Train to Mecca from India: भारतातून दरवर्षी लाखो मुस्लिम भाविक हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जातात. मक्का मदिना ही सौदी अरेबियातील पवित्र धार्मिक स्थळे असून दरवर्षी जगभरातील मुस्लिम समुदाय या स्थळांना भेटी देत असतो. भारतातूनही लाखो यात्रेकरू हज यात्रेसाठी जातात. ही यात्रा प्रामुख्याने विमानाने होते. मात्र, भविष्यात भाविकांना थेट हायस्पीड रेल्वेद्वारे मक्कापर्यंत जाता येईल. या संदर्भातील प्रस्तावावर विचार सुरू असून भविष्यात काम सुरु होऊ शकते.
महागडा विमान प्रवास
हज यात्रेकरुंसाठी विमान प्रवास महागडा असल्याने प्रवासासाठी इतर पर्यायांवर सरकारी पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये थेट हजपर्यंत रेल्वे सेवा सुरू करण्यावर विचार सुरू आहे. भारत, अमेरिका, संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया या चार देशांमध्ये रेल्वेद्वारे हज यात्रा कशी करता येईल यावर चर्चा झाली. अत्याधुनिक हायस्पीड रेल्वेद्वारे भारत आणि सौदी अरेबिया ही ठिकाणं एकमेकांना जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
मागील काही वर्षात हायस्पीड रल्वेद्वारे अनेक देश एकमेकांना जोडण्यात आले. रेल्वे टेक्नॉलॉजीतील प्रगतीमुळे या गोष्टी शक्य झाल्या आहेत. जर थेट रेल्वे सेवा सुरू झाली तर हज यात्रेकरुंना कमी पैशात प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. हज यात्रेदरम्यान विमानाचे भाडे जास्त आकारले जाते. त्यामुळे प्रवाशांना तिकीटासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात. जर रेल्वे सेवा सुरू झाली तर परवडणाऱ्या दरात भाविकांना हज यात्रा करता येईल.
रेल्वेद्वारे आरामशीर प्रवास
जरी दोन्ही देशांतील अंतर जमीनमार्गे जास्त असले तरी रेल्वेमधील प्रवास स्लीपर कोचमुळे आरामशीर होऊ शकतो. विमानाच्या तुलनेत रेल्वेचा प्रवास जास्त आरामदायक असेल. तसेच रेल्वे प्रवासादरम्यान धार्मिक प्रार्थना करण्याचे स्वातंत्र्य भाविकांना मिळेल.
रेल्वे सेवा सुरू करण्यातील आव्हाने
दरम्यान, सौदी अरेबिया ते भारत अशी हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यामध्ये काही आव्हाने देखील आहेत. ही ट्रेन पाकिस्तान, अफगाणिस्तान इराण अशा देशांमधून जाईल. त्यामुळे देशाची सीमा ओलांडताना पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे तपासणी अवघड होऊ शकते. रेल्वे मार्गाची सुरक्षा हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे. कारण, दहशतवादी गटांकडून या रेल्वे मार्गाला धोका असू शकतो.
बलूचिस्तान आणि इराणमधील झॅग्रोस पर्वतरांगेतून ही रेल्वे लाइन जाईल. या भूप्रदेश अत्यंत दुर्गम आहे. तसेच येथे तापमान जास्त असल्याने रेल्वे प्रवासात अडचणी येऊ शकतात. देशाची सीमा रेषा ओलांडताना प्रत्येक देशाचे वेगळे नियम असू शकतात.