राज्यात पुन्हा एकदा वीज दरवाढ (electricity bill hike) होणार असल्याने महावितरणची वीज महागणार असल्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. किमान 60 पैसे प्रति युनिट वाढ होणार असल्याने महावितरणचे मासिक बिल 200 रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे आधीच महागाईने होरपळलेल्या नागरिकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. असे झाल्यास सरकारकडून वर्षातील दुसरा विजेचा झटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
इंधन समायोजन शुल्कात 2 रुपयांनी वाढ
राज्य सरकारने यापूर्वी एप्रिल, 2022 मध्ये महावितरणने इंधन समायोजन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते. पण 2021 मध्येच तो निधी संपल्याने महावितरणने एप्रिल, 2022 पासून इंधन समायोजन शुल्क म्हणून 1.30 रुपये प्रति युनिट आकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महावितरणच्या ग्राहकांना वीजदरवाढीचा सामना करावा लागला. आता पुन्हा पुढील महिन्यापासून इंधन समायोजन शुल्कात 60 ते 70 पैशांची वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास इंधन समायोजन शुल्क 2 रुपयांहून अधिक होण्याची शक्यता आहे. वीज खरेदीसाठी लागणाऱ्या 40 हजार कोटी रुपयांसाठी वीज दरवाढ (electricity bill hike in maharashtra) केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
सरकारचे 40 हजार कोटी रुपयांचे नुकसान!
राज्यात उन्हाळ्यात विजेची मागणी वाढली. तेव्हा कोल इंडियाकडून केवळ 20 टक्के कोळसा पुरवण्यात आला होता. त्यामुळे महानिर्मितीने 20 हजार कोटी रुपये खर्च करून बाहेरून कोळसा खरेदी केला होता. त्यातच क्रॉस सबसिडीतील पैसा न मिळाल्याने महानिर्मितीला आणखी 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले, अशी माहिती ज्येष्ठ वीज क्षेत्राचे अभ्यासक अशोक पेंडसे यांनी एका न्यूजपोर्टला दिली.
जुलैमध्येच केली होती दरवाढ!
यापूर्वी महावितरणने जुलै 2022 पासून 1.35 रुपये प्रति युनिट वाढ केली. यातून इंधन दर आकारण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात या दरवाढीची मुदत संपणार आहे. त्यामुळे महावितरणने इंधन समायोजन आकार वाढवला तर 1.90 रुपये प्रति युनिट वीज दर वाढेल. हा निर्णय न झाल्यास पुढील वर्षी वीजदरवाढ होणे अटळ असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. त्यामुळे राज्यातील नागरिकांना आता महागडी वीजबिले (Electricity bill payment) भरावी लागणार आहेत.