Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How To Manage Home Loan : गृहकर्जाचे हप्ते कमी करण्याच्या 4 सोप्या टिप्स  

Home Loan Tips

How To Manage Home Loan : आपलं घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने गृहकर्ज हे आवश्यक आणि महत्त्वाचं साधन आहे. पण, गृहकर्ज घेतल्यावर दर महिन्याला त्याचा हप्ता भरणं आलं. ‘या’ चार उपायांमुळे तुमचा गृहकर्जाचा हप्ताही थोडा सोपा जाऊ शकतो.

घर/फ्लॅट विकत घेणं किंवा बांधणं हा खूप मोठा आर्थिक तसंच भावनिक क्षण असतो. आणि त्याचबरोबर असते खूप मोठी आर्थिक गुंतवणूक. अनेकदा आपण घरासाठी गृहकर्जाचा (Home Loan) आसरा घेतो. पण, कर्जाबरोबर सुरू होतो दर महिन्याला भरायच्या इक्वेटेड मंथली इन्सटॉलमेंट (EMI) चा फेरा. आणि कर्जाच्या मुदतीप्रमाणे कित्येक वर्षं EMI चं भूत कुटुंबाच्या मानगुटीवर असतं. आज या भूताची भीती घालवण्याचे काही उपाय बघूया…    

आपल्या नेहमीच्या सरकारी तसंच खाजगी बँका, बँकेतर वित्तीय संस्था किंवा इतर कुठल्याही वित्तीय संस्थेकडून आपण गृहकर्ज घेत असतो. आणि 10 वर्षं ते 30 वर्षं अशी या कर्जावरची मुदत असते. कर्जावरचा व्याजदर प्रत्येक बँकेकडून वेगवेगळा आकारला जातो. आणि इथेच आपल्याला संधी आहे EMI वर बचत करण्याची. कर्ज घेताना कर्जाच्या प्रक्रियेची नीट माहिती करून घेतली, आपल्याला मिळणाऱ्या सुविधा समजून घेतल्या आणि आपल्या गरजेसाठी योग्य कर्जदार निवडलात तर तुमचा EMI चा भारही सोपा होऊ शकतो. कसा ते बघा!     

जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करा   

खासकरून फ्लॅट विकत घेताना बिल्डरने त्या गृहप्रकल्पासाठी एखाद्या बँकेबरोबर आधीच सहकार्य करार केलेला असतो. अशा बँका ग्राहकांना घराच्या एकूण किमतीवर 90% पर्यंत कर्ज देऊ करतात. म्हणजे तुम्हाला फक्त 10% डाऊन पेमेंट करावं लागतं. बाकी कर्जाच्या स्वरुपात तुम्हाला दिले जातात. सुरुवातीला 90% पैसे बँक भरणार ही गोष्ट सुखावह वाटू शकेल. पण, याचा पुढे जाऊन अर्थ असा होतो की, तुमची कर्जाची रक्कम वाढणार. आणि त्या प्रमाणात तुमचा EMI वाढणार. त्यामुळे गुंतवणूक तज्ज्ञ नेहमी असाच सल्ला देतात की, डाऊन पेमेंट जितकं शक्य असेल तितकं करा. आणि उर्वरित रकमेचंच कर्ज घ्या.     

योग्य बँकेची निवड    

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कर्ज देणाऱ्या बँकांची कर्जाची मुदत साधारणपणे सारखीच असते. पण, व्याज दर वेगवेगळा असतो. त्यामुळे तुम्ही गृहकर्ज बाजारपेठेचा चांगला अभ्यास केल्याशिवाय कर्जं घेऊ नका. जिथे तुम्हाला कमी व्याजदर मिळेल, असा पर्याय निवडा. बँकेची विश्वासार्हता नक्की तपासून बघा. आणि व्याजदराच्या बरोबरीने प्रोसेसिंग फी, इतर होणारा खर्च, एखादा हप्ता चुकला तर लागणारं विलंब शुल्क, काही दडलेल्या फी असतील तर त्याचा नीट अभ्यास करा. आणि सारासार विचार करून बँकेची निवड करा.     

काही वेळा कर्जाचे व्याजदर कमी होत असतील तर तुमचं कर्ज एका बँकेत सुरू असताना इतर बँका कमी दराने नवीन कर्ज द्यायला सुरुवात करतात. हा दर तुमच्या आधीच्या कर्जावर कमी असतो. अशा बदलणाऱ्या दरांवर लक्ष ठेवून बँकेशी त्वरित संपर्क साधा. ते कर्जाची पुनर्रचना करून देऊ शकतात. किंवा तुम्ही इतर बँकांमध्येही तुमचं कर्ज हस्तांतरित करू शकता. अशा बदलांबद्दल जागरुक राहा.     

EMI बदलता येतो   

म्हणजे हप्त्याची रक्कम बदलता येते. कर्जाचा हप्ता तुम्ही भरता तेव्हा त्यात काही टक्के मूळ मुद्दलाच्या परतफेडीमध्ये जात असतात. तर काही व्याजाच्या परतफेडीमध्ये. शिवाय अनेक बँका तुम्हाला गरजेप्रमाणे तुमच्या हप्त्याची रक्कम कमी-जास्त करण्याची सुविधा देतात. तुम्हाला आर्थिक अडचण असेल म्हणून पूर्ण हप्ता भरणं काही काळ शक्य असेल. तर बँका हप्ता कमी करतात आणि तुमची कर्जाची मुदत म्हणजे EMIची संख्या वाढवतात. किंवा तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असतील तर तुम्ही EMI ची रक्कम वाढवून कर्जाची मुदत कमी करू शकता. अर्थात, त्यासाठी काही नियम असतात. आणि काही ठिकाणी तुम्हाला या बदलांसाठी थोडं शुल्कही भरावं लागतं. महत्त्वाच्या बँकांमध्ये तुम्ही नियमित वार्षिक 12 हप्त्यांच्या व्यतिरिक्त तीन अधिकचे हप्ते वर्षाला भरू शकता. यातून तुमच्या कर्जाचा भार थोडा हलका होऊ शकतो.     

अगदी गरज असेल तरंच EMI कमी करून घ्या. अन्यथा लवकरात लवकर कर्जातून बाहेर पडण्यासाठी तो आहे तसा नियमित भरणं किंवा शक्य तिथे अधिकचे हप्ते भरून कर्जातून सुटका करून घेणं हेच चांगलं, असा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञ देतात.    

कर्जाच्या मुदतीची योग्य निवड    

बहुतेक बँका 10 - 30 वर्षांच्या मुदतीची कर्ज देऊ करतात. तुम्हाला त्यातून योग्य मुदतीची निवड करायची आहे. अनेकदा तुम्ही कर्ज घेतल्यानंतरही ही मुदत कमी - जास्त करू शकता. तुमची परतफेडीची क्षमता तपासून हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे.     

जर जास्त मुदतीचा पर्याय निवडलात तर हप्ता कमी बसेल. पण, कर्ज दीर्घकाळ चालेल. आणि कमी मुदतीचा पर्याय निवडलात तर हप्ता जास्त बसेल पण, तुम्ही कर्जातून लवकर सुटाल. तुमच्या आर्थिक क्षमते प्रमाणे हा पर्याय निवडा.     

आणि महत्त्वाचं म्हणजे कर्जाबरोबरच सुरक्षा म्हणून गृहकर्जावरचा विमा आणि ज्याच्या नावावर कर्ज आहे, त्याच्या नावाने टर्म विमा घ्यायला विसरू नका.