एखाद्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये अथवा मोठ्या बंगल्यात आपले अलिशान घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते. पण आयुष्यभर कमाई करूनही काहींची घर घेण्याची इच्छा पूर्ण होत नाही अथवा एखाद्या छोट्याशा घरात त्यांना आयुष्य काढावे लागते. आजकाल तर अनेक बँका खूप कमी व्याजावर घर घेण्यासाठी कर्ज देत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आजकाल घर घेणं सोपं झालं आहे. पण बँकांकडून कर्ज मिळत असले तरी सुरुवातीचे काही पैसे (डाऊन पेमेंट) आणि रजिस्ट्रेशन , स्टॅम्प ड्युटी यासाठी तुम्हाला पैसे हे जमा करावेच लागतात. हे पैसे कशाप्रकारे जमा करायचे हा प्रश्न अनेकांना पडत असतो. त्यामुळेच तुमचे घर घेण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला आज काही टिप्स देणार आहोत. तुम्ही थोडीशी बचत केली आणि योग्यप्रकारे आर्थिक नियोजन केले तर तुम्ही देखील प्रशस्त घर घेऊ शकता.
प्राथमिकता
एकदा घर घ्यायचा असा निर्णय घेतला की , कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही यासाठी प्रयत्न करावा. आपले घर घेणे हीच आपली प्राथमिकता आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. काहीजण एकाच वेळी अनेक गोष्टी विकत घेण्याचा प्रयत्न करतात. पण असे केले तर तुमची कोणतीच इच्छा पूर्ण होणार नाही. घर , गाडी , फिरायला जाणे यांसारख्या सगळ्याच गोष्टी पुढच्या वर्षी करायच्या असे ठरवले तर प्रत्येक गोष्टीसाठी किती पैसे बाजूला ठेवायचे याचा योग्य हिशेब करता येत नाही. त्यामुळे आपली प्राथमिकता काय आहे हे ओळखावे. तुम्हाला घर घ्यायचे आहे असे एकदा ठरवले की , बाकी गोष्टींकडे काही काळ तरी दुर्लक्ष करावे.
कर्जांची परतफेड करा
एकावेळी अनेक हफ्ते भरणे आपल्याला परवडत नाही. त्यामुळे घर घेण्याआधी तुम्ही आधी कोणकोणती कर्जं घेतली आहेत आणि त्यासाठी तुम्ही किती हफ्ता देतात. कर्जांचा व्याजदर काय आहे हे एका कागदावर लिहून काढा आणि त्यातून तुम्हाला कोणत्या कर्जांची परतफेड करणे शक्य आहे ते तपासून पाहा. जास्त व्याजदर असलेल्या कर्जांची परतफेड आधी करा. तसेच तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि त्याचे पैसे भरायचे शिल्लक राहिले असतील तर क्रेडिट कार्डचे पैसे भरून टाका आणि नवीन कोणत्याही खरेदीसाठी क्रेडिट कार्ड वापरणे टाळा.
एकच गाडी वापरा
अनेकवेळा घरात एकाहून अधिक गाड्या असतात. पती-पत्नी दोघे वेगवेगळ्या गाडी वापरत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे शक्य असेल तर घरातील एखादी गाडी विकण्याचा विचार करा. यामुळे तुमचा खर्च कमी होऊन तुमचे पैसे वाचू शकतील. तसेच रेल्वे , बस यांसारख्या सार्वजिनक वाहतुकीच्या साधनांचा वापर करा. आजकाल कार पुलचे प्रमाण देखील वाढले आहे. एकाच ठिकाणी जाणारे लोक वेगवेगळ्या गाड्या घेऊन न जाता एकत्र जातात आणि इंधनाचा खर्च आपापसात वाटतात. तुम्ही या देखील पर्यायाचा विचार करू शकता.
पगारातील पैसे वाचवणे
अनेकांना दरवर्षी पगारात वाढ मिळत असते. तुम्हाला मिळत असलेली ही रक्कम खर्च न करता तुम्ही घरासाठी बचत करण्यासाठी वेगळी ठेवू शकता. तसेच दिवाळीचा बोनस , कार्यालयातून मिळणारे प्रोत्साहनपर पैसे (इन्सेन्टिव्ह) या सगळ्याची देखील तुम्ही बचत करू शकता.