रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India-RBI) गेल्यावर्षी महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी रेपो रेट (Repo Rate)मध्ये भरघोस वाढ केली. सात महिन्यांत रेपो रेट चार टक्क्यांनी वाढला आणि तो 6.25 टक्क्यांवर पोहोचला. बॅकांनी देखील लगेच सर्वसामान्यांवर व्याजदरवाढीचा बोजा लादला. त्यामुळे गृहकर्जाबरोबरच अन्य प्रकारचे कर्ज ही महाग झाले. या व्याजदर वाढीचे दोन वेगवेगळे परिणाम ग्राहकांच्या कर्जावर झालेले दिसून येत आहेत. एक म्हणजे काही जणांच्या मासिक हप्त्यात वाढ झाली तर काही जणांच्या कर्जाचा कालावधी वाढला.
Table of contents [Show]
इएमआय कॅलक्युलेटर (EMI Calculator)
व्याजदरात वाढ होते तेव्हा एखादी बँक कर्जाचा हप्ता वाढवत नाही. बँकेकडून हप्त्याची रक्कम कायम ठेवली जाते, मात्र कर्जाचा कालावधी हा गुपचुपपणे वाढविला जातो. जानेवारी 2022 मध्ये एखाद्या व्यक्तीने 20 वर्षांसाठी गृहकर्ज घेतले असेल तर आजघडीला त्याच्या कर्जफेडीचा कालावधी हा 33 वर्षाचा झाला असेल. अशा वेळी प्रीपेमेंट हे खूपच लाभदायक ठरेल.
गृहकर्जाचा व्याजदर (Home Loan Interest Rate)
एप्रिल 2022 मध्ये रेपो रेट 4 टक्के होता. तेव्हा गृहकर्जाचा व्याजदर हा 6.70 टक्के होता. वीस वर्षांसाठी दहा लाखांच्या कर्जावर दरमहा 7,574 रुपये हप्ता द्यावा लागत हाता. मे महिन्यांत पहिल्यांदा रेपो रेट वाढून तो 4.4 टक्क्यांवर पोचला. गृहकर्जावरचा व्याजदर हा 7.10 टक्यांवर पोचला. याप्रमाणे हप्ता हा 7813 रुपये झाला. मात्र हप्ता कायम ठेवला तर वीस वर्षाच्या कालावधीला आणखी 16 महिने जोडले जातील म्हणजे 16 हप्ते.
गृहकर्जाचा हप्ता (Home Loan EMI)
जून 2022 मध्ये रेपो रेट वाढून तो 4.90 टक्के झाला. गृहकर्जाचा व्याजदर वाढून तो 7.60 ट्क्कयांवर पोचला. प्रत्येक महिन्याच्या हप्ता हा 8117 रुपये झाला. हप्त्यात बदल केला नाही तर वीस वर्षाच्या कालावधीला आणखी 25 महिने जोडले जातील. ऑगस्ट महिन्यांत रेपो रेटमध्ये 5.40 टक्के झाला. त्यामुळे गृहकर्जाचा व्याजदर हा 8.10 टक्क्यांवर पोचला. हप्ता वाढून तो 8427 रुपये होतो. हप्ता स्थिर ठेवल्यास आणखी तीन वर्षे जोडले जातील.
पुन्हा रेपो रेटमध्ये वाढ (Repo Rate Hike)
सप्टेंबर महिन्यांत रेपो रेट वाढवत तो 5.90 टक्के केला. गृहकर्जाचा व्याजदर हा किंचित वाढला आणि तो 8.40 टक्क्यांवर पोचला. दहा लाखांचा वीस वर्षांसाठीचा दरमहा हप्ता हा 8615 रुपये झाला. हप्ता स्थिर राहिल्यास हप्ते आणखी वाढतात. डिसेंबर मध्ये रेपो रेट हा 35 बेसिस पॉइंटच्या आधारावर वाढविला आणि तो 6.25 टक्क्यांवर पोचला. गृहकर्जात 25 बेसिस पॉइंटची वाढ झाली आणि व्याजदर 8.65 टक्क्यांवर पोचला. याप्रमाणे हप्त्याची रक्कम 8773 झाली. हप्ता स्थिर राहिला तर आणखी 36 हप्ते जोडले जातील.
एकूण एखाद्याने जानेवारी 2022 मध्ये 6.7 टक्के दराने वीस वर्षांसाठी (240 महिने) दहा लाखांचे कर्ज घेतले असेल तर त्याला दरमहा 7574 रुपये जमा करावे लागतील. तोच हप्ता आता 8773 रुपये झाला आहे. जर हप्त्याची रक्कम 7574 रुपये निश्चित असेल तर कर्जाचा कालावधी हा 149 महिन्यांनी वाढेल. म्हणजे कर्जदाराला 240 महिन्याऐवजी 389 महिने हप्ते जमा करावे लागतील. म्हणजे वीस वर्षाचे कर्ज हे 33 वर्षापर्यंत पोचले.