महिलांना बचत गटाद्वारे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारे महिला समृद्धी योजना राबवली जाते. ही योजना इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी लागू आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अत्यल्प व्याज दराने महिला लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा करण्यात येईल.
योजनेच्या प्रमुख अटी
अर्जदार इतर मागासवर्गीय असावा. महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे. संपूर्ण कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागासाठी 98 हजार रुपये व शहरी भागासाठी 1 लाख 20,000 हजार रुपये एवढी असावी.
पाच लाखांपर्यंत कर्ज
या योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना बचत गटांमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येईल. प्रकल्प मर्यादा पाच लाखांपर्यंत असून बचत गटातील 20 सभासदांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे कर्ज देण्यात येईल. या योजनेत राष्ट्रीय महामंडळाचा 95% सहभाग आहे तर राज्य महामंडळाचा सहभाग 5% सहभाग राहील. या कर्जावर 4% टक्के व्याजदर असून परतफेडीसाठी 3 वर्षांचा कालावधी आहे. विहित नमुन्यातील कर्ज मागणी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावे. राष्ट्रीय मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घेता येईल.
अनूसुचित जातीतील चर्मकार समाजासाठीही (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) महिला समृद्धी योजना राबवली जाते. मात्र, त्या योजनेच्या अटी आणि पात्रता वेगळ्या आहेत. अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाद्वारे ही योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://sjsa.maharashtra.gov.in संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.