Gold Jewellery Import: सोने आयात करताना सरकारी धोरणातील पळवाटांचा फायदा काही व्यापारी आणि डिलर्स घेत असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता सोन्याच्या काही ठराविक दागिन्यांच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मागील पाच महिन्यांपासून व्यापारी तूट वाढत असल्यानेही आयातीवर निर्बंध घातले आहे.
आयात करताना परवाना आवश्यक
ठराविक प्लेन सोन्याचे दागिने आणि आर्टिकल्स आयातीवर बंदी घातली आहे. दरम्यान, भारत-संयुक्त अरब अमिरात देशातील व्यापारी कराराअंतर्गत सोन्याची आयात करता येतील. मात्र, त्यासाठी व्यापाऱ्याकडे परवाना आवश्यक आहे. विना परवाना सवलतीत सोन्याची आयात करण्यावर निर्बंध राहतील. परकीय व्यापार महासंचालकांनी (DGFT) याबाबत निर्णय घेतला आहे.
इंडोनेशियातून सोन्याची आयात
मागील काही महिन्यांपासून इंडोनेशियातून भारतात सोन्याची आयात वाढली होती. इंडोनेशिया हा कधीही सोने निर्यातदार देश नव्हता. मात्र, सरकारी धोरणातील पळवाटा शोधून काही व्यापारी इंडोनेशियामार्गे भारतात सोने आयात करत होते. विनाशुल्क आयात केलेले हे दागिने वितळून भारतात विक्री होत असल्याचे सरकारच्या लक्षात आले. मागील काही महिन्यांत तीन ते चार टन सोने भारतात आल्याने आता सरकारने तातडीने आयातीवर बंदी घातली. इंडोनेशियातून आयात होणाऱ्या सोन्यावर देखील निर्बंध घातले आहेत.
भारत आणि आशियाई देशांमध्ये मुक्त व्यापार करार आहे. त्याअंतर्गत विनाशुल्क काही वस्तू आयात करता येतात. या धोरणाचा गैरवापर होत असल्याचे दिसून आले आहे.
वित्तीय तूट रोखण्यासाठी सरकारचे पाऊल
भारताची व्यापारी तूट पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहचली आहे. निर्यात 10% कमी झाली आहे. पाश्चिमात्य आणि इतर देशांकडून मागणी कमी झाल्याचा भारतीय व्यापारावर परिणाम झाला आहे.