तुळशी विवाह संपन्न झाल्यावर विशेषकरून डिसेंबर महिन्यात सगळीकडे लगीनघाई सुरू होते. प्रत्येक ठिकाणी लग्नाचे वातावरण पाहायला मिळते. लग्नाची शॉपिंग हा महत्वपूर्ण विषय असून बजेटच्या दृष्टीने त्याची आखणी करणे गरजचे असते. वधू- वराचे कपडे, दागिने, विधीची सामग्री, इतरांची खरेदी, हॉटेल-बसचे बुकींग, जेवणाची व्यवस्था, लग्न स्थळाची सजावट, मंडप, डीजे, पार्लरचा खर्च यांसारख्या अनेक गोष्टींची यादी तयार असते. यादरम्यान, कधी-कधी अवाजवी खर्च केला जातो. योग्यप्रकारे नियोजन न केल्यामुळे पैशांची उधळपट्टी केली जाते. लग्नातील सर्व गोष्टींची हौस भागवून होणारा खर्च आटोक्यात कसा ठेवायचा, याच्या टिप्स आपण जाणून घेणार आहोत.
Table of contents [Show]
अंदाजित खर्चाची यादी तयार करा
कोणत्या गोष्टीसाठी किती खर्च लागू शकतो याची अंदाजे किंमत लिहून एक यादी तयार करा. लग्नाचा हॉल, जेवणाची सोय, प्रवासाचा खर्च, कपड्यांची खरेदी, फोटोग्राफरचा खर्च, सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी यांसारख्या महत्वपूर्ण बाबींचा बजेटनुसार लागणारी रक्कम लक्षात घेऊन कागदावर त्याची यादी तयार करून घ्यावी. तुम्ही लग्नात किती जणांना आमंत्रित करणार आहात, लग्न किती थाटामाटात करणार आहात, किंवा मोजक्या पाहुण्यांना बोलवून छोटासा कार्यक्रम करणार आहात का? या गोष्टी ध्यानात ठेवून लग्नाचे ठिकाण, हॉटेल आणि जेवणाची व्यवस्था ठरवावी. जितके पाहुणे येणार असतील त्यानुसार ठिकाणाची बुकिंग करावी. तसेच, पाहुण्यांच्या अंदाजे संख्येनुसार जेवण बनवावे, असे केल्यामुळे विनाकारण अन्नाची नासाडी होणार नाही.
छुप्या खर्चांवर काटेकोर नजर असावी
लग्नाच्या खर्चाची आखणी करूनही काहीवेळा अचानक काही अडचण येऊन खर्च वाढतो. अंदाज ठरवलेला असला तरीही, पाहुण्यांची योग्य व्यवस्था व्हावी यासाठी सर्व गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. लग्न स्थळासाठी आवश्यक असणारी रक्कम भरून सुद्धा काही वेळा कार्यक्रम उशिरा सुरु झाला, किंवा अन्य कारणांमुळे लांबला गेला तर, त्या ठिकाणाचे जास्त पैसे मोजावे लागतात. हा खर्च होऊ नये म्हणून, कार्यक्रम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. तसेच, लग्नाच्या जागेत जास्त वेळेसाठी जास्त रक्कम मोजावी लागते का? मोजावी लागत असेल तर ती रक्कम किती? या सर्व गोष्टींची चौकशी बुकिंग करण्याच्यावेळी करून घ्यावी. यासोबतच, पाहुण्यांसाठी बुक केलेले हॉटेल-रिसॉर्ट आणि प्रवासासाठी उपलब्ध करून दिलेले वाहन यांच्या खर्चाकडे सुद्धा लक्ष द्यावे.
वेडिंग प्लॅनरची मदत घ्या
सध्या अनेकजण लग्नासाठी वेडिंग प्लॅनरला बोलावून तयारी करतात. वेडिंग प्लॅनर लग्नासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे योग्यरीत्या नियोजन करतात. लग्नाची थीम, सजावट, अन्य गोष्टी या सर्वांचे प्लॅन करून गोष्टी सजवल्या जातात. लग्नाच्या प्रत्येक विधीचे साहित्य, त्यासाठी लागणारे कपडे, फुलांची सजावट, रांगोळी, संगीत, मेहंदी, हळदीचा कार्यक्रम या प्रत्येक गोष्टीची थीम लक्षात घेऊन वेडिंग प्लॅनर त्यावर काम करतात. वेडिंग प्लॅनरच्या मदतीने सर्व गोष्टी सुरळीत पार पडत असल्या तरीही, तुमच्या बजेटनुसार त्यांना निमंत्रित केले पाहिजे की नाही हे ठरवणे आवश्यक आहे. वेडिंग प्लॅनर सर्व कार्यक्रमाची जबाबदारी घेतात, म्हणूनच त्यांच्या कामातल्या अनुभवानुसार त्यांचे चार्जेस ठरलेले असतात. वेडिंग प्लॅनरला बोलावण्यासाठी ५० हजार पासून लाखोंचा खर्च येऊ शकतो. म्हणून, खर्च कमी करण्यासाठी स्वतः विक्रेत्यांना शोधून खरेदी करून सजावट करायची की स्वतः लग्नाच्या काळात जास्त व्यस्त राहू नये म्हणून वेडिंग प्लॅनरच्या मदतीने सर्व करायचे हे फक्त बजेटनुसार ठरवावे.
परवडेल आणि वऱ्हाडींना आवडेल असा कॅटरर्स निवडा
'लग्नाचे जेवण' हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. कोणतेही लग्न असो, इतर गोष्टींपेक्षा लग्नाच्या जेवणाचीच जास्त चर्चा केली जाते. किती आणि कोणते पदार्थ होते, त्यांची चव कशी होती, तिथे केलेली सोय कशी होते यासारख्या अनेक गोष्टींची चर्चा पाहुण्यांकडून केली जाते. येणाऱ्या पाहुण्यांच्या संख्येनुसार तसेच आवडीनुसार जेवण बनवले पाहिजे. लग्नाच्या जेवणाचे पदार्थ कोणते असावेत याची यादी बनवून घ्यावी. थंडपेय कोणती असावीत, भाज्या, गोड पदार्थ, पोळी की पुरी या गोष्टी आधीच ठरवून घ्याव्यात. अन्नाची गुणवत्ता आणि चव यात कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये म्हणून आधीच केटरर्स सोबत बसून चर्चा करून घ्यावी आणि बजेटला झेपेल शिवाय सर्वांना आवडेल अशा पदार्थांची निवड करावी.
अशा रीतीने काही महत्त्वपूर्ण गोष्टींची काळजी घेतली तर लग्नाचा खर्च आटोक्यात राहण्यास मदत होईल.