संसेदत आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष 2023-2024 साठीचे बजेट सादर करणार आहे. बजेटमध्ये सरकार कोणत्या घटकांना खूश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यापूर्वीच केंद्र सरकारला गुड न्यूज मिळाली आहे. जानेवारी महिन्यात वस्तू आणि सेवा करातून (GST Collection in Jan 2023) 1.56 लाख कोटींचा महसूल मिळाला आहे. जीसएटी कर प्रणाली लागू झाल्यापासून एक महिन्यात मिळालेला हा दुसरा सर्वाधिक महसूल आहे. जीएसटीच्या बंपर महसुलाने सरकारचा आत्मविश्वास दुणावला आहे.
अर्थ मंत्रालयाने मंगळवारी 31 जानेवारी रोजी वस्तू आणि सेवा कर महसुलाची आकडेवारी जाहीर केली. जानेवारी 2023 या महिन्यात सरकारला जीएसटीमधून 1.56 लाख कोटींचा महसूल मिळाला आहे. जीएसटी लागू झाल्यापासून हा एकाच महिन्यात मिळालेला दुसरा सर्वाधिक महसूल आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये सर्वाधिक 1.68 लाख कोटींचा महसूल मिळाला होता. सरकारने 1 जुलै 2017 पासून देशभरात जीएसटी लागू केला होता.
असा मिळाला जीएसटी कर
जानेवारी महिन्यात सेंट्रल जीएसटी करातून 28963 कोटी, स्टेट जीएसटीमधून 36730 कोटी आणि आयजीएसटीमधून 79599 कोटींचा महसूल मिळाला असल्याचे अर्थखात्याने म्हटले आहे. सेसमधून 10630 कोटी मिळाले. ही आकडेवारी 31 जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची आहे. जानेवारी 2022 च्या तुलनेत जीएसटी कर महसुलात 10.6% वाढ झाली आहे. जानेवारी 2022 मध्ये 1.41 लाख कोटींचा जीएसटी कर मिळाला होता. डिसेंबर 2022 च्या तुलनेत जानेवारी महिन्यात जीएसटी करात 4.7% वाढ झाली. जीएसटी कौन्सिलकडून वस्तू आणि सेवा कर निश्चित केले जातात.