कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतात आरोग्यसेवेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आरोग्य सेवांबाबत आणि नामांकित हॉस्पिटलमधील प्रवेशासाठी रूग्णांकडून होणारी मागणी पाहता हॉस्पिटल उद्योगाच्या महसुलात 2023 मध्ये चांगलीच वाढ होणार आहे. देशामध्ये आरोग्य क्षेत्राचा वेगाने विकास होत असून, देशातील हेल्थ केअर सेक्टरमध्ये गेल्या दोन वर्षांत आमूलाग्र बदल झाला आहे. या क्षेत्राची वाढती मागणी लक्षात घेता 2025 पर्यंत या क्षेत्रातील गुंतवणूक सुमारे 500 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे 2022 मध्ये नामांकित हॉस्पिटलच्या प्रत्येक बेडमागे हॉस्पिटलच्या महसुलात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आताही 2023 मध्ये या हॉस्पिटलमधील प्रति बेडमागे महसुलात सरासरी सुधारणा होण्याची शक्यता आहे.
हॉस्पिटल उद्योगासाठी देशात सध्या अनुकूल वातावरण असल्याचे पाहून अनेक मोठमोठ्या साखळी हॉस्पिटल असलेल्या कंपन्यांनी या क्षेत्रात आणखी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये काही प्रमुख हॉस्पिटल्सनी आपापल्या विस्ताराच्या योजना राबवण्यास सुरूवात केली. येत्या काही वर्षांत दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता आणि चेन्नई यासारख्या शहरांमधील हॉस्पिटलमधील बेड्सची संख्येत वाढ करावी लागणार आहे, असे आयसीआरएने (Investment Information and Credit Rating Agency-ICRA) आपल्या अहवालात म्हटले आहे.