Layoff Money Mgmt: चालू वर्षात भारतातील कॉर्पोरेट कंपन्यांनी सुमारे 2 लाख कर्मचाऱ्यांना कामावरून टाकल्याचे अनेक अहवालातून पुढे आले आहे. जॉब मार्केट अस्थिर असून कधीही कोणाचीही नोकरी जाऊ शकते. मग ज्युनिअर असा अथवा सिनियर लेऑफची कुऱ्हाड कधीही कोसळू शकते. अशा वेळी आर्थिक नियोजन करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात ते पाहूया.
अनुभवी तसेच नुकतेच नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्यांनाही कंपनीने कामावरून काढून टाकल्याची अनेक उदाहरणे तुम्ही पाहीली असतील. मात्र, जर मुलांचे शिक्षण, कौटुंबिक जबाबदाऱ्या होमलोन, कारलोन किंवा इतर आर्थिक जबाबदाऱ्या असतील तर जॉब गेल्यानंतर पैशांची अडचण वाढू शकते.
एज्युकेशन लोन असताना नोकरी गेल्यास
ज्या विद्यार्थ्यांनी एज्युकेशन लोन घेऊन शिक्षण पूर्ण केले असेल त्यांनाही ले ऑफ नंतर आर्थिक बाजू सांभाळताना करसत करावी लागू शकते. (Manage finances In layoff period) कारण, शैक्षणिक कर्जाचे हप्ते नोकरी लागल्यानंतर फेडावे लागतात. हप्ते थकले तर सिबिल स्कोअर खराब होऊन वित्तसंस्था भविष्यात सहज कर्ज देणार नाही. ही आर्थिक कोंडी सोडवण्यासाठी नक्की काय करायला हवं ते पाहूया.
तुमच्या आर्थिक गरजांचा नक्की अंदाज घ्या.
सर्वसाधारणपणे तुमचे 6 महिन्याचे कौटुंबिक खर्च भागतील एवढे पैसे एमर्जन्सी फंडात ठेवा, असा सल्ला आर्थिक सल्लागार देत असतात. अशी रक्कम तुमच्याकडे आधीपासून असेल तर तुम्हाला मोठा हातभार लागेल. तसेच घरभाडे, गृह, वाहन किंवा इतर कर्जाचे इएमआय, वीज, गॅस, मोबाइलसह इतर बिल्स, विमा हप्ता आणि इतर कौटुंबिक खर्च महिन्याला किती लागतो याचा निश्चित अंदाज बांधा. काही खर्च कमी करता येतात का? ते पाहा.
तसेच तुमचे बचत खाते, एमर्जन्सी फंड, घरातील कॅश, मुदत ठेवींमध्ये किती पैसे आहेत त्याचा हिशोब लावा. सोबतच जर ले ऑफ दरम्यान कंपनीने एकरकमी पैसे दिले असतील तर ती रक्कमही हिशोबात धरा.
1) हॉटेलमधील जेवण, शॉपिंग, मनोरंजनावरील खर्च कमी करा.
2) घरभाडे, विविध बिल्स, EMI आणि निश्चित खर्च भागवण्यास प्राधान्य द्या. जॉब असतानाची जीवनशैली चालू ठेवण्यास आवर घाला.
3) तुमच्याकडील सर्व सेव्हिंग लिक्विड फंडात ठेवा. कारण, जेव्हा गरज पडेल तेव्हा तत्काळ पैसे काढता येतील आणि बचत खात्यापेक्षा व्याजदर चांगला मिळेल.
4) SIP आणि इतर काही गुंतवणूक सुरू असतील तर त्या तात्पुरत्या थांबवा. एसआयपी पॉझ करता येते. नवा जॉब लागल्यानंतर तुम्ही पुन्हा गुंतवणूक सुरू करू शकता.
5) महिन्याला जेवढा खर्च आहे तेवढेच पैसे खात्यातून काढण्याची शिस्त बाळगा.
6) नवी नोकरी मिळवण्यासाठी जर काही कौशल्य आत्मसात करण्यासाठी कोर्स करावा लागणार असेल तर त्यासाठीही पैसे खर्च करू शकता.
7) नवा जॉब मिळण्यामध्ये जास्त दिवस लागत असतील आणि सेव्हिंग संपत आली तर मित्र आणि नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करा. पण, कर्ज घेऊ नका. अन्यथा, तुम्ही आणखी अडचणीत येऊ शकता.
8) नोकरी शोधत असताना काही फ्रिलान्स काम मिळाले तर ते करतानाही नवी नोकरी शोधू शकता. त्यामुळे काही पैशांचा हातभार लागेल.
विमा अत्यावश्यक
जॉब गेल्यामुळे कदाचित कंपनीकडून मिळणारे आरोग्य विम्याचे कवच संपुष्टात येऊ शकते. (Manage finances In layoff period) अन्यथा, कंपनीकडून मिळणारा विमा तुम्ही प्रिमियम भरून पुढे सुरू ठेवू शकता. मात्र, आरोग्य विमा नक्की सुरू ठेवा. नोकरी नसताना काही कौटुंबिक हेल्थ एमर्जन्सी उभी राहिली तर सर्व बचत रुग्णालयाचे बिल भरण्यात जाईल. विवाहित असाल तर फॅमिली फ्लोटर पॉलिसी निदान असावी.
आणीबाणीची तयारी आधीपासून करा
या सर्व आर्थिक बाजू सांभाळत असताना नवी नोकरीही जोमाने शोधा. आवश्यक असेल तर अपडेटेड कोर्सेस करा. लिंक्डइन, जॉब साइटवरती रेझ्युमे अपडेट करा. पर्सनल नेटवर्क द्वारे नोकरी मिळवण्याचाही प्रयत्न करा.
अनुभव असेल तर जास्त अडचण येणार नाही. मात्र, सहा महिने ते 1 वर्ष आर्थिकदृष्ट्या स्वत:ला सावरता येईल एवढी तयारी ठेवा. जॉब गेल्यावरच जागे होण्याची गरज नाही. आणीबाणी सांगून येत नाही. या गोष्टींची जाणीव ठेवून आधीच तयारीला लागा. आणि हो. सहा महिन्यांचा खर्च आणीबाणी फंडात ठेवण्यास विसरू नका.