SBI Education Loan: प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते की, आपणही परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावे. पण प्रत्येकाला परदेशातील शिक्षणाचा खर्च परवडत नाही. त्यामुळे अनेकांचे स्वप्न असेच अर्धवट राहते. पण अशा अर्धवट राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एज्युकेशनल लोन स्कीम आणल्या आहेत.
ज्या विद्यार्थ्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज (Educational Loan) हा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे पैसे नाहीत त्यामुळे उच्च शिक्षण घेता येणार नाही, ही परिस्थिती आता बदलली आहे. तर आज आपण एसबीआयच्या विविध एज्युकेशनल लोन स्कीमची माहिती घेणार आहोत. त्यातून नेमके किती रुपयांचे कर्ज मिळते. त्याचा कालावधी किती असतो आणि त्यासाठी बँक व्याजदर कार आकारते? या अशा बेसिक प्रश्नांची माहिती आपण घेणार आहोत.
स्टेट बँक ऑफ इंडिया ही शैक्षणिक कर्जांतर्गत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमासाठी कर्ज देते. व्यावसायिक आणि व्होकेशनल अभ्यासक्रमांसाठी कर्ज मिळते. त्याचबरोबर तुम्ही इतर बँकेकडून घेतलेले कर्जसुद्धा कमी व्याजदरात एसबीआयद्वारे टेक ओव्हर करू शकता.
SBI Student Loan Scheme | ||
कर्ज योजनेचे नाव | कर्जाची मर्यादा | व्याजदर |
एसबीआय स्टुडंट लोन स्कीम | 7.5लाख रुपये आणि त्यापेक्षा अधिक | 10.90% |
एसबीआय स्कॉलर लोन स्कीम | पात्रता व नियमानुसार 7.5 लाखापासून 40 लाखापर्यंत | पात्रता व नियमानुसार 8.30 टक्क्यांपासून 9.30 टक्क्यांपर्यंत |
एसबीआय स्किल लोन स्कीम | 1.50 लाखापर्यंत | 10.40% |
एसबीआय ग्लोबल अॅड-व्हानटेज लोन | 7.50 लाखापेक्षा जास्त आणि 1.50 कोटीपर्यंत | 10.90% |
एसबीआय टेकओव्हर ऑफ एज्युकेशन लोक स्कीम | 10 लाखापर्यंत आणि 1.50 कोटीपर्यंत | 10.90% |
एसबीआय शौर्य एज्युकेशन लोन | 7.50 लाख ते 1.50 कोटीपर्यंत | 10.90% - 11.50% |
Table of contents [Show]
एसबीआय शैक्षणिक कर्जाची वैशिष्ट्ये
कर्जाची रक्कम
भारतात राहून शिक्षण घ्यायचे असेल तर एसबीआयकडून 50 लाखापर्यंत कर्ज मिळते. मेडिकल अभ्यासक्रमासाठी 30 लाख रुपये तर इतर अभ्यासक्रमांसाठी 10 लाखापर्यंत कर्ज मिळते.
भारताच्या बाहेर राहून शिक्षण घ्यायचे असेल तर 7.50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. तर ग्लोब अॅड-व्हानटेज योजनेंतर्गत 1.50 कोटी पर्यंत एज्युकेशनल लोन मिळू शकते.
प्रक्रिया शुल्क
एसबीआय 20 लाखापर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारत नाही. 20 लाखांवरील कर्जासाठी बँक 10,000 रुपये प्रक्रिया शुल्क आणि त्यावर टॅक्स आकारते.
रिपेमेंटचा कालावधी
रिपेमेंटचा कालावधी हा कोर्स संपल्यानंतर 15 वर्षांपर्यंतचा आहे. यात 12 महिन्यांचा हॉलिडे कव्हर असणार आहे.
सिक्युरिटी
7.5 लाखापर्यंतच्या कर्जासाठी पालक हे सह-कर्जदार म्हणून असतील. 7.5 लाखावरील कर्जासाठी सह-कर्जदार म्हणून पालकांच्या नावासोबत काहीतरी तारण म्हणून ठेवावे लागते.
मार्जिन
भारतात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 4 लाखापर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही मार्जिन आकारले जात नाही. पण परदेशाती शिक्षणासाठी 4 लाखावरील कर्जावर 5 ते 15 टक्क्यांपर्यंत मार्जिन आकारले जाते.
अभ्यासक्रम
भारत सरकारमान्य UGC/AICTE/IMC, मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रम, IIT, IIM, केंद्र सरकार व राज्य सरकारने मान्यता दिलेले शिक्षक प्रशिक्षण आणि नर्सिंग अभ्यासक्रम, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मान्यता दिलेले अभ्यासक्रम, व्यावसायिक किंवा तांत्रिक पदवी अभ्यासक्रम आणि सीए, सीपीए या अभ्यासक्रमांसाठी कर्ज मिळू शकते.
कोणत्या खर्चाचा समावेश
कॉलेज/हॉस्टेलची फी, परीक्षा फी, लायब्ररी फी, अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तके, उपकरणे, लॅपटॉप. तसेच परदेशात शिक्षणासाठी जाणार असाल तर प्रवासाचा खर्च, दुचाकीचा खर्च त्याचबरोबर इतर स्टडी टूर, प्रोजेक्टच्या खर्चाचा समावेश यात होऊ शकतो.
SBI Education Loan साठी आवश्यक कागदपत्रे
- दहावी, बारावी, पदवी आणि प्रवेश परीक्षेचे मार्कशीट
- अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या संस्थेचे पत्र
- अभ्यासक्रमाचा एकूण खर्चाचा तपशील
- स्कॉलरशिप किंवा फ्री-शिप मिळाल्याचा पुरावा
- शैक्षणिक वर्षात खंड पडला असेल तर विद्यार्थ्याचे स्व:घोषणा पत्र
- विद्यार्थ्याचा आणि सह-कर्जदाराचा पासपोर्टसाईज फोटो
- 7.50 लाखावरील शैक्षणिक कर्जासाठी गॅरेंटर आवश्यक
- अर्जदार नोकरी करणारा असेल पगाराची स्लिप किंवा Form 16
- पालकांचे आणि गॅरेंटरचे मागील 6 महिन्यातील बँकेचे स्टेटमेंट
- अर्जदाराचे पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट
शैक्षणिक कर्जावर ईएमआय कसा आकारला जातो?
तुम्हाला जर एसबीआय स्टुडंट लोन योजनेंतर्गत 15 वर्षांसाठी 15 लाखाचे लोन मिळाले आहे आणि त्याचा वार्षिक व्याजदर 10.90 टक्के आहे. यासाठी बँक तुमच्याकडून कोणतीही प्रक्रिया शुल्क आकारणार नाही. याचा तुम्हाला प्रत्येक महिन्याचा ईएमआय 16,955 रुपये इतका असेल. या 15 वर्षांच्या कालावधीत तुम्ही जवळपास 15,51,879 रुपये व्याज म्हणून बँकेला द्याल. अशाप्रकारे 15 लाखाच्या शैक्षणिक कर्जासाठी तुम्ही एकूण 30,51,879 रुपये बँकेकडे भराल.