Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

दिवाळी बोनसचा वापर गुंतवणुकीसाठी कसा कराल? जाणून घ्या

Diwali, Diwali Bonus, Investment

Image Source : https://www.freepik.com/

दिवाळीच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना बोनस स्वरुपात मोठी रक्कम दिली जाते. दिवाळी बोनसचा वापर गुंतवणुकीसाठी केल्यास भविष्यात याचा फायदा मिळेल.

अनेकजण दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतात. यामागचे प्रमुख कारण म्हणजे सलग येणाऱ्या सुट्ट्या व दिवाळीच्या निमित्ताने मिळणारा बोनस. बोनसच्या निमित्ताने मोठी रक्कम एकदम मिळत असल्याने आर्थिक मदत होते. मात्र, अनेकजण बोनसचा वापर अनावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी करतात; तर खूपच ठराविक लोकं ही रक्कम गुंतवणुकीसाठी वापरतात.

दिवाळी बोनसचा वापर अनावश्यक खर्चासाठी न करता, हुशारीने गुंतवणुकीसाठी केल्यास भविष्यात याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. त्यामुळे दिवाळी बोनसची रक्कम कशाप्रकारे वापरायची याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. म्युच्युअल फंडपासून ते सोन्यापर्यंत गुंतवणुकीचे अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही यंदा दिवाळीला मिळालेल्या बोनसचा वापर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कशाप्रकारे करू शकता, याबाबत लेखामधून सविस्तर जाणून घेऊया. 

दिवाळी बोनसचे करा नियोजन 

दिवाळीला बोनस स्वरुपात अचानक मोठी रक्कम हातात आली म्हणून उधळपट्टी करणे चुकीचे आहे. त्यामुळे दिवाळी बोनसचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. सणांच्या काळात खरेदी देखील मोठ्या प्रमाणात केली जाते, त्याचेही नियोजन करायला हवे. तुम्ही बोनसच्या रक्कमेचे वाटप खर्च, कर्जाची परतफेड आणि गुंतवणूक अशाप्रकारे करू शकता.तुम्ही जर दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणार असाल तर त्यासाठी येणाऱ्या खर्चाचे नियोजन करणे देखील गरजेचे आहे. दिवाळीचा संपूर्ण बोनस फिरण्यासाठीच खर्च होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

बोनसच्या रक्कमेची विभागणी 30:30:40 अशाप्रकारे करणे कधीही फायद्याचे ठरते. समजा, तुम्हाला 50 हजार रुपये दिवाळी बोनस मिळाला आहे. या रक्कमेतील 15 हजार रुपये घरातील खर्चासाठी, 15 हजार रुपये कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी आणि उर्वरित 20 हजार रुपये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वापरू शकता. समजा, इतर खर्च व हफ्ता तुमच्या पगारातील रक्कमेतून भरला जात असल्यास संपूर्ण बोनसचे पैसे सोने अथवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवता येतील.

अनावश्यक खर्च टाळा

दिवाळी बोनसचा वापर हा योग्य ठिकाणी गुंतवणुकीसाठी करणे गरजेचे आहे. अनेकजण दिवाळीच्या काळात मिळालेला बोनस त्याच वेळेस खर्च करून टाकतात. दिवाळीच्या काळात नवीन वस्तू खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो.मात्र कपडे, गाडी, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस खरेदी करण्याच्या नादात संपूर्ण दिवाळी बोनस कधी खर्च होतो हे लक्षात येत नाही. 

दिवाळीच्या काळात बोनस स्वरुपात भरपूर पैसे मिळालेत म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करणे तुमच्यासाठी नुकसानीचे ठरू शकते. त्यामुळे दिवाळीच्या काळात अनावश्यक खर्च टाळून पैशांचा वापर योग्य ठिकाणी गरजेचे आहे.

गरजेच्या वस्तूंची करा यादी

सणासुदींच्या काळात आपण भरपूर अनावश्यक वस्तू खरेदी करतो. विशेष करून दिवाळीच्या काळात कपडे, मोबाईल, फ्रिज, टीव्हीसह घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. एकदा शॉपिंग करण्यासाठी बाजारात गेले की आपण अनावश्यक वस्तू खरेदी करतो. तुमच्यासोबत देखील असे अनेकदा झाले असेल. त्यामुळे तुम्हाला नक्की कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, कोणत्या वस्तूंची गरज आहे याची आधीच एक यादी करणे गरजेचे आहे. ज्यामुळे अनावश्यक खर्च टाळला जाईल.

सणांच्या काळात ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर विविध सेलचे आयोजन केले जाते. या सेल्समध्ये बंपर ऑफर्स, डिस्काउंटची घोषणा केली जाते. त्यामुळे आपण अशा सेल्सकडे आकर्षित होऊन डिस्काउंटच्या नादात गरज नसलेल्या वस्तू खरेदी करतो. मात्र, यामुळे तुमचा दिवाळी बोनस नवीन वस्तू खरेदी करण्यामध्येच खर्चून जातो व गुंतवणुकीसाठी पैसे शिल्लक राहत नाही. 

कर्जाची परतफेड करा 

दिवाळी बोनसची रक्कम ही कर्मचाऱ्याचा पगार व कंपनीच्या धोरणानुसार ठरत असते. सर्वसाधारणपणे कर्मचाऱ्यांना 30 दिवसांचा पगार हा बोनस स्वरुपात दिला जातो. समजा, तुम्हाला महिन्याला 25 हजार रुपये पगार आहे. अशावेळी दिवाळीचा बोनस देखील 25 हजार रुपये मिळतो. त्यामुळे दिवाळी असलेल्या महिन्यात तुमच्याकडे पगाराचे 25 हजार रुपये व बोनसचे 25 हजार रुपये अशाप्रकारे 50 हजार रुपये जमा होतात. तुम्हाला या अतिरिक्त पैशांचा वापर कर्ज फेडण्यासाठी करता येईल.

तुम्ही नियमित पगाराचा वापर घर खर्च व इतर आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी करू शकता. तर बोनस स्वरुपात मिळालेली रक्कम होम लोन अथवा कार लोनचा हफ्ता भरण्यासाठी वापरता येईल. तसेच, तुम्ही जर इतरांकडून पैसे उधार म्हणून घेतलेले असल्यास त्याची देखील परतफेड करू शकता. क्रेडिट कार्डचा वापर केला असल्यास त्याचे पैसे भरू शकता. 

प्रामुख्याने ज्या कर्जाचे व्याजदर सर्वाधिक आहे, त्याची परतफेड करणे कधीही चांगले. कर्जाची परतफेड केल्याने आर्थिक भार कमी होतो. त्यामुळे बोनसचा वापर कर्जाची परतफेड करण्यासाठी केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

दिवाळी बोनसचा वापर करा गुंतवणुकीसाठी

दिवाळीच्या निमित्ताने अचानक बोनस स्वरुपात मोठी रक्कम मिळते. या रक्कमेचा वापर कपडे अथवा इतर वस्तू खरेदी करण्याऐवजी गुंतवणुकीसाठी केल्यास नक्कीच भविष्यात फायदा होऊ शकतो. दिवाळी बोनसची रक्कम तुम्हाला गुंतवणुकीसाठी कमी वाटत असली तरी भविष्यात यातूनच तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो.

सणासुदीच्या काळात वायफळ गोष्टींवर अनावश्यक खर्च होतो. त्यामुळे आधीच योग्य नियोजन करून तुम्ही या रक्कमेचा वापर गुंतवणुकीसाठी करू शकता. बोनसची रक्कम कितीही कमी अथवा जास्त असली तरीही फिक्स्ड डिपॉजिट, सोने, म्युच्युअल फंड असे गुंतवणुकीचे अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार योग्य गुंतवणूक पर्यायाची निवड करू शकता.

अल्पकालीन vs दीर्घकालीन गुंतवणूक

दिवाळी बोनसची रक्कम खूपच कमी आहे म्हणून गुंतवणूक करणे टाळू नये. बोनसची रक्कम कितीही असली तरीही तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सहज गुंतवणूक करू शकता. तुमच्या भविष्यातील उद्देशानुसार तुम्ही ही रक्कम अल्पकालीन अथवा दीर्घकालीन मुदतीसाठी गुंतवू शकता. तुम्हाला जर भविष्यात नवीन गाडी अथवा घर खरेदी करायचे असल्यास आतापासूनच गुंतवणुकीला सुरूवात केल्यास निश्चितच फायदा मिळेल. 

गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय

फिक्स्ड डिपॉजिट – गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे फिक्स्ड डिपॉजिट होय. दीर्घकालीन गुंतवणुकीसोबतच कमी जोखीमचा विचार करत असाल तर रक्कम फिक्स्ड डिपॉजिट म्हणून बँकेत जमा करू शकता. सध्या अनेक बँका फिक्स्ड डिपॉजिटवर चांगला परतावा देतात. 

समजा, तुम्हाला 40 हजार रुपये दिवाळी बोनस मिळाला आहे. तुम्ही ही संपूर्ण रक्कम बँकेत 2 ते 5 वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉजिट म्हणून जमा करू शकता. या रक्कमेवर 6.5 टक्के व्याज मिळाल्यास दोन वर्षांनी तुम्हाला 40 हजार रुपयांवर जवळपास 5500 रुपये परतावा मिळेल.

सोने – भारतात आजही सोन्यामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे सर्वसाधारणपणे सोन्यामधील गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते. तसेच, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्याच्या भावामुळे यातून मिळणारा परतावा जास्त असतो. मात्र, सोन्याचे भाव पाहता यात गुंतवणूक करावी की नाही, हे तुमच्या बोनसच्या रक्कमेवरून ठरते. तुम्हाला जर दिवाळीला जास्त बोनस मिळाला असल्यास सोने खरेदी करणे नक्कीच चांगले आहे.

दिवाळीच्या दिवसात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. तुम्ही दिवाळी बोनसचा वापर सोने खरेदी करण्यासाठी करू शकता. घरातील स्त्रियांसाठी सोन्याचे दागिने खरेदी करू शकता. यामुळे तुमची दिवाळी देखील खास होईल. तसेच, भविष्यात आर्थिक अडचण निर्माण झाल्यास तुम्ही याची विक्री देखील करू शकता.

म्युच्युअल फंड – सर्वसाधारणपणे कमी उत्पन्न असलेली व्यक्ती शेअर मार्केटपासून लांब राहते. याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी लागणारी मोठी रक्कम व यात असणारी जोखीम. मात्र, गेल्याकाही वर्षात भारतात म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक लोकप्रिय होत चालली आहे. म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी शेअर मार्केटची दारे उघडी झाली आहेत.

अगदी 500 रुपये महिन्याला भरून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. तुम्ही जर आतापर्यंत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली नसल्यास यंदाच्या दिवाळीला मिळालेल्या बोनसच्या रक्कमेचा वापर यासाठी नक्कीच करता येईल. इक्विटी फंड, डेट फंड, हायब्रिड फंड असे म्युच्युअल फंडचे वेगवेगळे प्रकार असून, यात तुम्ही सहज गुंतवणूक करू शकता. मात्र, लक्षात घ्या की कोणत्याही गुंतवणुकीप्रमाणे यात देखील जोखीम असते. त्यामुळे गुंतवणुकीचा विचार करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे.

चांगल्या कंपनींचे शेअर्स खरेदी करा – तुम्ही दिवाळी बोनसचा वापर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी करू शकता. मात्र, शेअर्सची किंमत खूपच कमी आहे म्हणून कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करणे योग्य ठरणार नाही. बाजारात अनेक चांगल्या कंपन्या आहेत, ज्यांच्या स्टॉक्सच्या किंमतीत जास्त चढ-उतार येत नाही. अशा कंपनीच्या शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. 

तुम्ही दिवाळी बोनसचा वापर आयपीओमध्ये (Initial Public Offerings) गुंतवणुकीसाठी करू शकता. याशिवाय, तुम्ही आधीपासूनच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर बोनसचा वापर पोर्टफोलियोमध्ये विविधता आणण्यासाठी करता येईल. तुम्ही लार्ज कॅप, स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकता. मात्र, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत संपूर्ण माहिती नक्की जाणून घेणे गरजेचे आहे, ज्यामुळे भविष्यात होणारे नुकसान टाळता येते.

स्वतःसाठी करा गुंतवणूक

विमा – अनेकजण महाग असल्यामुळे विमा खरेदी करणे टाळतात. मात्र, सध्याच्या काळात तुमचा व तुमच्या कुटुंबाचा जीवन विमा, आरोग्य विमा असणे अत्यंत गरजेचे आहे. आजारी पडल्यास मेहनतीची संपूर्ण कमाई हॉस्पिटलचे बिल भरण्यात खर्चून जाते. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत विमा खरेदी केला नसल्यास दिवाळी बोनसचा वापर या कामासाठी नक्कीच करू शकता. 

तुम्हाला विम्याचा खर्च सध्या अनावश्यक वाटत असला तरीही यात केलेली गुंतवणूक नक्कीच भविष्यात फायदेशीर ठरते व तुमचे हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी खर्च होणारे हजारो रुपये वाचतील.

इमर्जेंसी फंड –दरमहिन्याला पगारातून काही रक्कम इमर्जेंसी फंडमध्ये जमा करणे गरजेचे आहे. मात्र, घरातील खर्चामुळे हे शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही दिवाळी बोनसच्या रक्कमेचा वापर इमर्जेंसी फंडमध्ये गुंतवणुकीसाठी करू शकता. तुमचा 6 ते 8 महिन्यांचा खर्च सहज निघू शकेल एवढी रक्कम इमर्जेंसी फंडमध्ये जमा असणे गरजेचे आहे.  अडचणीच्या काळात याच रक्कमेतून कर्जाचे हफ्ते भरता येतील. त्यामुळे दिवाळी बोनसचा वापर इमर्जेंसी फंडमधील रक्कम वाढविण्यासाठी करणे कधीही फायद्याचे आहे.

नवीन काहीतरी शिकण्यासाठी करा गुंतवणूक - गुंतवणुकीचा उद्देश हा नेहमी केवळ संपत्ती जमा करणे हा नसावा. तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी देखील काही रक्कम गुंतवणे गरजेचे आहे. अनेकांना कॉम्प्युटर, फोटोग्राफीचे कोर्स करायचे असतात, नवीन भाषा शिकायची असते. मात्र, इतर खर्चामुळे या गोष्टी शिकण्यासाठी पैसे खर्च करता येत नाही. अशावेळी दिवाळीचा बोनसचा वापर नवीन काहीतरी शिकण्यासाठी नक्कीच केला जाऊ शकतो.

नवीन काहीतरी कौशल्य शिकण्यासाठी केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरू शकते व यातून उत्पन्नाचा नवीन स्त्रोत निर्माण होईल.