महाराष्ट्र सरकारच्या वतीने यावर्षीपासून ‘उद्योगरत्न’ पुरस्कार सुरु केला जाणार आहे. उद्योग क्षेत्रात महत्वाची आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योगपतींना हा पुरस्कार दिला जाणार आहे. यंदाचा पहिला पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना जाहीर केला गेला आहे. याबाबतची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. तसेच हा पुरस्कार सुरु करण्यामागचा उद्देश देखील त्यांनी सांगितला. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर हा पुरस्कार दिला जाणार असून, त्यासाठी एक विशेष समिती गठीत केली जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
युवा आणि महिला उद्योगपतींचा देखील सन्मान!
महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात मोलाचे काम करणारे अनेक महिला व युवा उद्योगपती आहेत. यांच्या कामाचे देखील कौतुक केले जावे अशी सरकारची इच्छा आहे असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे ‘उद्योगरत्न’ पुरस्कारासोबतच ‘युवा उद्योजक’, ‘महिला उद्योजक’ आणि ‘मराठी उद्योजक’ अशा तीन श्रेणींमध्ये विशेष पुरस्कार दिले जाणार असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
Maharashtra Government has decided to award the first Udyogratna Award to the visionary industrialist Shri Ratan Tata ji. His impressive contribution in the field of social work and the elevation of India's standing in the industrial sphere set a new benchmark. Many… pic.twitter.com/8FsRR0kxZl
— Chandra Prakash (@chandra007) July 29, 2023
पुरस्काराचे स्वरूप…
महाराष्ट्र भूषण पुरस्कार्थी व्यक्तींना 25 लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव होत असतो. त्याच अधर्तीवर सुरु केलेल्या ‘उद्योगरत्न’ पुरस्काराबाबतचे तपशील मात्र उद्योगमंत्र्यांनी दिलेले नाहीत. या पुरस्काराचे स्वरूप काय असेल हे लवकरच जाहीर केले जाईल असे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच पुरस्कार वितरण कार्यक्रम कधी आणि कुठे घेतला जाईल याची देखील स्पष्टता सरकारने अजून दिली नाहीये.
महाराष्ट्रातील उद्योग धोरण फायद्याचे!
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्रात महत्वाचे बदल होत असून, वेगवगेळ्या राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारचे उद्योग धोरण या कामी महत्वाचे ठरत असून राज्यात उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.