केंद्र सरकारकडून लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर जाहीर केला जाणार आहे. पीएफवर किमान 8% व्याज दिले जाईल, असे सूत्रांनी म्हटले आहे. एकीकडे अल्प बचत योजनांवरील व्याज कमी होत असताना 'पीएफ'वर किमान 8% व्याज देऊन सरकारकडून 7 कोटी 'पीएफ'धारकांना खूश केले जाण्याची शक्यता आहे.
चालू आर्थिक वर्षात 'पीएफ'वरील व्याजाबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. पीएफचे कर्मचारी सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सरकारने पीएफवरील व्याजदरात कपात केली होती. पीएफचा व्याजदर 8.5% वरुन 8.1% इतका करण्यात आला होता. यामुळे पीएफ सभासदांमध्ये नाराजी आहे. मागील 40 वर्षांतला पीएफचा हा सर्वात कमी व्याजदर आहे. त्यापूर्वी 1977-78 मध्ये पीएफवरील व्याजदर 8% इतका होता. त्यानंतर मागील चार दशके पीएफमधील जमा रकमेवर 8.25% किंवा त्याहून अधिक व्याजदर देण्यात आला आहे. वर्ष 2018-19 मध्ये पीएफवर 8.65% व्याज देण्यात आले होते. वर्ष 2017-18 मध्ये 8.55% आणि 2016-17 मध्ये 8.65% व्याज देण्यात आले होते.

‘पीएफ’वर 8% व्याज दिल्यास किती रक्कम जमा होणार
सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 8% व्याजदर दिल्यास कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात मोठी रक्कम जमा होणार आहे. अनेक वर्षांपासून ज्यांनी पीएफ खात्यातून रक्कम काढलेली नाही अशा कर्मचाऱ्यांच्या खात्यात भक्कम शिल्लक असेल. त्यांना 8% व्याजाचा मोठा फायदा होईल. ज्यांच्या पीएफ खात्यात 5 लाखांची शिल्लक असेल अशांना 8% व्याजाने 40000 रुपये जमा होतील. ज्यांच्या पीएफ खात्यात 7 लाख रुपयांची शिल्लक आहे अशांना 8% व्याजामुळे 56000 रुपयांचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, मागील वर्षभरात अल्प बचत योजनांच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे पीएफ व्याजदराबाबत उत्सुकता वाढली आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच पीएफवरील व्याजदराची घोषणा केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठी सरकारने ईपीएफवर 8.1% व्याज दिले होते. वर्ष 2022-23 साठीही हाच व्याजदर कायम राहण्याची दाट शक्यता आहे. वर्ष 2024 मध्ये लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्या डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार  व्याजदर कमी करण्याची चूक करणार नाही, असेही बोलले जाते.   
पीएफ खात्यातील रक्कम अशी तपासा
कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यातील शिल्लक तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. कर्मचाऱ्यांना 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN ENG असा एसएमएस पाठवल्यास त्यातून शिल्लक रक्कम किती आहे याची माहिती मिळू शकते.
खालील पर्यायांचा अवलंब करुन तुम्ही तुमची शिल्लक तपासू शकता.
पायरी 1: EPFO च्या अधिकृत वेबसाइट - epfindia.gov.in वर जा. 
पायरी 2: डॅशबोर्डच्या वर तुम्हाला  'सेवा' विभाग दिसेल. येथे क्लिक करा आणि या विभागातील ‘कर्मचाऱ्यांसाठी’ हा पर्याय निवडा.
पायरी 3: तुम्हाला तुमच्या समोर एक नवीन पृष्ठ (पेज) दिसेल. आता ‘सेवा’ विभागाच्या खाली दिलेला  ‘सदस्य पासबुक’ हा पर्याय निवडा. इथून तुम्हाला लॉगिन पेजवर जाता येईल.
पायरी 4: तुमचा UAN तपशील आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. तुम्हाला कॅप्चा कोडचे उत्तर देखील द्यावे लागेल.
पायरी 5: यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर,  तुम्हाला EPF खात्यावरवरील तपशील बघता येतील. येथे, कर्मचारी आणि नियोक्ता यांच्या योगदानाचे तपशील सादर केले आहेत. तुम्हाला मिळालेले व्याज देखील याठिकाणी दिसेल.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            