Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sovereign Gold Bonds मध्ये गुंतवणूक कशी करायची, गुंतवणूक किती फायद्याची

Gold Bonds

Image Source : www.vakilsearch.com

सरकारी गोल्ड बाँड योजनेअंतर्गत 6 ते 10 मार्च दरम्यान स्वस्त दरात सोने उपलब्ध होणार आहे. या योजनेत सोन्याची किंमत 5,611 रुपये प्रति ग्रॅम इतकी ठेवण्यात आली आहे. या सरकारी गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक कशी करावी याबद्दल जाणून घ्या या लेखात!

Reserve Bank of India: तुम्हालाही स्वस्त सोने खरेदी करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारकडून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. होय, तुम्ही सरकारी गोल्ड बाँड (SGB-Sovereign Gold Bonds) योजनेत गुंतवणूक करू शकता.येत्या सोमवारपासून पुढील 5 दिवस हि योजना सुरु राहणार आहे. गोल्ड बॉण्ड योजनेसाठी आरबीआयद्वारे प्रति ग्रॅम 5,611 रुपये इतकी किंमत निश्चित करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून याबाबत निवेदन जारी करण्यात आले आहे.

6 ते 10 मार्च या कालावधीत सोने खरेदी करता येणार!

या योजनेअंतर्गत 6 ते 10 मार्च दरम्यान स्वस्त दरात सोने उपलब्ध होणार आहे. या योजनेत सोन्याची किंमत 5,611 रुपये प्रति ग्रॅम इतकी ठेवण्यात आली आहे. आरबीआयच्या निवेदनानुसार, 'ऑनलाइन किंवा डिजिटल मोडद्वारे गोल्ड बाँडसाठी अर्ज करणाऱ्या आणि पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी प्रति ग्रॅम 50 रुपये सवलत दिली जाणार आहे. म्हणजेच अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बाँड्सची इश्यू किंमत 5,561 रुपये प्रति ग्रॅम इतकी असेल.

सुवर्ण रोखे RBI जारी करते

खरे तर आरबीआय भारत सरकारच्या वतीनेच सुवर्ण रोखे जारी करत असते. ही योजना फक्त भारतीय निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थां यांच्यासाठी लागू आहे. गोल्ड बॉण्ड खरेदीची कमाल मर्यादा व्यक्तींसाठी 4 किलो, HUF साठी (Hindu Undivided Family) 4 किलो आणि ट्रस्ट आणि तत्सम संस्थांसाठी 20 किलो इतकी आहे.

सोन्याची वाढती मागणी कमी करण्याच्या उद्देशाने सुवर्ण रोखे योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सर्वप्रथम सुरू करण्यात आली होती. दुसरीकडे सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत नरमाई दिसून येत आहे. शुक्रवारी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 56,103 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचवेळी चांदीचा भाव 64139 रुपये प्रति किलोवर पोहोचला होता.

गोल्ड बाँड खरेदी करावा का?

सरकारी सार्वभौम गोल्ड बाँड (SGB-Sovereign Gold Bonds) ही एक प्रकारची आर्थिक गुंतवणूकच आहे जो भारत सरकारद्वारे उपलब्ध करून दिली जात आहे. हे बाँड्स सोन्याच्या किमतीत दिले जातात हे प्रत्यक्ष भौतिक सोन्यासाठी पर्याय बनू शकतात. एक तर सोने हा मौल्यवान धातू आहे, तो चोरी झाल्यास किंवा हरवल्यास मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे अनेकदा स्मार्ट गुंतवणूक म्हणून लोक गोल्ड बाँड खरेदी करतात. म्हणजेच या गोल्ड बाँडचे उद्दीष्ट म्हणजे लोकांना कागदविरहित पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करणे, भौतिक सोन्याचे मालक होण्यासाठी पर्याय प्रदान करणे आणि आयात केलेल्या सोन्याची मागणी कमी करणे असा आहे.

या गोल्ड बाँडचा कालावधी 8 वर्षांचा आहे, परंतु पाचव्या वर्षानंतर गुंतवणूकदारांना गुंतवणूकीतून बाहेर पडण्याचा पर्याय RBI ने उपलब्ध करून दिला आहे. बाँड सोन्याच्या प्रचलित बाजारभावावर जारी केले जातात आणि कुणीही व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्थां हे गोल्ड बाँड  विकत घेऊ शकतात.

SGB योजनेत सोने गुंतवणूकीच्या मूल्यावर दरवर्षी 2.5% नफा दिला जातो. याव्यतिरिक्त, SGB मुदत कालावधीसाठी ठेवल्यास त्यावर मिळणारा भांडवली नफा करमुक्त आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा फायदाच होणार आहे.

गुंतवणूकदार राष्ट्रीयकृत बँक, नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजमधून गोल्ड बाँड खरेदी करू शकतात. गोल्ड बाँड मध्ये किमान गुंतवणूक 1 ग्रॅम सोन्याची आहे आणि जास्तीत जास्त गुंतवणूक व्यक्ती आणि एचयूएफसाठी 4 किलो आणि ट्रस्ट आणि तत्सम घटकांसाठी 20 किलो आहे.

एकंदरीत, गोल्ड बाँड हा अशा व्यक्तींसाठी एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे ज्यांना भौतिक सोन्याशिवाय सोन्यात गुंतवणूक करायची आहे. परंतु गुंतवणूकदारांनी यांत गुंतवणूक करण्यापूर्वी वेळोवेळी नियमात होणारे बदल, यातील जोखीम तपासून घेणे गरजेचे आहे.