कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 जूनपर्यंत वाढवली आहे. याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने मंगळवारी संध्याकाळी यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या निवेदनानुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मे होती. अर्ज करण्यासाठी अनेकांना वेगवेगळ्या अडचणी येत होत्या, तसेच प्रक्रिया समजून घेण्यासाठी देखील अनेकांना वेळ लागला होता, त्यामुळे कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. उच्च निवृत्ती वेतनासाठी ज्यांनी अर्ज केला नव्हता अशा कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उच्च निवृत्ती वेतनासाठी आतापर्यंत 12 लाखांहून अधिक अर्ज आले आहेत.
तांत्रिक अडचणींचा करावा लागला सामना
ईपीएफओने आपल्या विद्यमान आणि माजी सदस्यांना उच्च निवृत्ती वेतनाची निवड करण्याची संधी दिली पाहिजे असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने 4 नोव्हेंबर 2022 रोजी दिला होता. त्यानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने विद्यमान आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची मुभा दिली होती. परंतु देशातील अनेक भागांतून याबाबत तक्रारी येत होत्या.
EPFO extends deadline to apply for higher EPS pension now to 26th June 2023 (from previously announced 3rd May deadline).
— Stable Investor (@StableInvestor) May 2, 2023
Now the eligible employees have additional time to evaluate and then apply for higher pension from EPS. #EPFO #EPS #pension
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे जुने व्यवहार उपलब्ध नसणं, पेन्शन पेमेंट ऑर्डर पोर्टलवर न दिसणं, मृत कर्मचार्यांसाठी जॉइंट ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व नसणं अशा अनेक अडचणींचा सामना फॉर्म भरताना कर्मचाऱ्यांना करावा लागत होता. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मुदतीत फॉर्म भरण्यासाठी अडचणी आल्या होत्या. या संदर्भात पार्श्वभूमीवर स्टँडिंग कॉन्फरन्स ऑफ पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेसने (SCOPE) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला पत्र लिहून अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली जावी अशी विनंती केली होती. कर्मचाऱ्यांची ही मागणी आता पूर्ण झाली असून 26 जून 2023 पर्यंत कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
कमर्चारी अजूनही संभ्रमात
उच्च निवृत्ती वेतनाची निवड करण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी अर्ज केला आहे त्यांना अजूनही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पेन्शनचा निर्णय कुठल्या सूत्रानुसार घेणार याबद्दल कल्पना नाही. पीएफ फंडातून पेन्शन फंडात रक्कम हस्तांतरित करण्यासाठी पीएफ अधिकाऱ्यांकडून कोणती प्रक्रिया अवलंबली जाईल हे देखील अजून स्पष्ट केले गेले नाही. तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून किती रक्कम पेन्शन फंडात हस्तांतरित केली जाईल याची देखील स्पष्टता दिली गेली नाहीये. अशा सर्व गोष्टींच्या अस्पष्टतेमुळे विद्यमान आणि सेवानिवृत्त कर्मचारी संभ्रमावस्थेत आहेत.
उच्च निवृत्ती वेतनासाठी सरकारची नेमकी काय योजना आहे हे स्पष्ट केले जावे अशी मागणी देखील कर्मचारी संघटनांनी केली आहे.
पेन्शनचा नवीन नियम
EPFO ने 1 सप्टेंबर 2014 नंतर पीएफ खाते उघडणाऱ्या कर्मचाऱ्यांना Employee Pension Scheme (EPS) द्वारे उच्च पेन्शन निवडण्याचा पर्याय दिला आहे. या अंतर्गत, मासिक 15,000 पेक्षा जास्त पगार असणारे कर्मचारी देखील आता EPS मध्ये 8.33 टक्के योगदान देऊ शकतात. यामुळे निवृत्तीनंतर हे कर्मचारी अधिक पेन्शन मिळवू शकतील. यामुळे पीएफ खात्यात जमा केली जाणारी रक्कम कमी होणार आहे.