अनेकदा आपला पगार हा करपात्र नसते तरीही कंपनी आपल्या पगारातून टीडीएस (Tax Deducted at Source-TDS) कापते. किंवा करपात्रतेपेक्षा अधिक रकमेचा टीडीएस (TDS) कापला जातो अशा वेळी या अधिक गेलेल्या टीडीएस (TDS) रकमेचं काय करायचं. टीडीएस परतावा (TDS Refund) कसा मिळवायचा याची अनेकांना माहिती नसते. अशा वेळी काही करदाते जाऊदे म्हणत शांत बसतात. पण काही छोट्या स्टेप्सने हा परतावा तुमचा बँक खात्यात येऊ शकतो.
टीडीएस परतावा केव्हा मिळतो
करदात्याच्या एकूण उत्पन्नामधून, सर्व वजावटी वजा करुन करपात्र उत्पन्नावर कर भरला जातो. काही वेळेला वर्षभर जमा केलेला टीडीएस (TDS) तुम्हाला प्रत्यक्ष बसलेल्या कारापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला टीडीएस परतावा मिळू शकेल. किंवा जर तुमच्या कंपनीने करपात्र पगारापेक्षा जास्त TDS कापला असेल तर तुम्ही टीडीएस रिटर्न (TDS Return) भरून आपला परतावा मिळवू शकता. असे केल्याने आयकर विभाग (Income Tax Department) तुमच्या पगारावरील एकूण कराची गणना करेल, जर हा कर तुमच्या कंपनीने कापलेल्या करापेक्षा कमी असेल, तर उर्वरित कराची रक्कम (Refund) तुम्हाला परत केली जाईल. तसेच जर कंपनीने कापलेली रक्कम कमी असेल आणि करपात्र रक्कम (Payble Taxable) जास्त असेल तर आयकर विभाग तुम्हाला थकबाकी टीडीएस (TDS) जमा करण्यासही सांगेल. परताव्यासाठी रिटर्न भरताना बँकेचा IFSC कोड लिहिणे आवश्य आहे.
टीडीएस परताव्याची स्थिती कशी तपासायची?
टीडीएस परतावा लवकर येण्यासाठी, आयटीआर (ITR) वेळेवर भरणे महत्त्वाचे आहे. कारण जितक्या लवकर रिटर्न (TDS Return) फाइल कराल तितक्या लवकर परताव्याची (Refund) प्रक्रिया सुरू होते. जर तुम्ही वेळेवर आयटीआर भरला असेल, तर परतावा तीन ते सहा महिन्यांत येतो. टीडीएस रिफंडची स्थिती तपासायची असल्यास आयकर विभागाच्या संकेतस्थळाला किंवा टॅक्स इन्फॉर्मेशन नेटवर्क (tin ) संकेतस्थळाला भेट द्या.
- www.incometaxindia.gov.in किंवा www.tin-nsdl.com या दोन्हीपैकी कोणत्याही संकेतस्थळावर लॉग इन करा.
- स्टेटस ऑफ टॅक्स रिफंडवर क्लिक करा.
- त्यानंतर ज्या वर्षासाठीचा रिफंड थकित असेल ते आर्थिक वर्ष (assessment year) आणि तुमचा पॅन नंबर तिथे टाका.
- नंतर आयटीआरनुसार (ITR) परतावा (Refund) आहे कि नाही तसेच किती आहे याची माहिती मिळेल.
टीडीएस परतावा मिळण्यास उशीर झाल्यास कुठे तक्रार करावी
आयटीआर (ITR) केल्यानंतरही, तुम्हाला तुमचा परतावा मिळाला नसेल किंवा परत करण्यायोग्य रक्कम मिळण्यास उशीर होत असेल, तर तुम्ही तक्रार दाखल करण्यासाठी तुमच्या प्राप्तिकर अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता. सर्व आवश्यक तपशील आणि कागदपत्रांसह तुम्हाला तुमच्या आयकर अधिकाऱ्याशी लेखी संपर्क साधावा लागेल. तुम्हाला समाधानकारक प्रतिसाद किंवा त्याबाबत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास आपल्या सर्व तपशिलांसह म्हणजेच तुमचा पॅन क्रमांक, फॉर्म 16, बँक स्टेटमेंट, तुमच्या बँकेने जरी केलेले टीडीएस प्रमाणपत्र इत्यादीं कागदपत्रांसह आयकर लोकपालांना संपर्क साधू शकता.
सरकारदरबारी कर जमा करणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच हा कर आपल्या करपात्र उत्पन्नापेक्षा जास्त जात नाहीना याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे.