House Rent Hike: कोरोनानंतर रिअल इस्टेट क्षेत्र तेजीत आहे. नव्या घरांची मागणी वाढत आहे. मात्र, आता त्यासोबत भाड्याच्या घरांची मागणीही वाढत आहे. मागणी वाढल्याने प्रमुख शहरांमध्ये जून तिमाहीत 4.9% भाडेवाढ झाली आहे. मागणीनुसार रेंटल घरांचा पुरवठा कमी असल्याचे मॅजिकब्रिक्सने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे.
एप्रिल-जून तिमाहीत भाडेतत्त्वावरील घराची मागणी 18.1% टक्क्यांनी वाढली. तर पुरवठा फक्त 9.6 टक्क्यांनी वाढला. मॅजिकब्रिक्स संकेतस्थळावरील 2 कोटी ग्राहकांचा अभ्यास करून दरवाढीचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. देशातील 13 प्रमुख शहरांमध्ये भाडेवाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, दिल्ली आणि मुंबई शहरातील भाडे किंचित कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
घरभाडे वाढण्यामागील कारण काय?
कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे सुरू झालेले वर्क फ्रॉम होम जवळपास बंद झाल्यामुळे कर्मचारी ऑफिसमध्ये परतले आहेत. तसेच कॉलेज महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांकडून भाड्याच्या घरांची मागणी वाढली आहे. कोरोनानंतर मालमत्तेच्या किंमती अचानक वाढल्याने काही घरमालकांनी घर विक्रीस पसंती दिली. त्यामुळेही पुरवठा कमी झाल्याचे मॅजिकब्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर पुरी यांनी म्हटले.
कोणत्या घरांना सर्वाधिक मागणी?
घर भाड्याने घेण्यासाठी सर्वाधिक डिमांड ही 2BHK घरांसाठी आहे. एकूण मागणीतील हे प्रमाण 53% आहे. त्याखालोखाल 1BHK घरांची मागणी 27% आहे. तर 3BHK घरांची मागणी 18% आहे.
ज्या भागात आयटी हब, कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये आहेत त्या परिसरातील घरभाडे जास्त आहे. मात्र, परवडणाऱ्या घरांच्या शोधात जास्त ग्राहक असल्याचे अहवालात म्हटले आहे. 10 हजार ते 20 हजारांच्या दरम्यान घरभाडे असलेल्या घरांना भाडेकरूंकडून प्राधान्य देण्यात येते.