How to Avoid Overspending: अनेकजण ठरवतात की वायफळ खर्च करायचा नाही. मात्र, त्यांच्याकडून नकळत अनावश्यक गोष्टींसाठी पैसा खर्च होतो. मग नंतर पश्चाताप करत बसतात. जमा-खर्चाचे योग्य नियोजन केले नाही तर वायफळ खर्च थांबणार नाही. थेंबे-थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे रोज बचत केलेली थोडीशी रक्कमही तुम्हाला अडचणीच्या वेळी कामाला येईल. या लेखात पाहूया अनावश्यक खर्च टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता.
खर्चाचे बजेट तयार करा
तुमचे उत्पन्न आणि खर्च किती आहेत हे लिहून काढा. यामध्ये आवश्यक खर्च आणि टाळता येण्याजोगे खर्च अशी विभागणी करा. असे करताना वास्तवाचे भान ठेवा. घरभाडे, वीज बील, मोबाइल रिचार्ज, आरोग्य, किराणा यासह अनेक गोष्टींचा खर्च मांडा. बचत करायची म्हणून आवडत्या गोष्टी पूर्णपणे टाळू नका. तुमच्या स्वत:च्या आवडी निवडींसाठीही काही रक्कम ठेवा. मात्र, त्या मर्यादेचे पालन करा. खर्चाचे बजेट तयार करण्यासाठी बाजारात अनेक अॅप्स आहेत. किंवा एक साधे मायक्रोसॉफ्ट एक्सल शीट फायद्याचे ठरेल. विविध चार्ट, ग्राफद्वारे कोणत्या गोष्टीवर किती खर्च झाला याचे चित्र दिसेल.
खर्चावर बारकाइने नजर ठेवा
बजेट तयार केल्यानंतर तुम्ही दररोज जे खर्च करता ते लिहून ठेवा. छोटे किंवा मोठे कोणत्याही गोष्टीसाठी खर्च केले तरीही लिहून ठेवा. एखाद्या ठराविक गोष्टीवर जास्त खर्च होत असेल तर हा पॅटर्न यातून लक्षात येईल. खर्च ट्रॅक करण्यासाठी पुन्हा विविध अॅप्स किंवा एक्सल तुमच्या कामी येईल.
इच्छेपेक्षा आवश्यक गरजांना प्राधान्य द्या
घरभाडे, किराणा, मोबाइल बिल, वीज बील, इंधन यासह इतर काही गोष्टी आवश्यक खर्चांच्या यादीत येतील. तर शॉपिंग, हॉटेलमध्ये जेवण, पर्यटन, गॅझेट खरेदी अपेक्षा, इच्छा कॅटेगरीत येईल. तुमच्याकडील एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू चांगली असतानाही नवी घेण्याची इच्छा होत असेल तर धोका ओळखायला शिका. कारण, अशा गोष्टींमुळे अनावश्यक खर्चामध्ये वाढ होते.
मनात येईल तेव्हा खरेदी टाळा
मित्रासाठी शॉपिंगला गेला आणि त्याच्यापेक्षा जास्त शॉपिंग स्वत:साठी करून आल्याची उदाहरणे तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या कपाटात नीट पाहिले तरी लक्षात येईल, असे अनेक कपडे असतात जे तुम्ही जास्त विचार न करता घेतले. मात्र, एकदा किंवा दोनदा घातल्यानंतर धूळ खात पडलेले आहेत. त्यामुळे मनमर्जी करू नका. शॉपिंग गरज असेल तेव्हा जरूर करा. कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी वेळ घ्या.
खरेदी करण्याआधी तुलना पर्याय पडताळा
एखादी वस्तू दिसली किंवा आवडली, की खरेदी केली असे करू नका. कारण, तीच वस्तू दुसरीकडे तुम्हाला खूप कमी किंमतीतही मिळू शकते. असा अनेकवेळा तुम्ही पश्चाताप केला असेल. जास्त पैसे गेल्याचं दु:खही झालं असेल. मात्र, इथून पुढे घाईघाइने शॉपिंग टाळा. ऑफर्स, डिस्काउंट कूपन्स, कॅशबॅक, समर सेल, विंटर सेल अशा ऑफर्सचा चांगला फायदा घ्या. जास्त डिस्काउंट असल्याने शॉपिंग कमी खर्चात होईल. क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट शिल्लक असतील तर त्याद्वारेही कमी किंमतीत वस्तू खरेदी करता येतील.
आर्थिक साक्षरता वाढवा
वायफळ खर्च टाळण्यासाठी आर्थिक साक्षरता आणि शिस्त अत्यंत गरजेची आहे. तुमच्या आर्थिक ध्येयाबाबत कायम जागरुक राहा. अनावश्यक खर्च केल्याचे दीर्घकालीन तोटे काय आहेत ते पाहा. भविष्यासाठी बचत गुंतवणूक केली नाही तर दुसऱ्यापुढे हात पसरण्याची वेळ येऊ शकते. जर तुम्हाचा एकट्याचा गोंधळ उडत असेल तर आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.