Google Layoff: जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर बड्या कंपन्यांकडून खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुगलची सहयोगी कंपनी अल्फाबेटने मनुष्यबळ व्यवस्थापन विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची बातमी समोर येत आहे. न्यूयॉर्क टाइम्सने यासंबंधी वृत्त दिले आहे.
मनुष्यबळ विभागातील कर्मचाऱ्यांची नोकरकपात
गुगलच्या मनुष्यबळ विभागात 3 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी होते. मात्र, मागील वर्षापासून झालेल्या कर्मचारी कपातीत ही संख्या कमालीची रोडावली. आता नव्याने HR विभागातील कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. यातील अनेक कर्मचाऱ्यांसाठी नोकर कपातीची बातमी धक्कादायक होती. दैनंदिन काम करत असताना कोणतीही पूर्वकल्पना न देता कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची बातमी दिली. नक्की किती कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले याची माहिती मिळू शकली नाही.
कर्मचारी भरती रोडावल्याने फटका
कोरोना काळात सॉफ्टवेअर कंपन्यांनी सर्वाधिक कर्मचारी भरती केली. (Google layoff in HR dept) मात्र, कोविड साथ ओसरल्यानंतर आयटी क्षेत्राला उतरती कळा लागली. नव्याने भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पगार जास्त दिल्याने खर्च वाढला होता. मात्र, आता कर्मचारी भरती रोडावल्याने HR विभागाचे काम कमी झाले झाले.
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील गुंतवणुकीत दुपटीने वाढ
एकीकडे खर्च कमी करण्यासाठी नोकर कपात सुरू असताना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रकल्पांवरील गुंतवणूक दुपटीने वाढवली आहे. ChatGPT बॉटच्या यशानंतर बड्या टेक कंपन्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संधींवर लक्ष केंद्रित केले आहे. गुगल, अॅमेझॉन, मायक्रॉसॉफ्टसह इतरही अनेक कंपन्या फ्युचर टेक्नॉलॉजीवर काम करत आहेत.
सुंदर पिचाई यांच्यावर टीका
तडकाफडकी कर्मचारी कपात केल्यामुळे मागील वर्षीपासून CEO सुंदर पिचाई यांच्यावर टीका होत आहे. कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना न देता कामावरून कमी करणे. रात्रीत अचानक कामासंबंधी सॉफ्टवेअरचा अॅक्सेस काढून घेतल्याच्या कहाण्या अनेक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडिया साइटवर शेअर केल्या होत्या. त्यामुळे पिचाई यांच्यावर टीका झाली होती.
6% कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा
गुगल आणि अल्फाबेटमध्ये मिळून 1 लाख 80 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. मात्र, मागील वर्षीपासून एकूण कर्मचाऱ्यांच्या 6% नोकरकपात करण्यात आली. टेक्नॉलॉजी, अॅडमिन, रिसर्चसह विविध विभागातील 12 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. चालू वर्षातील गुगलने दुसऱ्यांदा नोकर कपात केली आहे.