जीएसटी परिषदेची 50 वी बैठक आज नवी दिल्लीत आयोजित केली गेली आहे. या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. कारण आजच्या या बैठकीत ऑनलाइन गेमिंगवरील कर, वाहन खरेदीवर शुल्क, इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) साठीचे नियम आधी विषयांवर चर्चा आणि निर्णय घेतले जाणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावरचा GST चा भार वाढणार की कमी होणार याचा निर्णय आज होणार आहे.
यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत सिनेमागृहांमध्ये विक्रीसाठी असलेले खाद्यपदार्थ आणि पेये याबाबत देखील निर्णय घेतला जाणार आहे. पॉपकॉर्न, कोल्ड ड्रिंक्स व इतर खाद्यपदार्थ सिनेमागृहात तिप्पट, चौपट किमतीने विकले जातात. बाहेरील खाद्यपदार्थ देखील सिनेमागृहांत आणू दिले जात नाही. याचा फटका सामान्य ग्राहकांना सहन करावा लागतो. त्यामुळे सिनेमागृहातील खाद्यपदार्थाच्या विक्रीसंदर्भात आजच्या बैठकीत निर्णय होणार असल्यामुळे सामन्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या सिनेमागृहातील खाद्यपदार्थावर 18% GST आकारला जातो. तो 5% करावा अशी मागणी केली जात आहे, त्यावर आज निर्णय होणार आहे.
FM Nirmala Sitharaman to chair 50th #GST Council meeting in New Delhi todayhttps://t.co/9528QG8SGA
— All India Radio News (@airnewsalerts) July 11, 2023
यासोबतच कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणार्या औषधांच्या आयातीवर सूट दिली जाऊ शकते. दुर्धर आजारावरील काही औषधांवर याआधीच सूट देण्यात आली आहे. सध्या अशा आयातीवर 5 किंवा 12 टक्के आयजीएसटी लागतो. कर्करोगाच्या उपचारासंदर्भात असा निर्णय घेतल्यास भारतात उपचार घेणे स्वस्त होणार आहे.
ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर 28 टक्के जीएसटी लागू होऊ शकतो, तसा प्रस्ताव आधीच GST परिषदेकडे देण्यात आला आहे. GST कौन्सिलच्या मंत्रिगटाने (GoM) यावर 28 टक्के GST लावण्याचे आधीच मान्य केले आहे.यावर केवळ औपचारिकता बाकी आहे. असे असले तरी गोवा राज्याने मात्र या करवाढीला विरोध दर्शवला आहे. ऑनलाइन गेमिंगवर जास्तीत जास्त 18% GST आकाराला जावा या मागणीसाठी गोवा आग्रही आहे. त्यामुळे हा निर्णय सर्वसंमतीने होतो किंवा नाही याबाबत संदिग्धता आहे.