Wedding Insurance Policy: लग्न समारंभ म्हटलं की दोन महिन्या आधीपासून तयारी केली जाते. वेडिंग कार्ड, मॅरेज हॉल या तयारीत मोठा खर्च केल्यानंतर, आधीच लग्न कोणत्याही कारणास्तव रद्द झाले, तर दोन्ही कुटुंबांचे नुकसान होते. मग ही नुकसान भरपाई कोण देणार? तर वेडिंग इन्शुरन्स या परिस्थितीत होणारे नुकसान कमी करण्यास मदत करतो. वेडिंग इन्शुरन्स म्हणजे काय? कोणत्या परिस्थितीमध्ये भरपाई दिली जाते. या सर्व बाबी आपण पाहणार आहोत.
Table of contents [Show]
लग्नाचा विमा म्हणजे काय? (What is Wedding Insurance?)
भारतात दरवर्षी सुमारे 1.5 कोटी लग्न होतात. यामध्ये दरवर्षी 3 ते 4 लाख कोटी रुपये खर्च केले जातात. आपल्याकडे लग्नसमारंभात भरपूर खर्च करण्याची परंपरा आहे. यासाठी लग्नाच्या कित्येक महिने आधीपासूनच बॅण्ड, मॅरेज हॉल, वेडिंग कार्ड, शॉपिंग आदीची तयारी सुरू होते. अशा परिस्थितीत लग्न रद्द झाल्याने खूप मोठे नुकसान होते. त्या नुकसानाची भरपाई देणारा इन्शुरन्स म्हणजेच Wedding Insurance.
वेडिंग इन्शुरन्सचा प्रीमियम किती असतो?
सध्या ICICI Lombard General Insurance, Bajaj Allianz General Insurance सारख्या कंपन्या वेडिंग इन्शुरन्स देत आहेत. सध्या विम्याच्या तुलनेत दाव्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. लग्न विम्याचा हप्ता एकूण इन्शुरन्स कव्हरच्या तुलनेत सुमारे 1 ते 1.5 टक्के असतो. 10 लाखांच्या विम्यासाठी 15,000 रुपयांचा हप्ता असतो. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी लग्नाचा विमा काढण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. लग्नासाठी झालेल्या संपूर्ण खर्चाला संरक्षण म्हणून तुम्ही हा इन्शुरन्स घेऊ शकता.
कोणत्या परिस्थितीमध्ये नुकसान भरपाई दिली जाते?
आगीमुळे लग्न समारंभ रद्द करणे किंवा पुढे ढकलणे, लग्नाच्या ठिकाणी भूकंप इतर धोके इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत समाविष्ट केले जातात. कार्यक्रमाच्या ठिकाणी होणारी चोरीदेखील लग्नाच्या विम्याच्या अंतर्गत येते. जर वधू किंवा वर कोणत्याही कारणास्तव लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत, म्हणजेच वधू किंवा वर यांपैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू, गंभीर अपघातामुळे झालेली दुखापत, 10 दिवस किंवा अधिक दिवस हॉस्पिटलायझेशन झाल्यास इन्शुरन्स कंपनीकडून या नुकसानीची भरपाई दिली जाते.
खर्च देखील कव्हर केला जाईल
वेडिंग इन्शुरन्समध्ये कार्ड प्रिंटिंगचा खर्च, काही गोष्टींसाठी दिले गेलेले आगाऊ पेमेंट, कॅटरिंगसाठी दिलेले अगाऊ पैसे, सजावट, संगीत, विक्रेते इत्यादीसाठी दिलेला अॅडव्हानस (Advance) तसेच हॉटेल रूम बुकिंग किंवा प्रवास बुकिंगसाठी आगाऊ पैसे दिले जातात. यासाठी लागलेला खर्चदेखील यात भरपाई म्हणून मिळेल. पॉलिसीमध्ये सजावट, नातेवाईकांनी आणि सासरच्या मंडळींनी पुरवलेली उपकरणे यांचाही समावेश होतो.
विम्यामध्ये अपघाती मृत्यू, कायमचे आंशिक अपंगत्व, कायमचे संपूर्ण अपंगत्व देखील समाविष्ट आहे. लग्नाच्या ठिकाणी झालेल्या कोणत्याही दुर्घटनेमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी तृतीय पक्षांच्या दायित्वाचा समावेश होतो. पॉलिसी कालावधी दरम्यान लग्नाच्या ठिकाणी इजा किंवा नुकसान झाल्यास, ही परिस्थिती देखील विम्याच्या अंतर्गत संरक्षित आहे.
या परिस्थितीमध्ये भरपाई मिळणार नाही…
- भारतातील कोणत्याही कंपनीने कोविड कव्हर असलेली विवाह विमा पॉलिसी जारी केलेली नाही.
- जर मुलीच्या किंवा मुलाच्या इच्छेविरुद्ध विवाह रद्द झाला तर विमा संरक्षण मिळणार नाही.
- प्रशासनाने कर्फ्यू वगैरे जाहीर केल्यामुळे विवाह बंद पडल्यास कोणतेही कव्हर उपलब्ध नाही.
- दहशतवादी हल्ला
- लग्न अचानक रद्द झाले
- लग्नाचे कपडे किंवा कोणत्याही वैयक्तिक सामानाचे नुकसान
- लग्नाचे ठिकाण अचानक बदलणे किंवा रद्द करणे
- विद्युत किंवा यांत्रिक बिघाडामुळे कोणतेही नुकसान झाल्यास
अशाप्रकारे पॉलिसी खरेदी करू शकता
लग्नाचा विमा कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी विमा कंपनीकडून थेट किंवा एजंटद्वारे खरेदी केली जाऊ शकतो. प्रीमियमची किंमत तुम्ही घेत असलेल्या विम्याच्या प्रकारावर आणि तुम्हाला हवे असलेले कव्हरेज यावर अवलंबून असते. लग्नाचा विमा लग्नाच्या एक आठवडा आधी काढता येतो. यासाठी अर्जासोबत लग्नाची पत्रिका जोडणे आवश्यक आहे. प्रीमियमची किंमत कंपनीनुसार वेगवेगळी असू शकते. तरीही इन्शुरन्सच्या एकूण खर्चाच्या 0.70 टक्के ते 2 टक्क्यांपर्यंत प्रीमिअम असू शकतो.