर पुरुषांनाही सतावतो. कारण, सगळ्यांचीच शेतं घराच्या जवळ असतील असं नाही. पाण्याच्या नाहीतर विजेच्या वेळा बघून शेतकऱ्यांना घरातून शेताकडे धावावं लागतं. कधी कधी रात्री शिवारातच मुक्काम ठोकावा लागतो. आणि त्यात वाईट म्हणजे वीज पुरवठा सुरक्षित नसतो. त्यामुळे अपघात वाढतायत.

गडचिरोलीतील श्रीकांत धोडरे म्हणतात की, ‘पावसाळ्यात वीजपुरवठा अत्यंत कमी दिला जातो. DP मधून झालेले प्रॉब्लेम लवकर सोडवले जात नाही. आमच्या गावात त्यामुळे मजूर आणि शेतकऱ्यांचे मृत्यूही ओढवलेले आहेत. हे खूप काळजीपूर्वक करायचं काम आहे.’

विजेची जोडणीही नीट झालेली नसते. वीज गळतीच्या घटना आहेत. आणि या सगळ्यामुळ पंप जळणे, अवजारांचा स्फोट होणे असे प्रकार वाढतायत. वीज पुरवठा यंत्रणेनंही या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

वीज दरवाढीचा शॉक… 

सर्व सामान्यांना नवीन आर्थिक वर्षांपासून वीज दर वाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. कोरोंना काळातील आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी ‘महावितरण’ कंपनीने वीजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन वर्षासाठी सरासरी ही दरवाढ 37 टक्के आहे. यामुळे घरगुती, व्यावसायिक, शेतकरी सर्वानाच दरवाढीचा धक्का बसण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांसाठी तर दरवाढीचा शॉक मोठा असेल. आधीच उत्पन्न कमी आणि त्यात वीज दरवाढीचा झटका अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे.

शेतकऱ्यांना शेतातील  विजेसाठी किती पैसे मोजावे लागतात? 

शेतकऱ्यांना घरगुती विजेच्या तुलनेत शेतीतील विजेसाठी कमी पैसे द्यावे लागतात. 1.95 रुपये ते कमाल 3.29 रुपये प्रति युनिट असा शेतातील विजेचा दर असतो. दर तीन महिन्याने त्याचे रीडिंग नेले जाते आणि विजबिल दिले जाते.

घरगुती विजेच्या तुलनेत फट युनिट कमी असते बाकी प्रोसेस घरगुती विजेप्रमाणे केली जाते. दर तीन महिन्याला शेतातील विजेचे बिल हे आपण केलेल्या वापरानुसार येते. लाइट, पाणी, मोटर, मशीन या सर्व यंत्रांवर अवलंबून असते. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचं वीज बिल आल्याच्या घटना महाराष्ट्रातच पूर्वी घडलेल्या आहेत.

farmer-electricity-bill.jpg

विजेच्या दरात होणार वाढ… 

उच्चदाब औद्योगिक श्रेणीतील ग्राहकांना आता सध्याच्या 6.89 रुपये प्रतियुनिटवरून 9.32 व त्यानंतरच्या वर्षी 10.50 रुपये प्रति युनिट इतका असेल. लघु दाब श्रेणीतील शेतकऱ्यांसाठीचे दर देखील किमान 1.95 रुपये ते कमाल 3.29 रुपये प्रति युनिटवरून 2.70 रुपये ते 4.50 रुपये प्रति युनिट करण्याबाबत नमूद आहे. शेतातील विजेचे रीडिंग दर तीन महिन्याने घेतले जाते. घरगुती वीज पुरवठ्याचे रीडिंग घेणाऱ्या व्यक्तीच्या तीन पट पैसे शेतातील रीडिंग घेणाऱ्या व्यक्तीला दिले जाते.

वीजबिलातून सुटका होण्यासाठी उपाय

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा योजनेंतर्गत सौरऊर्जेला प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी शासनाकडून अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना सोलर पॅनल बसविण्यासाठी देण्यात येत आहे. या भागात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारच्या या महाअभियानाला आता महाराष्ट्र सरकारही पुढे नेत आहे. 

शेतकऱ्यांना 24 तास सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना अनुदानित सौरपंप देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे, त्यांच्या शेतात कमी खर्चात सौर पंप बसवले जातील, जेणेकरून त्यांना सिंचनासाठी मोफत वीज मिळेल.

5 लाख शेतकऱ्यांना सौरपंप… 

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकार राज्यातील 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात ही घोषणा केली होती.

यादरम्यान त्यांनी महाराष्ट्र सरकारला असे सौर पंप उभारण्यासाठी जमीन भाडेतत्त्वावर देऊन अतिरिक्त महसूल मिळेल, असे सांगितले होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विदर्भात राहणार्‍या शेतकर्‍यांना प्राधान्याने नवीन सौर पंप आणि वीज जोडणी दिली जाईल.

solar-panel-process.jpg

मार्च 2023 पर्यंत प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढले जातील असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, केंद्र सरकारने सुधारित वितरण क्षेत्र योजना किंवा आरडीएसएसच्या अंमलबजावणीची घोषणा केली आहे. यासाठी महाराष्ट्रासाठी 39 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. फडणवीस म्हणाले की, सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळेल.