जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन 'गुगल'ची मूळ कंपनी अल्फाबेटने 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. अल्फाबेट वर्कर्स युनियनने (AWU) या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. AWU हा Google कर्मचार्यांचा एक लहान पण उदयोन्मुख असा गट आहे, जो नोकर कपाती विरोधात आवाज उठवत असताना दिसतो. युनियनचे याविषयी असे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे कंपनीचे कर्मचारी आणि क्षमता प्रभावित होतील. AWU च्या मते, Google ही जगातील सर्वात फायदेशीर कंपन्यांपैकी एक आहे, त्यामुळे ती सहजपणे इतक्या कर्मचार्यांना कामावर ठेवू शकते.
अल्फाबेटने अलीकडेच मोठ्या प्रमाणात नोकर कपातीची घोषणा केली आहे. 12 हजार कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे. संपूर्ण जगात गुगलच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी हे प्रमाण 6 टक्के इतके आहे. कंपनीचे CEO सुंदर पिचाई यांनी अनेकांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल ते म्हणाले की "या बदलांचा Googlers च्या जीवनावर होणारा खरा परिणाम हा माझ्यावर मोठा भार आहे आणि ज्या निर्णयांनी आम्हाला येथे आणले त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो."बिझनेस टुडेच्या अहवालानुसार युनियनचा दावा आहे की गुगल ही जगातील सर्वात फायदेशीर कंपन्यांपैकी एक असल्याने नोकर कपात अनावश्यक आहे.
गुगलचा नफा किती?
2021 मध्ये गुगलने 13,76,59,62,50,000 रुपयांचा नफा कमावला आहे. जो मोजतानाही चक्रावून जायला होते. 256.7 बिलियन डॉलर्स इतका गुगलचा नफा आहे. 2022 मध्ये पहिल्या 3 तिमाहीचाच नफा अजूनपर्यंत जाहीर झालेला आहे. 2021 पर्यंत पूर्ण वर्षाचा गुगलचा नफा हा वाढता राहिला आहे.