Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Successful Investor : यशस्वी गुंतवणूकदाराची मानसिकता कशी असावी?

Mindset of Successful Investor

Successful Investor : शेअर मार्केटमध्ये नव्याने उतरणाऱ्या गुंतवणूकदारांची मानसिकता थोडी डाऊन असते. त्यात यश मिळेल की नाही?, अशी द्विधा मनस्थिती असते. अशावेळी जिंकण्याची मानसिकता घेऊन ट्रेडिंग करणाऱ्यांना नक्कीच यश मिळते.

शेअर मार्केटमध्ये ‘हा शेअर घे रे आणि तो शेअर विक रे’, असे सांगणाऱ्यांची संख्या कमी नाही. पूर्वी अशा टीप्सला खूप महत्त्व होतं. पण आता सेबीने अशा गोष्टींवर निर्बंध आणल्यामुळे आणि शेअर मार्केटमधील इत्यंभूत माहिती सहज उपलब्ध होत असल्यामुळे अशा टीप्सकडे सहसा दुर्लक्ष केलं जातं. पण एखाद्याला ‘हा स्टॉक घे आणि तो स्टॉक घे’, हे सांगणे तसे खूप सोपे असते. पण जेव्हा प्रत्यक्ष ट्रेडिंग टर्मिनलवर बसून तो स्टॉक घेण्याची किंवा विकण्याची वेळ येते. तेव्हा समजते की बोलणे आणि ट्रेडिंग करणे यात किती फरक आहे? जिथे प्रश्न स्वतःच्या पैशांचा येतो तिथे कोणीही हजारवेळा विचार करतो आणि प्रश्न जर शेअर मार्केटचा असेल तर हजारवेळा काय हजारो वेळा विचार केला पाहिजे. शेअर मार्केट जरी रॉकेट सायन्स नसले तरी ते किती अवघड असते हे सर्वच गुंतवणूकदारांना माहित आहे. भरपूर दबाव असणाऱ्या या मार्केटमध्ये गुंतवणूकदाराची मानसिकता एक महत्त्वाचा आणि संपूर्ण खेळ पलटवणारा पैलू ठरू शकतो.

शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या नवशिक्या ट्रेडर्सची पहिली चूक होते ती इथेच. चुकीची मानसिकता घेऊन उतरल्याने तोटा तर होतोच. परंतु त्यांचा आत्मविश्वास ही कमी होतो. त्यामुळे योग्य मानसिकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मानसिकतेचे महत्त्व तर समजले पण मग ती बदलायची कशी? असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर त्याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. मानसिकता ही कोणा दुसऱ्याची कॉपी करण्यासारखी गोष्ट नाही. ती प्रत्येकाला स्वतः विकसित करावी लागते. आजच्या या आर्टिकलमध्ये आपण यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी मानसिकता कशी विकसित करावी, याबाबत जाणून घेणार आहोत.

ट्रेडर्सची मानसिकता काय असते? (Traders Mindset)

एक यशस्वी ट्रेडर केवळ त्याच्या स्ट्रॅटेजीजमुळे किंवा त्याच्या मेहनतीमुळे यशस्वी होत नाही. या सर्व गोष्टींसोबतच त्याची विचार करण्याची पद्धत देखील महत्त्वाची असते व ती त्याच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावते. अनेक सायकोलॉजीकल (Psychological) अभ्यासांमध्ये ट्रेडर्सच्या मानसिकतेचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. अनेक नवे गुंतवणूकदार जेव्हा मार्केटमध्ये उतरतात; तेव्हा त्यांच्या मनात केवळ “चांगल्या स्ट्रॅटेर्जीज म्हणजे चांगला फायदा” हाच विचार सुरु असतो. दररोज शेअर मार्केटमध्ये चांगल्या स्ट्रॅटेजी लावायच्या आणि त्यातून भरपूर फायदा मिळवायचा, असे सोपे चित्र त्यांच्या मनात तयार झालेले असते. पण शेअर मार्केटमध्ये मुरलेल्या गुंतवणूकदारांना माहिती असेलच की हे वाटते तितके सोपे नाही. अनेक गुंतवणूकदार बेस्ट स्ट्रॅटेजी आणि बेस्ट टूल्स वापरून देखील तोट्यात असतात. जे गुंतवणूकदार सतत जिंकत असतात त्यांनी एक योग्य मानसिकता विकसित केलेली असते. ज्यामुळे त्यांच्या विजयात सातत्य कायम राहतं.


मी, मार्केट आणि माझा अटीट्यूड (Market Attitude)

ट्रेडिंग दरम्यान अनेक वेळा “मार्केट माझ्या विरुद्ध आहे", असे नकारात्मक विचार आपल्याला नेहमी येत असतात. अशा नकारात्मक विचारांचा प्रभाव ट्रेडिंग दरम्यान होतो. जर स्वतः हार मानली तर खेळात पण नक्की हार होण्याची शक्यता असते. जर तुम्ही मार्केटकडे नकारात्मक दृष्टिकोनाने पहात असाल तर मग ते चुकीचे आहे. तुम्ही पैसे कमवताय की गमावताय याने मार्केटला कसलाच फरक पडत नाही.

प्रत्येक गुंतवणूकदाराचा स्वतःवर भरपूर विश्वास असला पाहिजे. यशस्वी गुंतवणूकदार आत्मविश्वासू असतात. ज्यामुळे यशस्वी होण्याची त्याची क्षमता त्याला माहित असते. हा विश्वास कोणत्याही चुकीच्या ट्रेडमुळे डगमगत नाही. तेच दुसरीकडे नवीन गुंतवणूकदार काही चुकीच्या निर्णयांमुळे जर ट्रेडिंगमध्ये नुकसान सहन करत असतील तर त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळू लागतो. यामुळे ट्रेडिंग करताना बाय किंवा सेलचे बटन दाबताना त्यांच्याकडून गडबड होते आणि चुकीचे निर्णय घेतले जातात. परिणामी अनेक चांगल्या संधी ते गमावतात. यशस्वी गुंतवणूकदाराला योग्य संधी दरम्यान आपली स्ट्रॅटेजी कदाचित चुकीची ठरू शकते, याची पुसटशी कल्पना असते. पण केवळ आत्मविश्वासावर ते यात बाजी मारतात आणि त्यातून नफा मिळवतात.

यशस्वी ट्रेडरची प्रमुख वैशिष्ट्ये (Features of Successful Traders)

किमान रिस्क घेणे (Take Minimum Risk)

जे गुंतवणूकदार रिस्क घेऊ शकत नाहीत; ते मोठा फायदा कधीच मिळवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना यशस्वी ट्रेडर कधीच म्हटले जात नाही. ज्याप्रमाणे हार-जीत हा खेळाचा भाग आहे. तिच निती ट्रेडिंगमध्ये असावी. यशस्वी ट्रेडर्सना हे गमक कळलेले असते.

बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे 

शेअर मार्केट हे नेहमी बदलत असते; त्यामुळे आज केलेले अॅनालिसिस उद्या पण चालेल आणि परवा पण चालेल असे नसते. बदलत्या मार्केटसोबत जुळवून घेणे व त्यानुसार ट्रेडिंग करणे हे गरजेचे आहे. यशस्वी गुंतवणूकदार आपल्या पोसिशन्स किंमत बघून नाही तर मार्केटची परीस्थिती बघून ठरवतात. 

ट्रेडिंगमध्ये अतिउत्साह किंवा हताशपणा नसावा

यशस्वी ट्रेडर त्यांच्या भावनांवर नेहमी नियंत्रण ठेवतात. हे नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे व जी सामान्य गुंतवणूकदारांची मोठी चूक असते. शेअर मार्केटमध्ये भावनांना कोणतीही जागा नाही, हे समजणे महत्त्वाचे आहे. 

जोखीम व्यवस्थापन (Risk Management)

कोणत्याही कामात शिस्त असणे महत्त्वाचे असते. प्रत्येकाचे जोखीम व्यवस्थापनाचे नियम वेगवेगळे असतात जे नेहमी पाळले गेले पाहिजेत. यशस्वी गुंतवणूकदारांमध्ये ही शिस्त असते; जी नवीन गुंतवणूकदारांनी आचरणात आणली पाहिजे.

यशस्वी गुंतवणूकदार बनण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिस्क आणि आपला ट्रेड कधी फसू शकतो तर कधी यशस्वी होऊ शकतो, याचा स्वीकार करणे. मार्केटच्या अॅनालिसिसपेक्षा, ट्रेड मॅनेज करणे महत्त्वाचे असते. Profit किंवा Loss हे तुम्ही ट्रेडमध्ये कधी शिरता व बाहेर पडता यावर नाही, तर तुम्ही ट्रेड मॅनेज कसे करता यावर अवलंबून असते.

वर दिलेल्या सर्व गोष्टींचा वापर करून तुम्हाला काय करायचे आहे हे समजले आहे. परंतु तुम्ही  जोवर स्वतः चुका करून त्यातून शिकत नाही तोवर ती मानसिकता तुमच्या आचरणात येणार नाही. त्यामुळे “माझी मानसिकता अशी नाही म्हणून मी ट्रेडिंग करणार नाही” असे बालिश विचार जर मनात येत असतील तर ते आत्ताच काढून टाका. कारण सध्याचे यशस्वी गुंतवणूकदार हे नवीन असताना आपल्या सारख्याच चुका करत होते. चुकांमधूनच त्यांनी नवीननवीन गोष्टी शिकल्या आणि यशस्वी गुंतवणूकदार झाले. तुम्ही जेव्हा ट्रेडिंग कराल तेव्हा या गोष्टींचा नक्की विचार करा.