गेल्या काही महिन्यांपासून तुरीचे भाव गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांच्या घरात खाल्ली जाणारी ही डाळ महाग झाल्यामुळे किचनचे बाजेद बिघडले आहे. अशातच येत्या काही काळात भारत सरकारने तूर डाळीची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे डाळींची साठेमारी बंद होईल आणि भाव नियंत्रणात येतील असे सरकारचे म्हणणे आहे.
12 लाख टन डाळीची आयात
भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर डाळीच्या किमतीत सरासरी 25% वाढ झाली आहे. सध्या घाऊक बाजारपेठेत तुड डाळ 128-130 रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुरीच्या वाढत्या किमतीमुळे सामान्य नागरिक हैराण असून भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली जात होती. यावर केंद्र सरकारच्या आखत्यारीत येणाऱ्या ग्राहक व्यवहार विभागाने तूर डाळीच्या आयातीचा निर्णय घेतला आहे. भारत या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत 35 टक्के अधिक 12 लाख टन तूर डाळ आयात करणार आहे. यामुळे तूर डाळीची देशांतर्गत उपलब्धता वाढेल आणि भाववाढ रोखली जाईल असे सरकारचे म्हणणे आहे.
देशांतर्गत उत्पन्न कमी
तूरची खरी समस्या म्हणजे, यावर्षी डाळीचे देशांतर्गत उत्पादनाच कमी झाले आहे. देशातील तूर उत्पादन 2022-23 पीक वर्षात (जुलै-जून) 39 लाख टनांवरून घसरून 30 लाख टन इतके झाले आहे. अवकाळी पाऊस, बदलते हवामान, लांबलेला उन्हाळा यामुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे सरासरी 9 लाख टन तुरीचे उत्पन्न घटले आहे.
भारतात दरवर्षी 44-45 लाख टन तूर डाळ विकली जाते. मागील वर्षी देखील केंद्र सरकारने तूर डाळ आयात केली होती. त्यामुळे यावर्षी देखील 12 लाख टन तूर डाळीची आयात केली जाणार आहे. देशात आतापर्यत 6 लाख टन तूर डाळीची आयात आधीच करण्यात आली आहे. म्यानमार आणि पूर्व आफ्रिकन देशांशी याबाबत बोलणी सुरु असल्याचे सरकारने म्हटले आहे.
साठेमारीवर सरकारचे लक्ष
तूर डाळीचे देशांतर्गत उत्पन्न कमी असल्यामुळे बाजारपेठांमध्ये डाळीची अवाक कमी झाली आहे. मागणी आणि पुरवठा याचे गणित बिघडल्यामुळे डाळीचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात काही व्यापाऱ्यांनी गोदामांमध्ये डाळीचा साठा केला असल्याची माहिती अन्न व पुरवठा विभागाला प्राप्त झाल्यानंतर त्यांनी व्यापाऱ्यांवर कारवाई देखील केली होती.
यावर व्यापाऱ्यांना कारवाईचा इशारा देताना सरकारने तंबी देखील दिली आहे. स्टॉक डिस्क्लोजर पोर्टलवर तूरडाळींचा साठा व्यापारी,आयातदार यांनी लवकरात लवकर जाहीर करावा असे सरकारने म्हटले आहे.माहिती लपवल्यास दोषींवर कारवाई केली जाईल असेही सरकारने म्हटले आहे.