ज्याप्रमाणे बचत आणि गुंतवणूक या पर्यायांमध्ये नागरिकांचा गोंधळ उडतो त्याचप्रमाणे निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन करतानाही गोंधळ उडतो. थोड्या नागरिकांकडे निवृत्ती फंड वगळता उत्पन्नाचे इतर मार्ग असतात. मात्र, मोठ्या प्रमाणात असे नागरिक आहेत, ते फक्त निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांवरच अवलंबून असतात. या पैशांवर आलेल्या व्याजावरच त्यांचा जीवन चरितार्थ चालतो. बचत खाते किंवा मुदत ठेवींमध्ये सहसा निवृत्तीनंतर नागरिक पैसे गुंतवतात. महागाईचा वाढता दर पाहता तुम्ही निवृत्तीनंतर दरमहा किती पैसे काढायला हवे, याचा कधी विचार केला आहे का?
महागाईचा विचार करून खर्च करा
निवृत्तीनंतरच्या खर्चाचे नियोजन करताना महागाई विचारात घ्यायला हवी. निवृत्तीनंतर सुमारे 25 वर्ष तुम्हाला पैशांची गरज लागेल, असे गृहीत धरू. सध्या महागाईचा दर 6% असून दरवर्षी यामध्ये वाढ होतच राहील. जर तुम्हाला दर महिन्याला सध्या खर्चासाठी 25 हजार रुपये लागत असतील तर पुढील 10 ते 12 वर्षांनी 50 हजार रुपये लागतील. तर 15 वर्षांनी 65 ते 70 हजार रुपये लागतील.
मुदत ठेवींवर मिळणारे व्याज तुम्ही दर महिन्याला काढत असाल तर महागाई वगळून तुम्ही रक्कम खर्च केली पाहिजे. समजा, तुमच्या मुदत ठेवीवर 8% परतावा मिळत आहे आणि महागाईचा दर 6% आहे अशा परिस्थितीत तुम्ही वार्षिक फक्त 2% रक्कम खर्च करायला हवी. अशा पद्धतीने तुम्हाला महागाईला हरवता येईल. दीर्घ काळामध्ये तुमची बचत वाढत जाईल आणि उतरत्या वयात तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही.
अतिरिक्त खर्च करू नका
निवृत्तीनंतर मिळालेल्या फंडातून अतिरिक्त अनावश्यक खर्च कधीही करू नका. सर्वसामान्यपणे निवृत्तीनंतर 30 ते 40 लाख रुपये मिळतात, असे आपण गृहित धरू, ही रक्कम मोठी वाटू शकते. त्यामुळे आपण आराम कितीही खर्च करू शकतो, असा विचार काहीजण करतात. मात्र, ते चुकीचे आहे. निवृत्तीनंतर जोखीम नसणाऱ्या आर्थिक पर्यायांमध्ये गुंतवणूक करायला हवी, असे म्हटले जाते. मात्र, जर तुम्ही काही प्रणामात जोखीम घेऊ शकत असाल तर इक्विटी मार्केटमध्ये गुतंवणूक करण्याचा विचारही करायला हवा.