Education Loan Documents: शैक्षणिक कर्ज मिळण्याची प्रक्रिया पुढील वर्षापासून अधिक सोपी होणार आहे. एज्युकेशन लोनच्या किचकट प्रक्रियेतून विद्यार्थी आणि पालकांची सुटका होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया "frictionless credit mechanism" ही सुविधा पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करणार आहे. यानुसार फक्त एक महत्त्वाचे कागदपत्र कर्ज मंजूर होण्यासाठी पुरेसे ठरणार आहे.
सहज कर्ज कसे मिळणार?
सध्या विद्यार्थ्याला कर्जासाठी अर्ज करताना पूर्वीचे निकाल, प्रमाणपत्रे, उत्पन्न आणि विविध प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात. यात विद्यार्थ्यांचा वेळ जातो आणि कर्ज मिळण्याची प्रक्रियाही लांबते. मात्र, आता इच्छित संस्थेत प्रवेश मिळाल्याचे पत्र पुरेसे ठरेल. तसेच हे पत्र डिजिटल स्वरुपात असेल तरी ग्राह्य धरले जाईल. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने कर्ज मिळावे यासाठी RBI कडून नियोजन सुरू आहे. सर्वसमावेशकता आणण्यासाठी RBI ने हे पाऊल उचलले आहे. मागील काही वर्षात शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी वाढली आहे. सुमारे 3 लाख विद्यार्थी दरवर्षी परदेशात शिक्षणासाठी जातात. तसेच देशातील आघाडीच्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ लागलेली असते.
वरिष्ठ RBI अधिकाऱ्याने दिली माहिती
G20 बैठकी दरम्यान बोलताना RBI च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. "फ्रिक्शनलेस क्रेडिट" ही संकल्पना सर्वप्रथम शेती आणि दुग्ध व्यवसायाला जलद कर्ज पुरवठा मिळावा यासाठी सुरू करण्यात आली होती. मात्र, त्याचा विस्तार आता शैक्षणिक कर्जासाठीही करण्यात येणार आहे.
आर्थिक समावेशकता वाढवण्यासाठी RBI ने नुकतेच Innovation Hub platform ची स्थापना केली आहे. याद्वारे ग्राहकांना कर्जासाठीची पात्रता तपासता येईल. या प्लॅटफॉर्मद्वारे लहान उद्योगांना विना तारण कर्जाची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे.