वाढत्या महागाईची झळ जनतेला पोहचू नये म्हणून केंद्र सरकारकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे गव्हाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अन्न महामंडळाने (FCI) ई लिलाव करून गव्हाची खुल्या बाजारात विक्री केली आहे.यासाठी सरकारने आतापर्यंत 13 ई-लिलावाचे यशस्वीरित्या आयोजन करून आतापर्यंत तब्बल 18.09 लाख मेट्रिक टन (LMT) गहू विकला आहे.
21.25 रुपये प्रति किलो दराने विकला गहू
केंद्रीय वाणिज्य मंत्रालय आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातील माहितीनुसार सरकारने ओपन मार्केट विक्री धोरणानुसार (OMSS) गव्हाची विक्री करण्यात आली आहे. यासाठी सरकारकडून ऑनलाईन लिलावाचे आयोजन करण्यात येत असून आता पर्यंत 13 लिलाव पार पडले आहेत. या लिलावात FCI ने लिलावासाठी 2,125 रुपये प्रति क्विंटल अशी राखीव किंमत निश्चित केली होती. ही किंमत सध्या गव्हाच्या सध्याच्या किमान आधारभूत किंमती इतकीच असल्याचेही प्रत्रकात म्हटले आहे. सरकारकडून प्रत्येक लिलावावेळी सरासरी 2 लाख टन गव्हाची विक्री करण्यात आली आहे.
गव्हाच्या किमती स्थिर
सरकारकडून खुल्या बाजारात गव्हाची विक्री होत असल्याने गव्हाचे दर स्थिर झाले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार ऑगस्टमध्ये करण्यात आलेल्या लिलावावेळी गव्हाची सरासरी विक्री किंमत ही 2,254.71 रुपये प्रति क्विंटल इतकी होती. मात्र आता सप्टेंबरमध्ये झालेल्या लिलावात गव्हाच्या सरासरी विक्री किमतीमध्ये 2,163.47 रुपयांपर्यंत घट झाली आहे. याचाच अर्थ खुल्या बाजारात गव्हाचे दर मंदावले असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. तसेच लिलावामध्ये सध्या 90 टक्क्यांपेक्षा जास्त गहू विक्री नाही, म्हणजेच सध्या बाजारात सध्या गव्हाचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे ही सरकारने म्हटले आहे. तसेच 2023-24 च्या या काळात यापुढेही खुल्या बाजारात गहु विक्री कऱण्यासाठी शिल्लक साठा आहे. त्यामुळे भविष्यातही गव्हाच्या किमती नियंत्रणात राहण्यासाठी हातभार लागेल असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.