कर्जदार अथवा खातेदाराचा क्रेडिट स्कोअर (credit score) हा विविध घटकांच्या मुल्यमापनातून मोजला जातो. कर्जदारने दिलेल्या मुदतीमध्ये कर्जाच्या व्याजाची परतफेड केली आहे का. त्याचा मागील आर्थिक इतिहास काय आहे. त्यांची आर्थिक शिस्त कशी आहे. त्याचे कर्ज थकीत आहे का? तसेच बँककडून मिळालेले क्रेडिट रेटिंग या सर्व घटकांच्या आधारे क्रेडिट स्कोअर मोजला जातो. मात्र हा स्कोअर किती असालयला पाहिजे? तो उत्कृष्ट राहण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे? याबाबतची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
चांगला क्रेडिट स्कोअर किती असतो Good Credit Score?
तुमची आर्थिक शिस्त (financially disciplined) मोजण्यासाठी क्रेडिट स्कोअर हा एक महत्त्वाचा मेट्रिक मानला जातो. चांगल्या स्कोअरसह तुम्ही कर्जाच्या जास्त रक्कमेसह काही सवलतीही मिळवू शकता. क्रेडिट स्कोअर हा 600 पेक्षा कमी असलेले लोक हे बँकेकडून सबप्राइम कर्जदार म्हणून गणले जातात. कर्ज देणाऱ्या संस्था अनेकदा या श्रेणीतील कर्जदारांसाठी जास्त दराने व्याजदर आकारतात. तर 700 आणि त्यावरील क्रेडिट स्कोअर सहसा चांगला मानला जातो. परिणामी अशा कर्जदाराला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. क्रेडिट स्कोअरचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते.
- 550-649 ठीक
- 650-749 चांगला
- 750-799 अतिशय चांगला
- 800-850 उत्कृष्ट
क्रेडिट स्कोअरचे फायदे-
तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास कर्जा घेताना त्याचा उपयोग होतो. विशेषत: तुम्हाला गृह आणि कार कर्जावर व्याजदरात सवलत मिळू शकते. उदाहरणार्थ, जर तुमचा क्रेडिट स्कोअर हा 800 प्लस असेल तर तुम्हाला एखादी मोठी सरकारी बँक वैयक्तिक गृह कर्जावर 8.50 टक्के व्याजदर आकारते. तसेच 20 वर्षांच्या कालावधीसाठी 50 लाख रुपयांच्या कर्जावरील व्याज 54.13 लाख रुपये असेल.
कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर कमी म्हणजे 800 च्या आत असेल तर त्याला बँकेकडून 8.80 टक्के व्याज दर आकारला जातो. म्हणजेच, त्याला 50 लाख कर्जासाठी त्याला 20 वर्षात जवळपास 56.42 लाख रुपयांपर्यंत व्याज द्यावे लागेल. त्याच वेळी, खूपच कमी क्रेडिट स्कोअर असलेल्यांना बँक 9.65 टक्के व्याज आकारले जाण्याची शक्यता असते. त्यानंतर त्याच्या कर्जावरील व्याजाचा बोजा हा 63.03 लाख रुपये असेल. त्यामुळे कर्जदाराकडे आर्थिक शिस्त असेल त्याला दीर्घकाळ फायदा होऊ शकतो.
क्रेडिट स्कोअर 800 प्लस कसा ठेवाल?
कर्जाची वेळत परतफेड करा-
तुमचा सिबिल गुणांकन सुधारण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहेत त्यामध्ये तुम्ही थकीत कर्जाचे हप्ते नियमित परतफेड करणे गरजेचे आहे. क्रेडिट कार्डची देणी 50%च्या आत ठेवणे गरजेचे आहे. ईएमआय आणि क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेवर भरणे अनिवार्य आहे. देय तारखेला बिल पेमेंट भरणे शक्य नाही असे तुम्हाला वाटत असल्यास, थेट बँक खात्यातून पेमेंट करा. काही तांत्रिक अडचणींमुळे एखादी व्यक्ती देय तारखेपर्यंत क्रेडिट कार्डचे बिल भरू शकली नाही तर स्कोअर 800 वरून 776 पर्यंत घसरतो.चांगला स्कोअर मिळवण्यासाठी अनेक महिने लागतात. त्यामुळे कर्जाचे हप्ते थकीत ठेऊ नका.
क्रेडिट मर्यादेपर्यंत वापरा-
तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो जितका कमी होईल तितक्या वेगाने तुमचा स्कोअर वाढेल. समजा क्रेडिट कार्डची मर्यादा एक लाख रुपये आहे. तुम्ही दरमहा 10,000 रुपये खर्च करता. मग तुमचा युटिलायझेशन रेशो 10 टक्के आहे. तुमचा वापर वाढल्याने स्कोअरवर नकारात्मक परिणाम होईल. तुमचा क्रेडिट युटिलायझेशन 30 टक्क्यांच्या खाली ठेवणे केव्हाही चांगले.
अनावश्यक कर्ज टाळा-
तुम्हाला कर्जाची गरज नसतानाही कर्जासाठी अर्ज करू नका. तुम्ही असे केल्यास तुमच्या स्कोअरवर परिणाम होईल. जेव्हा तुम्हाला खरोखर कर्जाची आवश्यकता असेल तेव्हा तुमची पात्रता तपासा आणि काळजीपूर्वक तयारी करा, त्यानंतरच अर्ज करा. जर ते नाकारले गेले तर त्याची कारणे जाणून घेतली पाहिजेत. त्यानंतरच नवीन कर्जासाठी अर्ज करा.
तुमच्याकडे जुने कार्ड असल्यास-
तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड अनेक वर्षे वापरत असल्यास, तुमचा स्कोअर वाढवण्यासाठी ते महत्त्वाचे ठरते. म्हणून,घाईत ते रद्द करू नका.वार्षिक शुल्क जास्त असल्यास, बँकेशी संपर्क साधा आणि ते कमी करण्यासाठी काय करता येईल ते शोधा. तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये काही प्रमाणात चढ-उतार होणे सामान्य आहे. परंतु, जर ते अचानक पडले तर आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. तुमच्या नावावर कोणी फसवणूक करून कर्ज घेतले आहे का ते तपासा. EMI न भरणे, कार्ड बिलांचे उशीरा पेमेंट इ. तपशिलांमध्ये काही चुका असल्यास बँका आणि क्रेडिट ब्युरोकडे तक्रार करा. अनधिकृत कर्ज खात्यांबाबत सावध रहा. तरच तुमचा क्रेडिट स्कोअर 800 च्या खाली जाणार नाही.