Alphabet Layoffs: गुगल समूहामधील अल्फाबेट कंपनीने 12 हजार कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या 6% कर्मचारी कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे अल्फाबेट कंपनीचे सीइओ आहेत. मागील काही महिन्यांपासून आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी मोठी नोकरकपात केली आहे. जागतिक महामंदी आणि रोडावलेल्या उत्पन्नामुळे कंपन्यांनी नोकर कपातीवर भर दिला आहे.
अल्फाबेटच्या देशभरातील विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश नोकर कपातीमध्ये आहे. कर्मचारी कपातीच्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी माझी असल्याचे सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील सर्वाधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत.
काय म्हणाले सुंदर पिचाई?(Suder Pichai message to employee)
आपण जे ध्येय ठरवलं आहे ते ताकदीचे आहे. भविष्यातील संधीबद्दलही मला खात्री आहे. आपण खूप लवकर कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामध्ये गुंतवणूक सुरू केली असून आपली उत्पादने आणि सेवांचे मुल्यही जास्त आहे. जे कर्मचारी कामावरुन कमी केले जातील त्यांना भविष्यातील संधी शोधण्यासाठी मदत केली जाईल. अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना नोटीस पिरियड पूर्ण होईपर्यंत पुढील 60 दिवस पूर्ण पगार देण्यात येईल, असे पिचाई यांनी संदेशात म्हटले आहे.
सहा टक्के कर्मचारी कपात( Alphabet reduced 6 percent workforce)
ज्या कर्मचाऱ्यांची कामगिरी चांगली नाही, अशा 6% कर्मचाऱ्यांना अल्फाबेट कमी करण्याच्या तयारीत आहे, अशी बातमी मागील काही दिवसांपासून वृत्तपत्रांमध्ये येत होती. आज ही बातमी खरी ठरली. गुगलमध्ये दीड लाखांपेक्षाही जास्त कर्मचारी आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना दोन लाख डॉलरपेक्षा जास्त सरासरी पगार देण्यात येतो. अॅमेझॉन, मेटा, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर यांच्या पंगतीमध्ये आता गुगलही जाऊन बसली आहे. या सर्व बलाढ्य आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे.
आघाडीच्या कंपन्यांकडून कर्मचारी कपात
मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी 13% म्हणजेच 11 हजार कर्मचारी कपात केली. तर ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांनी साडेसात हजार कर्मचारी कपात केली. अॅमेझॉननेही 18 हजार कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली आहे. तर मायक्रोसॉफ्टने 10 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            