UMED Mission : ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सरकार अनेक प्रकारे मदत करत आहे. त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान. राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोंनती अभियानाची सुरुवात 2011 मध्ये केली. या अभियानाची अंमलबजावणी राज्यातील 34 जिल्हे व 351 तालुक्यात केली जात आहे.
Table of contents [Show]
उमेद मिशन काय आहे?
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (Maharashtra State Rural Livelihood Mission) म्हणजेच उमेद मिशन. या अंतर्गत राज्यात 5 लाख स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करण्यात आली. 30 हजारांच्या वर ग्राम संघांची स्थापना करण्यात आली. यातून महिलांना स्वरोजगार उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार निर्माण करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी केंद्राचा 75 टक्के तर राज्याचा 25 टक्के निधी येतो. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला एकत्र गृह उद्योग स्थापन करतात. कोरोना मास्क तयार करणे, घरगुती नाश्ता सेंटर यासारखे व्यवसाय महिलांनी स्थापन केले आहे.
महिला सक्षमीकरणासाठी सरकारचे योग्य पाऊल
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत बचत गटातील महिलांनी उद्योग व्यवसायात झेप घेतली आहे. महिला सक्षमीकरणासाठी हे पाऊल सरकारने उचलले आहे. विकासाच्या दिशेने भरारी घेण्यासाठी महिलांच्या पंखांमध्ये बळ निर्माण करण्याचे काम उमेद मिशनच्या माध्यमातून केले जात आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब कुटुंबाना समृद्ध, आत्मसन्मान आणि सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी उमेद अंतर्गत चिकाटीने प्रयत्न केले जात आहे.
उमेदचे कार्य
ग्रामीण भागातील महिलांना साक्षर बनवणे, त्याचबरोबर गरीबी दूर करणे, त्यांना स्वतः च्या बळावर जगायला शिकवणे हे काम उमेद या संस्थेमार्फत केले जाते. याच कामाचा एक भाग म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना एकत्र आणून त्यांचा बचत गट स्थापन करणे. बचत गट स्थापन करण्यासाठी 3 संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी एक म्हणजे उमेद. उमेद कडून प्रत्येक गावात एक CRP निवडला जातो. त्याच्याकडे आपल्या संस्थेची माहिती महिलांना पटवून सांगणे, ज्या महिला अजूनही बचत गटामध्ये नाही त्यांना माहिती देवून आर्थिक साक्षर बनवणे हे काम असते. महिलांना तयार करून त्यांच्या बचत गटाची नोंदणी करून देणे हे सुद्धा काम CRP करते.
उमेद मिशनच्या आधाराने उद्योग स्थापना
उमेद ही संस्था बचत गट स्थापन करते, त्यातून महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महिला बचत गट जे ठराविक कालावधीत पैसे जमा करतात आणि त्यांच्या सहकारी सदस्यांना आवश्यकतेनुसार कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य देतात. संस्थेमार्फत सुद्धा कर्ज उपलब्ध करून दिले जाते. बचत गट स्थापनेच्या काही दिवसानंतर पहिले कर्ज दिले जाते. त्या कर्जाची रक्कम 1 लाख रुपये असते. संपूर्ण बचत गट मिळून त्यातून व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. काही महिला स्वतः चा वेगळा व्यवसाय सुद्धा स्थापन करतात.
आतापर्यन्त महाराष्ट्रात अनेक महिलांनी यामाध्यमातून व्यवसाय स्थापन केले आहे. उदा. अमरावती जिल्ह्यातील राजुरा बाजार या गावात महिलांनी पापड व्यवसाय सुरू केला आहे. त्या ठिकाणी बचत गटातील सर्व महिला काम करतात. त्यातून मिळणारा नफा सर्वजण वाटून घेतात. काही वेळा बाहेरील महिलांना सुद्धा रोजगार दिला जातो. आशाप्रकारे अनेक महिलांनी स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा रोजगार उपलब्ध केला. उमेद मिशनच्या माध्यमातून अनेक महिला साक्षर झाल्यात. त्यांची परिस्थिती सुधारली.