दिवाळखोरीत निघालेल्या गो फर्स्टपुढे आता नवीन संकट उभे राहिले आहे. कंपनीची दिवाळखोरीची प्रक्रिया लवादापुढे सुरु झाली असून पुन्हा उभारी घेईल की नाही या चिंतेने पायलट्स आणि केबिन क्रू विभागात सामूहिक राजीनाम्याचे सत्र सुरु आहे. ही पडझड रोखण्यासाठी कंपनीने पायलट्ससाठी 1 लाख रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.
गो फर्स्टने याच महिन्याच्या सुरुवातीला 2 मे 2023 रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे दिवाळखोरीची याचिका दाखल केली होती. कंपनीची विमान सेवा तात्पुरती खंडीत करण्यात आली आहे. मात्र आर्थिक संकट दूर झाले आणि नादुरुस्त इंजिनाऐवजी नवीन इंजिन्स मिळाली तर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सेवा पुन्हा सुरु होईल, असा आशावाद गो फर्स्टच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, दिवाळखोरीमुळे कंपनीचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. त्यामुळे कंपनीतील शेकडो कर्मचाऱ्यांनी इतरत्र नोकरीचा शोध सुरु केला आहे. पायलट्स आणि केबिन क्रू विभागातील शेकडो स्टाफने राजीनामा दिला आहे. राजीनामे थांबले नाही तर भविष्यात कंपनीकडे कुशल मनुष्यबळाची मोठी वानवा निर्माण होईल. यामुळे विमान सेवा पुन्हा सुरु करण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी आता राजीनामे देणाऱ्या कर्मचाऱ्यांना थांबवण्याचे शर्थीचे प्रयत्न गो फर्स्टच्या व्यवस्थापनाने सुरु केले आहेत.
कर्मचाऱ्यांना या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाने मेल लिहला आहे. त्यात राजीनामा मागे घेणाऱ्या कॅप्टन्सना 1 जून 2023 पासून नियमित वेतनासोबत 1 लाख रुपयांचे अतिरिक्त रक्कम दिली जाईल, असे म्हटले आहे. गो फर्स्टकडे सर्व विभागाचे मिळून जवळपास 7000 कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. त्याशिवाय 10000 कर्मचारी अप्रत्यक्षपणे गो फर्स्टशी संलग्न आहेत. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर जवळपास 3000 हून अधिक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला होता.
गो फर्स्टकडे 54 विमानांना सेवा देता येईल इतके मनुष्यबळ उपलब्ध आहे. मात्र इंजिनाचा प्रश्न निकाली निघाला तर कंपनीकडून पूर्ण क्षमतेने सेवा सुरु करु शकते. त्यासाठी तितक्याच प्रमाणात मनुष्यबळ लागले. म्हणून कंपनी व्यवस्थापनाने राजीनामा सत्र रोखण्यासाठी वेतनवाढ किंवा बोनस देण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जाते.
कॅप्टनबरोबरच को-पायलट्स आणि फर्स्ट ऑफिसर यांना राजीनामा मागे घेतल्यास दर महिन्याला 50000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे.31 मे 2023 पूर्वी पेरोलवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीचा राजीनामा देऊ नये म्हणून ही घोषणा कंपनीने केली आहे. याशिवाय ज्या वैमानिकांनी अलीकडे राजीनामा दिला असेल अशांना 15 जून 2023 पूर्वी मागे घेण्यासाठी प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा कंपनीने केली आहे.
कंपनीने 4 जून 2023 पर्यंत विमान सेवा खंडीत केल्याचे जाहीर केले आहे. याबाबत कंपनीने ट्विट करुन प्रवाशांना माहिती दिली. कंपनीकडे 61 विमानांचा ताफा आहे. त्यापैकी निम्मी विमाने जमिनीवर आहेत. नादुरुस्त इंजिनमुळे कंपनीला विमान सेवा खंडीत करावी लागली.