यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य शासनाकडून विविध सोयी सुविधा देण्याचा धडाका लावण्यात आला आहे. गणेशोत्सवसाठी (Ganesh Festival) कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा एसटी बसेस, जादा रेल्वे गाड्या, तसेच गणेश मंडळांना 5 वर्षाचा एकदाच परवाना, 100 रुपयांत गणेशोत्सवासाठी शासकीय जागा भाड्याने यासारख्या निर्णयांचा धडाकाच शासनाकडून सुरू आहे. त्यातच आता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तासांठी टोल माफीचा (waive off Toll charges) आणखी एक दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मुंबई -बंगळुरू मार्गावरील टोल माफ
गणरायाचे आगमन लवकरच होणार आहे. त्यामुळे मुंबईतील चाकरमानी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवासाठी कोकणात जात आहेत. गणपती उत्सवासाठी रस्ते मार्गाने कोकणात जाणाऱ्या या गणेशभक्तांना सर्वसोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी सार्वजिनक दिल्या होत्या. त्यानुसार गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना आता टोल माफ करण्यात आला आहे. 16 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोबर या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना आता टोल आकारला जाणार नाही. ही सवलत मुंबई - बंगळुरु आणि मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गासह सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अखत्यारीतील रस्त्यांवर असलेल्या टोलनाक्यांवर लागू असणार आहे.
सवलतीसाठी 'गणेशोत्सव 2023, कोकण दर्शन'पासची गरज-
राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या टोल माफीची सवलत घेण्यासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना 'गणेशोत्सव 2023, कोकण दर्शन' अशा आशयाचा टोल पास घेणे बंधनकारक असेल. हे पास प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलीस प्रशानस विभाग, पोलीस चौकी या ठिकाणी उपलब्ध केले जाणार आहेत. या टोल माफी पासवर वाहनांचा क्रमांक, चालकाचे नाव टाकण्यात येणार आहे.
परतीचा प्रवासही टोलमुक्त
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी देखील टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परतीच्या प्रवासावेळी टोलमाफी सवलत मिळवण्यासाठी वाहनचालकांना ‘गणेशोत्सव 2023, कोकण दर्शन’ हाच पास ग्राह्य धरला जाणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारकडून गणेशोत्सवासाठी सुविधा-
राज्य सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणेशभक्तांना आणि मंडळांना मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेषत: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारने कोकण रेल्वे मार्गावर नियमित मेल-एक्सप्रेस व्यतिरिक्त गणेशोत्सव काळात 312 स्पेशल ट्रेन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 3,100 जादा एसटी बसेस ही या काळात सोडण्यात येणार आहेत. याशिवाय गणेश मंडळांना 5 वर्षासाठी एकदाच परवाना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच बरोबर उत्कृ्ट मंडळांना 100 रुपयांत गणेशोत्सवसाठी शासकीय जागा भाड्याने दिली जाणार आहे.