Mahila Samman Yojana: महाराष्ट्र राज्याच्या सन 2023 - 24 च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये 50 % सवलत घोषित केली आहे. आधी जेष्ठ नागरिक आणि शालेय मुलींना तिकीटमध्ये सवलत देण्यात आली होती.
पण काल म्हणजेच 17 मार्च 2023 पासून सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये 50 % सवलत देण्यास सुरवात केली आहे. या सवलतीची compensatory शासनाकडुन करण्यात येणार आहे.
सर्व महिलांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या साधी, मिनी, निमआराम, एसी, शयन आसनी, शिवशाही, शिवनेरी बसेसमध्ये 50 % सवलत कालपासून सुरू झाली आहे.
ही देण्यात आलेली सवलत भविष्यात रा.प. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणा-या सर्व प्रकारच्या बसेस करिता देखील लागू राहील. ही योजना ही 'महिला सन्मान योजना 'या नावाने संबोधण्यात येत आहे.
ही सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत मर्यादित आहे. ही सवलत शहरी वाहतूकीस लागु नाही. ज्या महिलांनी रा.प. महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking) घेतलेले आहे. अश्या महिलांना 50 % सवलतीचा परतावा देण्यात येणार नाही. सवलत सुरू केलेल्या दिनांक पुर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येऊ नये.
सर्व महिलांना प्रवास भाडयात 50 % सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी विंडो बुकींगव्दारे ऑनलाईन, मोबाईल अॅपव्दारे, संगणकीय आरक्षणाव्दारे तिकीट घेतील, अशा प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसुल करण्यात यावा. मॅन्युअल पद्धतीने तिकीट देतांना महिलांना दिलेल्या 50 % सवलतीच्या मुल्याची गणना करतांना स्वतंत्र तिकीट छपाई करावी लागेल.
काही महिलांनी काल या सवलतीचा लाभ घेतला..
महिला सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या रूपाली ताई सांगतात, या आधी जेव्हा कुठे मीटिंगसाठी जायचं म्हटलं की विचार यायचा, पैसे तर मोजकेच आहे. मग राहू दे मोबाइल कॉल करू. पण मोबाइल व्यवस्थित बोलणं होत नाही.
पैशाच्या प्रॉब्लेममुळे खूप इच्छा माराव्या लागत होत्या. पण आता महिला हाच विचार करणार की जाण्याच्या तिकीटमध्ये येणं जाणं होणार. शासनाने घेतलेला निर्णय खूप चांगला आहे. महिलांना त्यांचे स्वातंत्र आणखी अनुभवायला मिळेल. या आधी मी वरुड ते अमरावती हा प्रवास 130 रुपयांत केलाय, पण आज मी 130 रुपयांत येणं जाणं केलंय.
कॉलेजच्या मुली बरोबर चर्चा केली असता त्यातील गौरी ताई सांगतात की, आमच्या घरी आम्ही 3 बहिणी आहोत. गावतील शाळेचे शिक्षण संपले आता आई बाबा विचार करत होते. दोघींचं प्रवास भाडं कसं अॅडजस्ट होणार? म्हणून एकीने घरूनच अभ्यास करायचा. पण शासनाच्या या निर्णयाने आता आम्ही दोघी सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेऊ शकणार. ही आमच्या साठी खूप आनंदाची बाब आहे.
1 ते 8 वर्गातील मुलींना मोफत पास…..
बऱ्याच ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी गावतील मुलांना तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. प्रवास भाडे महाग असल्याने काही मुलांचे शिक्षण अर्धवट राहून जाते. त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे, काही अडचणी येऊ नये, या उद्देशाने 1 ते 8 वर्गातील मुलींना शासनाकडून मोफत पास दिल्या जाते. त्यामुळे आज अनेक मुली आपल्या आवडीच्या शिक्षण घेत आहे.