राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून शेतीच्या आधुनिकीकरणावर भर दिला जात आहे. शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी सरकारकडून विविध अवजारांवर अनुदान देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बरोबरच आता ट्रॉलीसाठी (subsidy on Tractor Trolley) अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना ट्रॉलीसाठी जास्त खर्च करावा लागणार नाही. सरकारी अनुदानामुळे पैशाअभावी ट्रॉली न घेऊ शकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायद्याची ठरणार आहे. आज आपण जाणून घेऊ सरकारकडून किती टक्के अनुदान मिळणार आहे आणि त्यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत.
45 ते 50 % अनुदान
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यात येत आहे (Agricultural Mechanization Scheme). यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून यांत्रिक अवजारांवर अनुदान देण्यात येत आहे. यासाठी एकूण 14,500 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान या निधीतून सरकारने यावर्षीपासून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसाठी देखील 45 ते 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना हे अनुदान लॉटरी पद्धतीने मिळणार आहे.
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी प्रात्याक्षिके आणि मनुष्यबळ विकासाद्वारे शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण केली जाते. तसेच या योजनेच्या माध्यमातून कृषी यंत्र किंवा अवजारे यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदानाच्या माध्यमातून अर्थसहाय्य देण्याचे या योजनेचे धोरण आहे. या योजनेतून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे, स्वयं चलित यंत्रे यांसह आता ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी देखील अनुदान दिले जाणार आहे.
पात्रतेचे निकष-
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेतून अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर (https://mahadbt.maharashtra.gov.in/) अर्ज करावा लागतो. यासाठी वैयक्तिक शेतकरी, महिला शेतकरी अर्ज करू शकतात. तसेच शेतकरी समूह गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थाही अर्ज करू शकतात. दरम्यान, यावर्षीपासून सर्वसाधारण गटासाठी ट्रॉलीला (Tractor Trolley) 45 टक्के अनुदान, तर अनुसूचित जाती, जमाती व इतर, अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
3 टन क्षमतेपर्यंतच्या ट्रॉली
3 टन क्षमतेपर्यंतच्या ट्रॉलीवर हे अनुदान मिळणार आहे. यासाठी अनुसुचित जाती इतर मागास अल्प भूधारक शेतकऱ्यांना 60000 तर सर्वसाधारण गटाला 50000 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज दाखल करायचा आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- 8 अ दाखला
- खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
- जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
- स्वयं घोषणापत्र
- पूर्वसंमती पत्र