Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंड आणि SIP करणाऱ्यांची संख्या वाढली

Mutual Fund Investment

भारतामध्ये म्युच्युअल फंड आणि एसआयपीमधील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनानंतर विशेषत: पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोबतच महिलांचाही भांडवली बाजारातील टक्का वाढत आहे. जागतिक अस्थिरता, मंदीचे सावट आणि महागाई वाढत असतानाही शेअर मार्केट, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ वाढतच आहे. हे चित्र भारतासाठी सकारात्मक आहे.

Mutual Fund Investment: भारतामध्ये म्युच्युअल फंड आणि एसआयपी (Systematic investment plan -SIP) मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मार्च महिन्यात इक्विटी फंडातील गुंतवणूक सर्वोच्च ठरली. आकर्षक परतावा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड एक चांगला पर्याय म्हणून पुढे येत आहे. मार्च महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात 20,534 कोटी रूपये गुंतवणूक जमा झाली. तर 14,000 कोटी रुपये SIP द्वारे भांडवली बाजारात आले.

क्षेत्रनिहाय गुंतवणुकीचा ट्रेंडही गुंतवणूकदारांमध्ये दिसून येत आहे. म्युच्युअल फंडाच्या डिव्हिडंड यिल्ड कॅटेगरीत पैसे गुंतवण्यातही उत्साह दिसून येत आहे. SBI Dividend Yield Fund च्या NFO (New Fund Offer) मध्ये मागील महिन्यात 3,600 कोटी रूपयांची गुंतवणूक झाली. फेब्रुवारी महिन्यात डिव्हिडंड यिल्ड श्रेणीमध्ये अत्यंत कमी गुंतवणूक जमा झाली होती. मात्र, यावर्षी गुंतवणुकीचा ओघ वाढला. विविध SIP योजनांमधील मार्च महिन्यातली गुंतवणूक 14,276 कोटी रुपये झाली. SIP चा एकूण AUM (Asset under management) 6.83 ट्रिलियन रुपये झाला. फेब्रुवारी महिन्यात हा AUM 6.74 ट्रिलियन एवढा होता.

म्युच्युअल फंड गुंतवणुकी बाबतची ठळक माहिती

  • मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात 20,534 कोटी रूपये गुंतवणूक
  • SIP द्वारे 14 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
  • डेट म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे फिरवली पाठ 
  • लिक्विड फंडातून 56,924 कोटी रुपये काढून घेतले.
  • हायब्रीड फंड योजनांमध्ये 24,611 कोटी रुपयांची गुंतवणूक
  • SIP चा एकूण AUM 6.83 ट्रिलियन

"एसआयपीमधील गुंतवणूक वाढत आहे. (SIP Investment) प्रत्यके महिन्यात मागील रेकॉर्ड मोडीत निघत असून सर्वसामान्य नागरिक मार्केटमधील हिरो ठरतायेत. कोरोनानंतर गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. जागतिक स्तरावर अस्थिरता आणि महागाई वाढत असतानाही गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. यातून गुंतवणूकदारांचा लवचिकपणा दिसून येतो, असे AMIF चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस व्यंकटेश यांनी म्हटले.

डेट म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ घटला

दरम्यान, डेट म्युच्युअल फंड योजनांमधून गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले. मार्च महिन्यात 56,884 कोटी रुपये डेट म्युच्युअल फंडातून काढून घेतले. या तुलनेत फेब्रुवारीमध्ये फक्त 13,815 कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतले होते. असे असतानाही, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तब्बल 31,179 रुपयांची गुंतवणूक डेट म्युच्युअल फंडात झाली. मात्र, पैसे काढून घेण्याचे प्रमाण गुंतवणुकीपेक्षा जास्त राहिले. लाँग टर्म इंडेक्शेसन बेनिफिट काढून घेतल्यामुळे डेट म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक काढून घेतली जात आहे.

गुंतवणूकदारांनी लिक्विड फंडातून 56,924 कोटी रुपये काढून घेतले. सोबतच 8 हजार कोटी ओव्हरनाईट फंड, 10 हजार कोटी लिक्विड आणि 11 हजार कोटी मनी मार्केट योजनांमधून काढून घेतले. (Mutual Fund AUM) जागतिक बाजारातील परिस्थिती, कॉमॉडिटी प्राइजेस, कमी झालेला परतावा, खुंटलेला विकास, वाढती महागाईमुळे गुंतवणूकदारांनी डेट फंडातील गुंतवणूक काढून घेतली, असे जाणकारांचे मत आहे. 

मार्च महिन्यात कोणत्या योजनांमध्ये झाली गुंतवणूक

हायब्रीड योजनांमध्ये 24,611 कोटी रुपये नव्याने गुंतवण्यात आले. तर इंडेक्स फंडात 6 हजार कोटी रुपये गुंतवण्यात आले. गोल्ड इटीएफ योजनांध्ये 640 कोटी रुपये गुंतवणूक झाली.  तर इतर इटीएफ योजनांमध्ये 16,476 कोटी रुपये गुंतवणूक झाली.  31 मार्च पर्यंतच्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंड योजनांमध्ये एकूण 39.42 ट्रिलियन एवढी मोठी गुंतवणूक आतापर्यंत झाली आहे.