तुमचा मोबाईल फोन तुम्ही कसा निवडता? मला माहीत आहे अनेकदा एखाद्या मित्राकडे बघून त्याचा वापर बघून तसाच फोन तुम्ही खरेदी करता. पंधरा हजार रुपयांच्या खालच्या किमतींचा मोबाईल शोधताना तर तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मग कोणत्या गोष्टींची खात्री करून तुम्ही मोबाईल निवडाल. त्यासाठी महामनी डॉट कॉम कडून या काही टीप्स
स्मार्ट फोन विकत घेताना या गोष्टी तपासा Consider These Points Before Buying a Smartphone
- प्रोसेसर - तुमच्या फोनची कार्यक्षमता प्रोसेसर ठरवत असतो. संगणकाला जसा प्रोसेसर असतो अगदी तेच काम मोबाईल फोनचा प्रोसेसर करतो. मोबाईल फोनसाठी प्रोसेसर बनवणाऱ्या आघाडीच्या कंपन्या आहेत ऑक्टा-कोअर, क्वाड-कोअर, स्नॅपड्रॅगन, मीडियाटेक, युनिसॉक इ. या कंपन्या बनवत असलेल्या प्रोसेसरचा वेग गिगाहर्ट्झमध्ये नोंदवलेला असतो. आणि तो GHz या एककात मोजतात. जितका हा आकडा जास्त तितका प्रोसेसरचा काम करण्याचा वेग जास्त. त्यातून फोनची कार्यक्षमता लक्षात येते. तुमचं काम हायएंड असेल ग्राफिक्स किंवा इतर ऑफिसचं महत्त्वाचं काम तुम्ही स्मार्टफोनवर करत असाल तर चांगला वेग असलेला प्रोसेसर हवा.
- मेमरी - तुमच्या प्रोसेसरच्या बरोबरीने फोनची मेमरीही फोनच्या कामाचा वेग ठरवत असते. मेमरीचे दोन प्रकार आहेत. रॅम (Random Access Memory - RAM) आणि रिड ओन्ली मेमरी (Read Only Memory - ROM). रॉम हे फोनचं स्टोरेज झालं. जास्त मोठ्या फाईल किंवा फोटो साठवण्यासाठी जास्तीच्या रॉमची गरज पडते. अर्थात, फोन स्टोरेजला एक्सटर्नल ड्राईव्ह म्हणजे मेमरी कार्डची जोड देता येते. पण, रॅम किती आहे यावर मोबाईल फोनचा वेग ठरतो. जितकी रॅम जास्त तितका कामाचा वेग जास्त.
- कॅमेरा - अलीकडे अनेकदा मोबाईल फोनचा कॅमेरा बघून ग्राहक ठरवतात की कुठला फोन घ्यायचा. इतकं हे फिचर महत्त्वाचं झालंय. पण, मनोरंजनाबरोबरच फोनचा वापर व्यावसायिक किंवा कार्यालयीन कामासाठीही होत असतो. जसं की, व्हीडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठका भरवणं. अशावेळी कॅमेरा किती चांगला आहे हे महत्त्वाचं ठरतं. आणि चांगल्या फोटोंचा आनंद घेण्यासाठीही कॅमेरा महत्त्वाचा ठरतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त मेगापिक्सल असलेला कॅमेरा तो चांगला असा एक गैरसमज ग्राहकांच्या मनामध्ये आहे. तो चुकीचा आहे. मेगापिक्सल व्यतिरिक्त अपार्चर, ऑटोफोकस आणि ISO स्तर या गोष्टी कॅमेराचा दर्जा ठरवत असतात. तुमचा फोन तुम्हा कॅमेरासाठी वापरणार असाल तर 12 ते 16 मेगापिक्सल कॅमेरा आणि f/2.0 अपार्चर यांची निवड करा.
- बॅटरी - फोनची बॅटरी फोन निवडताना निर्णायक भूमिका बजावते. तुम्हाला फोनवर व्हीडिओ गेम खेळायची किंवा व्हीडिओ बघायची सवय असेल तर चांगली आणि दीर्घकाळ चालणारी बॅटरी हवी. प्रत्येक फोनवर बॅटरीची क्षमता लिहिलेली असते. ती जितकी जास्त तितका जास्त काळ फोन बॅटरी चालते. लिथिअम बॅटरी असलेले फोन घ्या. आणि तो चार्ज होताना बॅटरी तापत नाही ना याचाही अंदाज घ्या.
या सगळ्या गोष्टी तर आहेतच. याशिवाय तुम्हाला नेमका कुठल्या गोष्टीसाठी फोन वापरायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं बजेट या गोष्टींचा नीट आढावा घेऊन तुमचा स्मार्ट फोन निवडा.