Investigative Journalists Report: भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांच्या कारभाराबाबत आणखी एक गुप्त अहवाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक शोध पत्रकारांची संघटना लवकरच एखाद्या अहवालाचा बॉम्ब टाकण्याच्या तयारीत आहे. ज्याप्रमाणे हिंडेनबर्ग अहवालाचा अदानी समुहावर परिणाम झाला, त्याचप्रमाणे या अहवालाचा भारतीय कॉर्पोरेट कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो. तसेच शेअर बाजारात उलथापालथही होऊ शकते.
शोध पत्रकारांची संघटना जाहीर करणार अहवाल?
ऑर्गनाइज्झ क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) ही जागतिक शोध पत्रकारांची संघटना गुप्त अहवालावर काम करत आहे. George Soros सारख्या अब्जाधीश गुंतवणुकदारांचा या पत्रकारांच्या संघटनेला पाठिंबा आहे. भारतीय कार्पोरेट कंपन्यांच्या काराभाराबद्दल त्यांच्याकडून अहवाल तयार करण्यात येत आहे. यातून अनेक गुपितं, अनियमितता, आणि गैरकारभारसंबंधित माहितीचाही समावेश असू शकतो. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
हिंडेनबर्गसारखा अहवाल येण्याची शक्यता
दरम्यान, कोणत्या कॉर्पोरेट कंपन्यांची माहिती रिपोर्टमधून बाहेर येईल, याबाबत माहिती बाहेर आली नाही. (OCCRP Investigative report on India) हिंडेनबर्ग अहवाल चालू वर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटी प्रकाशित झाल्यानंतर अदानी समूहाचे मोठे नुकसान झाले. गुंतवणुकदारांना 120 बिलियन डॉलर गमावावे लागले. तसेच शेअर बाजारातून 20 हजार कोटी रुपये उभे करण्याचा निर्णय कंपनीला माघारी घ्यावा लागला. त्यानंतर अनेक दिवस अदानी समूहाचे शेअर्स लाल रंगात ट्रेड करत होते.
OCCRP संघटना काय आहे?
ऑर्गनाइज्झ क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट ही शोध पत्रकारांची संघटना 2006 साली स्थापन झाली आहे. या संघटनेतील पत्रकार माध्यम समूहांच्या सहकार्याने शोध पत्रकारिता करतात. तसेच गुप्त अहवाल, बातम्या जनतेपुढे आणण्याचे काम ही संघटना करते. फोर्ड फाउंडेशन, रॉकरफेलर ब्रदर्स फंड, ओक फाउंडेशनचा या संघटनेच पाठिंबा आहे.