• 07 Dec, 2022 09:49

Small Saving Schemes Rate Hike : लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ!

small saving schemes rate hike

Small Saving Schemes Rate Hike : सरकारने आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून किसान विकास पत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि 2 ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.1 ते 0.3 टक्क्यांनी वाढ केली.

Small Saving Schemes Rate Hike : केंद्र सरकारने सध्या सुरू असलेल्या किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिस बचत योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना अशा काही निवडक बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली. वाढत्या महागाईच्या काळात आणि महागड्या कर्जाने आर्थिक कोंडीत सापडलेल्यांना सरकारने थोड्याफार प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी काही निवडक बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. करपात्रतेसाठी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या या योजनांच्या व्याजदरात 30 बेसिस पॉईंटपर्यंत वाढ करण्यात आली. पण या व्याजदर वाढीच्या निर्णयातून पीपीएफ, सुकन्य समृद्धी योजना आणि नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट या योजना वगळण्यात आल्या आहेत. त्यांच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

9 तिमाही अहवालानंतर सरकारकडून प्रथमच व्याजदरात वाढ!

2020-21 च्या पहिल्या तिमाहीत लहान बचत योजनांवरील व्याजदरात सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर आता सरकारने या योजनांवरील व्याजदरात वाढ केली. 2020-21 मध्ये या योजनांवरील व्याजदर कमी करण्यात आले होते. साधारणत: लहान बचत योजनांचे व्याजदर हे तिमाही अहवालाच्या आधारावर बदलले जातात.

पोस्ट, ज्येष्ठ नागरिक आणि KVP योजनांवर वाढ

पोस्टाच्या 3 वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.5 टक्के व्याज मिळत होते. त्यात 30 बेसिस पॉईंटची वाढ करून ते 5.8 टक्के करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवर 7.4 टक्के व्याज मिळत होते. त्यात 20 बेसिस पॉईंटने वाढ करून ते 7.6 टक्के केले आहे. सरकारन किसान विकास पत्र योजनेचा कालावधी आणि व्याजदर असं दोन्हीमध्ये सुधारणा केली. किसान विकास पत्र योजनेचा नवीन व्याजदर हा 7 टक्के असणार आहे आणि याचा नवीन मॅच्युरिटी कालवधी 123 महिन्यांचा असणार आहे. यापूर्वी याचा व्याजदर 6.9 टक्के तर कालावधी 124 महिन्यांचा होता. तर मासिक उत्पन्न योजनेचा व्याजदर 6.6 टक्क्यांवरून 6.7 टक्के करण्यात आला.

पीपीएफ आणि एनएससीचे व्याजदर जैसे थे!

सरकारने मात्र पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) आणि नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट (NSC) या योजनांच्या व्याजदरात कोणताच बदल केला नाही. या बचत योजनांचे वार्षिक व्याजदर अनुक्रमे 7.1 टक्के आणि 6.8 टक्के आहेत. पोस्टाच्या एक वर्षाच्या फिक्स डिपॉझिटवर 5.5 टक्के, तर 5 वर्षांच्या एफडीवर 6.7 टक्के व्याजदर मिळेल आणि आवर्ती ठेव (Recurring Deposit) योजनेवर 5.8 टक्के व्याजदर मिळेल.

सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.6 टक्के!

सरकारने मुलींच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नाच्या खर्चासाठी सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवरील (Sukanya Samriddhi Yojana) व्याजदर पूर्वीप्रमाणे 7.6 टक्केच ठेवला आहे. सरकारने 7 योजनांवरील व्याजदर पूर्वीप्रमाणे कायम ठेवले आहेत. तर 5 योजनांच्या व्याजदरात वाढ केली. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने या आर्थिक वर्षात 4 वेळा 190 बेसिस पॉईंटने रेपो दरात वाढ केली. त्यामुळे बॅंकांनीही ठेवींवरील व्याजदरात वाढ केली.